विरोधकांची वाढती एकजूट योगी सरकारची डोकेदुखी वाढवणारी ठरतीय….

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेच्या निषेध म्हणून सध्या पंजाब, हरियाणा, कर्नाटक अशा देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतकरी, शेतकरी संघटना, विरोधी पक्ष यांची निदर्शन सुरु आहेत. तसेच प्रियांका गांधी, अखिलेश यादव, शिवपाल यादव असे नेते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत किंवा नजरकैदेत आहेत. तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना घटनास्थळी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

काल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. त्यांचं हेलिकॉप्टर जिथं उतरणार होतं, तिथचं सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरलं होतं.

अनेकदा समजूत काढूनही ते तिथून जाण्यास तयार नव्हते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमावात दोन गाड्या घुसल्याच सांगण्यात येत असून त्यानंतरच हिंसाचार घडला. यात आतापर्यंत शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांच्या आरोपानुसार यातील एका गाडीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा बसला होता.

याच संपूर्ण घटनेनंतर आता संपूर्ण देशभरात विरोधकांची एकजूट बघायला मिळत आहे.

काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूलने या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. तर योगी सरकारने सध्या हिंसाचारादरम्यान मृत झालेल्या सर्वांना ४५ लाख आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. सोबतच प्रत्येक मृत परिवारातील एकाला नोकरी दिली जाणार आहे. आणि या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे.

मात्र सध्या देशातील विविध विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी लखीमपुरला निघाल्या होत्या. मात्र सध्या पोलिसांनी त्यांना हरगावमध्ये ताब्यात घेतलं असून सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे. त्यांच्या सोबत हरियाणाचे काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा हे देखील आहेत. प्रियांका गांधी यांचा इतर ताफा मात्र बाकी ठिकाणांहून निघण्यात यशस्वी झाला आहे.

प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हंटले आहे कि,

प्रियांका, मला माहित आहे की तु मागे हटणार नाहीस. तुझ्या धैर्याला आणि हिंमतीला ते घाबरले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला न्याय मिळवूनच देऊ.

याच्या काही वेळानंतर पोलिसांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना देखील ताब्यात घेतलं आहे. अखिलेश यादव लखीमपूरला जाण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी त्यांना त्यांच्या घराबाहेरच अडवले. यामुळे अखिलेश यादव तिथंच धरणे आंदोलनासाठी बसले. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अखिलेश यादव यांनी मागणी केली आहे कि, या घटनेला जबाबदार असलेल्या केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा, आणि त्यांच्या दोषी मुलाला अटक करून तुरुंगात पाठवलं जावं. आणि या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी.

यासह, उत्तरप्रदेश सरकारने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना लखनऊमध्ये न उतरण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र तरीही चन्नी लखीमपुरला जाण्यासाठी निघाले आहेत. पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतचा आग्रह केला आहे. मात्र पंजाबचे सरकार चन्नी यांच्या दौऱ्यावर ठाम आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगची परवानगी पंजाब सरकारने उत्तरप्रदेश सरकारकडे मागितली आहे.

या घटनेवर राष्ट्रीय जनता दलाचे नेतेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, पीडित लोकांना न्याय हवा आहे. पण भाजप मंत्र्याचा मुलगा असल्याने त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. उत्तर प्रदेशात गुंडांचे राज्य स्थापित झाले आहे.

यासह भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत देखील सोमवारी आपल्या ताफ्यासह लखीमपुरसाठी रवाना झाले आहेत. तृणमूलकडून देखील अनेक मोठे नेते आज लखीमपूरचा दौरा करण्याची शक्यता आहे. सोबतच भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं असून सरकार यामागील  कारणांचा शोध घेईल असं सांगितले आहे. तसेच यातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिले आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.