भारताचं ५ लाख सैन्य सिंधला स्वतंत्र करण्यासाठी पाकच्या सीमेवर जाऊन पोहचलं होतं
वर्ष होतं १९८७. जानेवारी महिना. भारताचं मोठ्या प्रमाणात सैन्य पाकिस्तानच्या सीमेकडे सरकत होतं. भलेमोठे रणगाडे, मोठमोठ्या तोफा, ट्र्क मध्ये बसलेले हत्यारबंद जवान राजस्थानच्या वाळवंटात जमा होत होते. स्थानिकांना हे नेमकं काय चाललंय हे ठाऊक नव्हतं. सैन्यदलाकडून रेग्युलर सराव चालू असल्याचं सांगण्यात आलं. या सरावाची तयारी १९८६ च्या हिवाळ्यापासून सुरु होती पण आता मात्र ती गतिमान झाली होती.
याला नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन ब्रास टॅक
पाकिस्तानचं धाबं दणाणलं. त्यांनी अमेरिकेकडे तक्रार केली की भारताचं पाच लाखांचं सैन्य आमच्या सीमेवर येऊन उभं आहे.
त्या दिवशी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष लष्करशाह झिया उल हक यांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक मिटिंग बोलावली. ती रात्रभर चालली. भारतावर दबाव टाकण्यासाठी मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रावर बॉम्ब टाकून उडवून देण्याची कल्पना मंत्रिमंडळापैकी कोणी तरी मांडली होती. त्या दृष्टीने पाणबुड्या कोणत्या वापरता येतील याची देखील चर्चा झाली.
जगभरात खळबळ उडाली. शांततेचा पुरस्कर्ता भारतदेश इतका आक्रमक होऊन युद्धची तयारी का करतोय हे कळायला मार्ग नव्हता.
सगळ्यांच्या नजरा भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे रोखण्यात आल्या. पण त्यांना याची काहीच कल्पना नव्हती.
माजी पररराष्ट्र मंत्री नटवरसिंग आपल्या पुस्तकात सांगतात की १५ जानेवारीला आर्मी डे साठी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आम्ही विमानतळावर गेलो होतो. तिथे राजीव गांधींना या घडामोडीबद्दल कळालं. मी तेव्हा परराष्ट्र राज्यमंत्री होतो. राजीव यांनी मला थेट प्रश्न विचारला,
“नटवर क्या हम पाकिस्तान के साथ फिर जंग करने जा रहे हैं?”
नटवरसिंग यांना देखील याची कल्पना नव्हती. त्यांनी आपल्या मंत्रालयाकडे तरी अशी कोणतीही माहिती नाही असं सांगितलं. एनडी तिवारी तेव्हा परराष्ट्र खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. संरक्षण मंत्रालयाकडे ही माहित आहे म्हणायला स्वतः पंतप्रधानांकडे तेव्हा संरक्षण खातं होतं.
त्या दिवशी रात्री अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रपती भवनात डिनर पार्टी आयोजित केली होती. आर्मी डे असल्यामुळे अनेक मोठे लष्करी हजर होते. राजीव गांधी यांनी पश्चिमी दलाच नेतृत्व असणाऱ्या लेफ्टनंट जनरल हुन यांना सहज विचारलं,
“वेस्टर्न फ्रंटची काय स्थिती आहे?”
तेव्हा हुन मोठ्या अभिमानाने म्हणाले,
“मिस्टर प्राईम मिनिस्टर आम्ही संपूर्ण तयारीत आहोत. तुमचा एक आदेश आला की सीमापार जाऊन पाकिस्तानचे असे तुकडे करू की सिंध एका बाजूला आणि लाहोर एका बाजूला होऊन जाईल.”
लेफ्टनंट जनरल हुन सांगतात की माझ्या त्या उत्तरामुळे राजीव गांधी अस्वस्थ वाटले आणि त्यांनी थोड्या रागातच ती पार्टी निम्म्यात सोडली आणि ते निघून गेले.
असं म्हणतात की ही योजना आखली होती राजीव गांधींचे खास मित्र आणि सल्लागार संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंह यांनी. त्याची अमंलबजावणी करत होते, भारताचे लष्करप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी
सुंदरजी हे देशाचे सर्वात पराक्रमी ऑफिसर आणि आजवर लाभलेल्या सर्वोत्तम लष्करप्रमुखांपैकी एक असे समजले जात. त्यांनी १९७१ साली जेव्हा इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून बांगलादेशाची निर्मिती केली तेव्हा त्या युद्धात प्रमुख भूमिका बजावली होती. इंदिरा गांधींचे विश्वासू अधिकारी म्हणून त्यांना ऑपरेशन ब्ल्यूस्टारची देखील जबादारी दिली होती. अशा अनेक मोहीम सहज निभावून नेणाऱ्या सुंदरजी यांनी लष्कर प्रमुख झाल्यापासून भारतीय सैन्यदलामध्ये अनेक आधुनिक बदल करण्यास सुरवात केली होती.
आधुनिक युद्धशास्त्र, आण्विक युद्ध, लष्कराची गतिशील व आक्रमक हालचाल इत्यादी क्षेत्रांत त्यांचा अभ्यास जागतिक स्तरावर वाखाणनला जात होता. त्यांनीच भारतीय आर्मी मध्ये मेकॅनाइझड रेजिमेंटची स्थापना केली आणि त्याच युनिट अहमदनगर येथे उभा केले.
दुसरे अरुण सिंह हे कपूरथलाच्या महाराजांचे चिरंजीव. ते राजीव गांधी यांच्या डून स्कुलमध्ये शिकलेले होते. त्यांचा मोठा प्रभाव या तरुण पंतप्रधानांवर होता. राजीव गांधी यांच्या प्रत्येक निर्णयामागे अरुण नेहरू आणि अरुण सिंह या सल्लागारांचा हात असतो असं म्हटलं जात असे. त्यांमूळेच त्यांना देशाच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्य मंत्री बनवण्यात आलं होतं पण त्यांचं वागणं स्वतः संरक्षण मंत्री असल्याप्रमाणे होते.
जवळपास निम्मे भारतीय सैन्य पाकिस्तानी सीमेवर उभं ठाकलं होतं आणि सिंध स्वतंत्र करण्याचा त्यांचा इरादा आहे याचा बोभाटा सगळ्या जगात झाला. पाकिस्तान तर आता थेट अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या देत होती तर अमेरिके पासून रशिया पर्यंत अनेक देश राजीव गांधींना धोक्याचा इशारा देऊ लागले होते.
या रहस्यमयी मोहिमे बद्दल अनेक शक्यता बोलून दाखवल्या जात होता. एक म्हणजे हा खुद्द राजीव गांधी यांचा प्लॅन होता असं म्हटलं जात होतं. ज्या प्रमाणे इंदिरा गांधींनी बांगलादेश बनवला त्याप्रमाणे सिंध बनवून इतिहासात अजरामर होण्याची राजीव गांधींचा प्लॅन होता असे आरोप केले गेले.
तर दुसऱ्या थियरी प्रमाणे खरेच पंतप्रधानांना या ऑपरेशन ब्रास टॅक बद्दल माहित नव्हतं आणि अरुण सिंह यांनी त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी हि योजना त्यांना भनक न लागू देता आखली. लेफ्टनंट जनरल हुन आपल्या पुस्तकात आरोप करतात की अरुण सिंह यांना पंतप्रधान आणि जनरल सुंदरजी यांना सॅम माणेकशॉ यांच्याप्रमाणे फिल्ड मार्शल बनायचं होतं म्हणून त्यांनी ही मोहीम आखली .
माजी कॅबिनेट सेक्रेटरी बीजी देशमुख यांच्या म्हणण्याप्रमाणे ही दोन्ही गृहीतके खोटी असून काश्मीर मध्ये पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यासाठी हा रुटीन सराव अभ्यास घेण्यात आला. उलट पाकिस्तानला भारतावर अणू बॉम्ब हल्ल्यासाठी एक कारण हवं म्हणून त्यांनी हा बागुलबुवा बनवला आणि त्याची जगभरात चर्चा सुरु केली.
सर्वसामान्य पाकिस्तानी आणि भारतीय माणसाचं एकच मत होतं,
“भारताने सिंध स्वतंत्र करण्यासाठी आजवरच्या सर्वात मोठ्या सर्जिकल स्ट्राईकची तयारी केली होती.”
ऐनवेळी अणुयुद्धाची चिन्हे दिसू लागल्यावर राजीव गांधींनी सूत्रे फिरवली आणि ऑपरेश ब्रास टॅक रद्द करण्यात आलं. परत गैरसमजातून अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही देशांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना एका हॉटलाईनने जोडण्यात आलं. भारत पाकिस्तान मैत्रीचा नवीन अध्याय आखण्यात आला. दोन्ही देशाचे बंद असलेले क्रिकेट सामने पुन्हा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.
राजीव गांधींनी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी व्ही.पी.सिंग यांच्या कडे सोपवली.
नटवरसिंग आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करून सांगतात की राजीव गांधी यांनी त्यांना एकदा प्रश्न विचारला की ,
“माझ्या या संरक्षणराज्य मंत्र्यांचं काय करायचं ?”
ते म्हणाले,”आपल्या कामात गुस्ताखी केल्याबद्दल त्यांना काढून टाका.”
पंतप्रधान यांनी सांगितलं,
“अरुण सिंग हा भला माणूस आहे. माझा जवळचा मित्र आहे. त्याला असं काढता येणार नाही. “
नटवरसिंग ठाम आवाजात म्हणाले,
सर तुम्ही डून स्कुलच्या शाळकरी ग्रुपचे प्रमुख नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. यासाठी कोणाला दुखवावे लागले तरी चालेल.
पण राजीव गांधींनी त्या वेळी तरी या संरक्षण राज्यमंत्र्याला राजीनामा मागितला नाही. पण पुढच्या दोनच महिन्यात अरुण सिंह यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लागला. फक्त भारत पाकिस्तान नाही तर संपूर्ण जगावर ओढवलेल्या अणुयुद्धाचं संकट टळलं होतं.
हे ही वाच भिडू
- थेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, भारतावर हल्ला होणार आहे.
- लष्करप्रमुख जनरल करिअप्पांंचा मुलगा पाकिस्तानला युद्धकैदी म्हणून सापडतो तेव्हा..
- फिल्डमार्शल माणेकशॉ कलामांना म्हणाले, राष्ट्रपतीजी माझी एक तक्रार आहे
- ऑपरेशन ब्लू स्टार झाले नसते तर भिंद्रनवाले खलिस्तानची घोषणा करणार होता.