रथ यात्रा अडवल्यानं लालूंची हवा झाली, मात्र सरकार वाचवायला ११ चे ६९ मंत्री करावे लागले

१९९० ची गोष्ट. राममंदिरच्या मुद्द्याने अख्खा देश पेटला होता. एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा रथ अडवाणींच्या नेतृत्वाखाली सुसाट सुटला होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा जिथे जाईल तिथे त्यांचे जंगी स्वागत होत होते. भाजपाचा हा अश्वमेध कोण रोखणार यामुळे सगळे विरोधक भांबावले होते.

अखेर ते शिवधनुष्य उचललं बिहारचे तेव्हाचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी. एकदा दिल्लीमध्ये भेट लालकृष्ण अडवाणी यांची भेट झाली तेव्हा लालू त्यांना म्हणाले होते,

“आप दंगा फैलाने वाला यात्रा निकालेंगे तो हम चूप नही बैठेंगे. बहोत परिश्रमसे हमने बिहारमै भाईचारा कायम किया है. अगर आप ये दंगा फैलाने वाला यात्रा निकालेंगे तो हम छोडेंगे नही. “

लालकृष्ण अडवाणी तेव्हा खूप आत्मविश्वासात होते. त्यांनी लालून स्पष्ट सांगितलं,

“देखता हू की कौन माई का दुध पिया है जो मेरा रथ रोकेगा.”

लालू कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी आपल्या बिहारी भाषेत त्यांना उत्तर दिलं,

“मैने मां और भैंस दोनोंका दुध पिया है. आईये बिहार मै बताता हुं.”

लालकृष्ण अडवाणींची रथ यात्रा जेव्हा बिहारमध्ये आली तेव्हा लालूंकडे दोन पर्याय होते, एक की त्यांना सन्मानाने जाऊ देणे आणि दुसरा म्हणजे केंद्रातल्या जनता दलाच्या व्हीपी सिंगच्या सरकारची आहुती देणं.

आडवानींची रथयात्रा जसजशी पुढे जाऊ लागली, तसतसे अनेक शहरांत हिंदू-मुस्लिम दंगे उसळले. बिहारमध्ये १९८९ साली भागलपूरला रामशिळा मिरवणुकीत जे हत्याकांड झाल त्या हत्याकांडाच्या स्मृती मुसलमानांच्या मनात अजूनही ताज्या होत्या.

व्हीपी सिंगांनी ठरवलं की अडवानींना अयोध्येत जाऊ द्यायचं नाही. अडवानी अयोध्येला जाताना वाटेत बिहारमधून प्रवास करीत असताना लालूंना सिंगांनी आदेश दिला की तुम्ही त्यांची रथयात्रा रोखा. त्यांना तिथंच ताब्यात घेऊन अडकवून ठेवा. २३ ऑक्टोबर, १९९० साली समस्तीपूर येथे अडवाणींना झालेली अटक म्हणजे राजकीय धैर्याचा उत्कृष्ट नमुना होता. कारण त्या काळात हिंदुत्वाचा ज्वर जनमानसात चढलेला होता. अडवानींना अडवणं म्हणजे मुस्लिम वामनाला पायाखाली तुडवण्यासाठी उधळत जाणाऱ्या हिंदुत्वाच्या वारूला थांबवण्यासारखच होतं. 

त्या वादळाला रोखण्याचं धैर्य दाखवण्याच्या प्रशंसेचे धनी खरं तर व्हीपी सिंग होते. पण प्रत्यक्षात तो मुकुट घेऊन लालू पळाले. मुसलमानांच्या दृष्टीनं लालू हिरो ठरले.

७ नोव्हेंबर, १९९० रोजी भाजपने व्ही. पी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. लालूंचं मुख्यमंत्रीपदही धोक्यात आलं. भाजपचा पाठिंबा नाही म्हणजे ३९ आमदारांचा पाठिंबा नाही. पण ह्या संकटाच्या मेघालाही एक चंदेरी कडा अशी होती की सर्व डावे पक्ष कम्युनिस्ट पक्ष (२३), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (६), मार्क्सिस्ट कोऑर्डिनेशन कमिटी (२) आणि आयपीएफ (७) असे एकूण ३८ उमेदवार लालूंच्या पाठीशी उभे राहिले. तसेच ते केंद्रातही व्हीपी सिंगांच्या पाठीशी उभे राहिले. पण तेवढीच मदत पुरेशी नव्हती. लालूंना झारखंड मुक्ती मोर्चाचा ९ जागा आणि ३० अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी निकराची चर्चा करावी लागणार होती. 

त्याच सुमारास बशिष्टनारायण सिंग हे बिहार आंदोलनाची पार्श्वभूमी असलेले जनता दलाचे आमदार १७ आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. कारण त्यांचे लालूंशी मतभेद झाले होते. लालूंच्या धोरणात आणि प्रशासनात त्यांना स्पष्ट दिशा दिसत नव्हती. त्यांनी त्यात बदल व्हावा म्हणून काही सूचना केल्या तर आपल्या उद्दामपणामुळे लालू त्या सूचना धुडकावून लावत. अशा बशिष्ठ सिंगांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी लालूंनी नितीशकुमारांची मदत मागितली.

आपल्या ११ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून तो आकडा ६९ वरती नेऊन लालू तरले. त्यासाठी त्यांनी ज्या उघडउघड तडजोडी केल्या त्यामुळे ओबीसी आणि मागास जातीयांमधील त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेवर काहीही परिणाम झाला नाही. उलट हे कृत्य शौर्याचं आहे, म्हणूनच त्यांनी लालूना नावाजलं. कारण वरच्या जातींवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या लढाईत कुठल्याही टोकाला जाणं हे न्याय्यच होतं. त्या भावनेच भांडवल करण्यासाठी लालूंनी म्हटलं की, आपला विजय हा सामाजिक न्यायाचा आणि निधर्मीपणाचा विजय आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.