अमृतावहिनी हम तुम्हारे साथ है !

अमृतावहिनी एवढ्या चर्चेचा विषय होत असतात की अमृतावहिनी नावाची स्वतंत्र वाहिनी मिडियावाले चालवू शकतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेंव्हा त्यांची बायको बँकेत नौकरी करते आणि ती इथून पुढेही बँकेत काम करणार असं लिहून आलं. किती कौतुक वाटलं. नवरा मुख्यमंत्री असूनही बायको काम करणार हे नवीन होतं.

नाहीतर आमच्या शेजारचा पप्प्या नगरसेवकाचा पीए झाला म्हणून त्याच्या बायकोने पिको आणि फॉलची कामं घेणं सोडून दिलं होतं. कारण काय तर पप्प्याच्या प्रतिष्ठेला बाधा येते.

तमाम राज्यात असं वातावरण असताना अमृता वहिनी पहिल्याच झटक्यात एक खंबीर आणि स्वतंत्र ओळख असलेली स्त्री म्हणून नावारुपाला आल्या.

आम्ही घरबसल्या स्वप्न बघणारे लोक विचार करायचो की अमृता वहिनी बँकेत कॅश मोजत बसलेल्या असतील. पाणी टाकून ओला केलेला स्पंज समोर असेल. वहिनी त्यात बोट घालून हजार पाचशेच्या नोटा मोजत बसल्यात आणि समोर भली मोठी रांग लागलीय. पण नुकताच अर्थसंकल्प सादर झालाय म्हणून त्यांना कुणी घाई करा असंही म्हणत नसेल. कारण नवऱ्याच्या काळजीचं थोडंफार सावट त्यांच्या चेहऱ्यावर पण दिसत असेल. नवऱ्याच्या विचारात टाचणीच्या डब्यातून टाचणी काढताना त्यांना अंमळ जास्तच वेळ लागत असेल. पण हे सगळं व्यर्थ होतं.

नंतर समजलं की अमृता वहिनी बँकेत अधिकारी आहेत. मग आम्ही मध्यमवर्गीय स्वप्नं पाहणं सोडून दिलं. आणि अमृतावहिनीनी पण आपली मध्यमवर्गीय प्रतिमा नोटेच्या बंडलवर असलेल्या पिन सारखी तोडून मोडून फेकून दिली.

अमृतावहिनीच्या आधी देवेंद्र फडणवीस या glamour च्या क्षेत्रात आले होते. आमदार असताना त्यांनी मॉडेलिंग केली होती. अटलबिहारी वाजपेयींनी आपला हा मॉडेल असलेला आमदार कोण हे बघायची इच्छा व्यक्त केली होती. तेवढ्यासाठी देवेंद्रभाऊ खास दिल्लीला जाऊन आले होते. तर आता देवेंद्रभाऊ मॉडेल होते हे लोक काय आरसासुद्धा म्हणत नसेल. पण अमृतावहिनी मात्र थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत डान्स करायला लागल्या. काही पोटदुखी असणारे लोक म्हणाले सरकारच्या तालावर देश नाचतो. अमिताभ नाचला तर काय मोठी गोष्ट? पण हे बरोबर नाही.अमिताभ नाचायला तयार होईल हो. पण मुळात आपल्याला नाचता यायला पाहिजे ना.

Screenshot 2019 06 08 at 6.48.46 PM

तर अमृता वहिनी नाचू शकतात हे त्यांचं वैशिष्ट्य. आता टीका करणारे म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या बायकोला हे शोभत नाही.

अहो आधीचे मुख्यमंत्री लावणी महोत्सवाला जाऊन बसले तरी ते कसे कलेची कदर करणारे वगैरे विशेषण लावून तुम्ही त्यांचं कौतुक नव्हता का करायचा? मग आता या मुख्यमंत्र्यांची बायकोच एखाद्या कलेत निपुण असेल तर तिचं कौतुक का नको? बरं मुख्यमंत्र्यांच्या बायकोने काय करावं आणि काय करू नये असे नियम असणारी कुठली पुस्तिका नाही. त्यमुळे विरोध असण्याचं काही कारण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राबडीदेवी मुख्यमंत्री असताना लालूप्रसाद यादव होळीत गाणी म्हणायचे, नाचायचे तेंव्हा का नाही काही बोलला? मुख्यमंत्रीबाईच्या नवऱ्याने काहीही केलं तरी चालतं पण मुखमंत्री बुवाच्या बायकोने मर्यादा पाळायला हवी हे बरोबर नाही.

अमृतावहिनीच्या समर्थनासाठी अशी कितीही गोष्टी सांगितल्या तरी विरोध होतच राहणार.

कारण अमृतावहिनीचा स्वतंत्र बाणा फक्त सनातनी मेंदूला झिणझिण्या आणतो असं नाही तर महाराष्ट्राच्या पुरोगामी मस्तकाला पण बधीर करणारा आहे. अमृतावहिनीनी सगळ्यांची अडचण करून ठेवलीय. आपल्याच पक्षाच्या माणसाची बायको असल्याने उजवे अगदी शाळेबाहेर उभे केल्यासारखे भासताहेत. म्हणजे शबरीमला मंदिरात बायकांनी येऊ नये असं छातीठोकपणे सोशल मिडीयावर लिहिणारे अमृतावहिनीचा विषय आला की परीक्षेत पेनातली शाई संपल्यासारखा चेहरा करतात. बाकी पुरोगामी लोकांना आपण एरव्ही स्त्रियांची बाजू घेत असतो तेंव्हा आताच कसा विरोध करणार हा प्रश्न पडलाय.

आपण कसे स्त्रीमुक्तीच्या बाजूने आहोत असं भासवत असणाऱ्यांना तर काही बोलायची सोयच उरली नाही. त्यामुळे जी काही चर्चा चालू आहे ती दबल्या आवाजात चालू आहे. त्यातली देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अमृतावहिनी या विषयावर त्यांना जवळपास प्रत्येक पक्षातल्या पुरुष कार्यकर्त्याची सहानुभूती आहे. म्हणजे एकजण विषय काढतो की अमृतावहिनीचे असे फोटो यायला नाही पाहिजे. मुख्यमंत्री काही बोलत का नाहींत? तर दुसरा म्हणतो बायका ऐकतात का? मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं?

एकूण पुरुष मंडळीला एक दिलासा मिळालाय की बायका ऐकत नाहीत. कुणाच्याच.

खरतर अमृतावहिनीला देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्या ऐकत नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. पण हे प्रकरण असं आहे की यावर फार कमी लोकांना जाहीर बोलता येतं. त्यामुळे विषय भलतीकडेच जातो आणि लोक स्वतः आणि स्वतःच्या बायकोवर चर्चा करू लागतात.अमृतावहिनीच्या विषयावरून कित्येक घरात नवरा बायकोची भांडणं झाली हे आम्ही ऐकून आहोत. सेल्फी प्रकरणात तर येता जाता सेल्फी काढणाऱ्या कित्येक पोरींना आधार सापडल्यासारखं झालय. सीएमची बायको नाही का सेल्फी घेत? झालं. विषय संपला.

बाकी अमृतावहिनीविषयी काही बोलता येत नसलं तरी त्यांना एक सांगता तर नक्कीच येईल. पुढच्यावेळी सेल्फी घेताना काळजी घ्या. आज लोक बोलताना काळजी घेताहेत. पण आता पाच वर्ष पूर्ण होताहेत. लोकांचा भरवसा नाही. लोक काय बोलतील म्हणून नाही. पण निदान स्वतःसाठी काळजी घ्या.

20597044 111033396228651 4674633371800154092 n

एकतर आधीच तुम्ही डाव्या उजव्या, सनातनी पुरोगामी मंडळीची अडचण करून ठेवलीय. तुमच्या प्रश्नावर त्यांना काहीच बोलता येत नाही. सोनिया गांधींचे फोटोशॉप केलेले फोटो, दिग्विजयसिंग यांची बायको, शशी थरूर यांचं अफेअर, किंवा अगदी नेहरूंच्या नातेवाईक असलेल्या बायकांना त्यांचं अफेअर आहे असं सोशल मीडियात पसरवणारे कोण आहेत हे अमृतावहिनींना सांगायची गरज नाही.

पण यावेळी अमृतावहिनी आहेत म्हणून अडचण झालीय. whatsapp वर बायकांनी मर्यादेत रहावं असं सांगणारा फेसबुकवर बायकांनापण त्यांच्या मनाने जगण्याचा अधिकार आहे असं लिहितोय. पार डोक्याचं भजं झालंय. महाराष्ट्राचा मंगलकलश हिंदकळत आहे असा भास होतोय. ओबामा जाहीरपणे आपल्या बायकोचं चुंबन घेतात याचा अभिमान वाटणारा आमचा पुरोगामी मित्र रुसून बसलाय. काही बोलत नाही. एकूणच अमृतावहिनीनी आम्हाला खतरनाक कोंडीत पकडलय.

एक स्त्री आपल्या मर्जीने आपल्या आनंदासाठी जगते आहे तर आमचे सुशिक्षितपणाचे मुखवटे पार डळमळू लागले. पण मजा आहे. अमृतावहिनी बिनधास्त असतील. असाव्यात. आपण मात्र आपली भूमिका पुन्हा तपासायची वेळ आलीय.असो. खेळात जसं आपल्यावर राज्य आल्यावर आपला चेहरा होतो तसा अमृतावहिनींच्या सेल्फी, हवेतून काढलेलं मंगळसूत्र, मॉडर्न फोटो, अमिताभसोबत अल्बम या गोष्टी निघाल्या की बऱ्याच मंडळीचा चेहरा होतोय.

अमृतावहिनीमुळे तोटा झाला तो एकच. आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीची बायको पण प्रत्येक कार्यक्रमात गायनाचा हट्ट धरून बसते. तिचं पण गाणं ऐकावं लागतं. हा ट्रेंड मात्र आपल्याला झेपणार नाही. तेवढ एक सोडून आपण स्त्रीवादी आहोत. बाकी अमृतावहिनी हम तुम्हारे साथ है !

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.