उदयनराजे नगरसेवक झाले होते त्या पुर्वी आणि त्यानंतर काय घडलं..

साताऱ्याचं राजघराण कधीच राजकारणात नव्हतं. स्वातंत्र्यलढ्यावेळी सातारा जिल्हा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला होता ते म्हणजे प्रतिसरकार. इंग्रजांना हुसकावून लावून प्रजेचं राज्य स्थापन होणारा हा पहिला जिल्हा. क्रांतिकारकानी सरकार स्थापन करून एक वेगळाच पायंडा पाडला होता. जनतेचा सुद्धा त्यांना पाठींबा होता.

जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साताऱ्यामध्ये या प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांचाचं बोलबाला होता. यातच होते क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व इतर. यापैकी काही नेते कॉंग्रेसमध्ये राहिले तर नाना पाटील यांच्यासारख्यांनी शेतकरी कामगार पक्षाची वाट धरली.

पक्ष कोणताही असो याचं नेत्यांनी साताऱ्याच्या राजकरणावर वर्चस्व ठेवलं. साताऱ्याच्या भोसले गादीबद्दल जनतेमध्ये आदर होता पण त्यांनी आपल्यावर राज्य करावे ही मानसिकता त्याकाळात नव्हती आणि राजकारण करावे अशी राजघराण्याची देखील इच्छा नव्हती.

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले नंतर संरक्षण मंत्री म्हणून देशाच्या राजकारणात वर गेले पण याकाळात सातारावरची पकड त्यांची ढिली झाली नाही. 

राजघराण्याशीही त्यांचे नाते सौहार्दपूर्ण होते. मात्र जेव्हा इंदिरा गांधी यांच्याशी त्यांच वितुष्ट आले तेव्हा त्यांनी साताऱ्याचा राजमाता सुमित्राराजे यांना यशवंतरावांविरुद्ध निवडणूक लढवण्याची गळ घातली पण त्या तयार झाल्या नाहीत. अखेर वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी यशवंतरावांविरुद्ध निवडणूक लढली पण त्यात त्यांचा पराभव झाला.

१९८४ साली यशवंतरावांचा मृत्यू होई पर्यंत सातारयाचे खासदार प्रतिसरकार चळवळीशी निगडीतचं कोणी ना कोणी राहिले. त्यांच्यानंतर त्यांचे कट्टर कार्यकर्ते वाईचे प्रतापराव भोसले खासदार बनले. पण तोवर परिस्थिती बदलली होती. स्वातंत्र्यलढा पाहिलेली पिढी मागे पडत गेली. राजकारण बदलत चालल होतं.

याच सुमारास उदय झाला भोसले घराण्याचा. 

सत्तरच्या दशकात सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांनी राजकारणात प्रवेश केला होता. १९७८ साली त्यांचे धाकटे भाऊ अभयसिंहराजे भोसले हे जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीला उतरले. तेव्हा कॉंग्रेसचे बाबुराव घोरपडे गुरुजी या एकेकाळचे मातब्बर क्रांतीकारक त्यांच्या विरोधात होते. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव करून अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार बनले.

पहिल्यांदाच छत्रपतींच्या वंशजापैकी कोणीतरी अधिकृतपणे राजकारणात आला होता.

याच काळात शरद पवारांनी यशवंतरावांच्या छायेतून बाहेर पडत पुलोद सरकारचे मुख्यमंत्री बनून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. साताऱ्यामध्ये छत्रपती प्रतापसिंहराजे यांचा मृत्यू झाला. भावाची छत्रछाया नसलेल्या अभयसिंहराजे यांनी पुढच्या निवडणूकीवेळी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून विजय मिळवला. या निवडणुकीवेळी त्यांनी चौदा वर्षाच्या छत्रपतीना म्हणजेच स्व. प्रतापसिंहराजे यांचे सुपुत्र उदयनराजेना प्रचारासाठी उतरवल होतं.

उदयनराजे भोसले यांच्या वादळी राजकारणाची ही सुरवात होती.

अभयसिंह राजेना अंतुलेंच्या सरकार मध्ये मंत्रीपद मिळालं होतं. विरोधात असूनही शरद पवारांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. पुढे पवार स्वतः कॉंग्रेसमध्ये परत आले. अभयसिंहराजे यांची लोकप्रियता वाढीस लागली होती. अजिंक्य सहकारी कारखान्याच्या माध्यमातून सहकारामध्येही त्यांनी जम बसवला होता. सातारा विधानसभेत त्यांच्या विरुद्ध कोणीच टिकू शकत नव्हतं.

उभ्या महाराष्ट्राला ज्या भाऊबंदकीने सतावले आहे त्याची झळ छत्रपती घराण्याला देखील लागली. मालमत्तेच्या कारणातून उदयनराजे यांची आई राजमाता कल्पनाराजे आणि अभयसिंहराजे यांच्यात वाद झाले. १९९० साली कल्पनाराजे यांनी अभयसिंहराजेंच्या विरुद्ध शिवसेनेकडून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला.

याच दरम्यानच्या काळात इंजिनियरिंगचे उच्चशिक्षण घेऊन आलेल्या उदयनराजे यांनी देखील राजकारणात प्रवेश केला.

१९९१ सालच्या सातारा नगरपालिका निवडणुकीवेळी उदयनराजे नगरसेवक म्हणून निवडून आले.

त्यांचे काका अभयसिंहराजे कॉंग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या तरुण बेदरकार छत्रपतीची त्याच्या स्टाईलच्या राजकारणाची साताऱ्याच्या जनतेला भुरळ पडत चालली होती.

१९९६ साली लोकसभा निवडणुका आल्या. उदयनराजेंनी निवडणूक लढवायच ठरवलं होत. युतीच्या वाटणीत साताऱ्याची जागा शिवसेनेकडे होती आणि तिथे हिंदूराव नाईक निंबाळकर हे उभे राहत होते. यामुळे राजे अपक्ष उभे राहिले.

ही निवडणूक अटीतटीची झाली. सलग तीनदा खासदार राहिलेले यशवंतरावांचे कार्यकर्ते प्रतापराव भोसले यांचा हिंदुराव नाईकनिंबाळकर यांनी अवघ्या बारा हजार मतांनी थोडक्यात पराभव केला. विशेष म्हणजे उदयनराजेना या निवडणुकीत  एक लाख तेरा हजार मते मिळाली होती. उदयनराजेंना साताऱ्यात दुर्लक्ष करू शकत नाही हे सिद्ध झालं होत. या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदुत्ववादी विचारांचा खासदार साताऱ्याला लाभला.

महाराष्ट्रात युतीचे सरकार आले होते. १९९८ साली मतविभाजनी रोखायची म्हणून कॉंग्रेसने थेट अभयसिंह राजेना लोकसभेसाठी उतरवल. त्यांचे पुतणे उदयनराजे मोकळ्या झालेल्या साताऱ्याच्या विधानसभेतून निवडणून गेले. भाजपने त्यांना राज्य महसूलमंत्री केले. 

याचदरम्यान १९९९ साली शरद पवारांनी परत कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीचा सवतासुभा स्थापन केला. अभयसिंहराजेंनी त्यांना साथ द्यायचं ठरवलं. त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते परत आमदारकीला उभे राहिले आणि निवडून देखील आले. याच निवडणुकीत अभयसिंह यांचे कार्यकर्ते नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. याची शंकेची सुई उदयन महाराज यांच्यावर वळली. त्यांना अटक करण्यात आली.बावीस महिने ते जेल मध्ये होते. पण अखेर त्यांना निर्दोष सोडण्यात आले.

तोवर अभयसिंहराजे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे चिरंजीव आणि उदयन राजे यांचे चुलतभाऊ शिवेंद्रराजे राष्ट्रवादीकडून साताऱ्याचे आमदार झाले होते. या दोन्ही भावामध्ये सत्तासंघर्ष सुरु झाला. पंचायतसमिती पासून ते नगरपालिका निवडणूक या दोघांभोवती फिरू लागली. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा विधानसभेत पराभव केला.

राज्यात आणि केंद्रातही कॉंग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आले. 

दरम्यानच्या काळात उदयन राजेंनी जेम्स लेन प्रकरणात भाजप बोटचेपी भूमिका घेत आहे असं म्हणत पक्ष सोडला आणि पुढे ते राष्ट्रवादीमध्ये आले. दोन्ही भावाची दिलजमाई करण्यात आली होती. अख्खा जिल्हा शरद पवारांच्या पंखाखाली आला होता. पण आत दबलेली शांतता होती.

उदयन महाराज लोकसभेवर आणि शिवेंद्रराजे विधानसभेमध्ये अशी वाटणी करण्यात आली. २००९च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीकडून खासदार बनले. पण पहिल्याच मुलाखतीमध्ये त्यांनी जाहीर केलं की मी पक्ष गेला खड्ड्यात, मी पक्ष वगैरे काही मानत नाही.

इथेच पहिली ठिणगी पेटली होती. राष्ट्रवादीने निवडणून येण्याची क्षमता या क्रायटेरियाखाली एकेकाळचे विरोधक उदयनराजेना पक्षात आणलं पण ते त्यांना जड जाणार हे दिसत होतं. त्यांची अजित पवार यांच्याशी असलेले वैयक्तिक वाद हा सुद्धा या संघर्षाला एक पदर होता. वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका उदयनराजेनी लपवून ठेवली नाही.

जिल्ह्यातील रामराजे नाईकनिंबाळकर अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांच पटत नाही हे सर्वमान्य सत्य होते. टोलनाक्यावरील वाद, त्यांची बेधडक वक्तव्ये, कॉलर उडवण्याची स्टाईल अशा अनेक कारणांनी उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये टीकेचे कारण ठरले होते.

२०१४ च्या निवडणुकीवेळी ते भाजपमध्ये जाणार अशी दबकी चर्चा सुरु होती. पण तसे घडले नाही. फक्त शरद पवार यांच्यामुळे उदयनराजे पक्षात राहिले. पण शिवेंद्रराजे यांच्याशी त्यांचा वाद विकोपाला गेला. पुन्हा सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊबंदकीने पुन्हा डोकं वर काढलं. शिवेंद्रराजेंच्या पत्नीला या निवडणुकीत उदयनराजेच्या पॅनलने पराभव केला.

२०१९ च्या निवडणुकीतही मागच्या वेळ प्रमाणे परिस्थिती होती. उदयनराजे भाजपमध्ये जाणार या गप्पा रंगल्या. शरद पवारांनी आपले कौशल्य दाखवत शिवेंद्रराजेंपासून रामराजेपर्यंत अनेकांची समजूत घालून उदयनमहाराजांना तिकीट दिले. अपेक्षेप्रमाणे ते निवडूनही आले. आल्यावर त्यांनी इव्हिएमवर टीकाकरून भाजपला धारेवरही धरले. आता ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता मावळली असच वाटत होत.

लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण देशात मोदींच राज्य राहण्यावर शिक्कामोर्तोब झाला होता. राजकारणाचे बदलते चित्र पाहून विधानसभा निवडणुकी आधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. यातील प्रमुख नाव शिवेंद्रराजे भोसले होते. 

याच पार्श्वभूमीवर उदयनराजेनी देखील आपली पुढची दिशा ठरवली आणि  शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ ते देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पण शरद पवारांचे खास मित्र श्रीनिवास पाटील यांनी त्यांना साताऱ्यात हरवण्याचा विक्रम केला.

प्रतिसरकारच्या चळवळीचा इतिहास असलेल्या या जिल्ह्यामध्ये कधीच उजव्या विचारसरणीच्या पक्षांना वाव नव्हता, मात्र उदयन राजे आणि शिवेंद्र राजेंच्या जाण्याने शरद पवारांची एकहाती सत्ता आज मोडकळीस आली आहे असा समज पसरला होता. राजघराण्याच्या सरंजामी राजकारणाला वाव देऊ नये हे यशवंतरावांचे चव्हाण यांचे धोरण शरद पवारांनी पाळले नाही याचा फटका त्यांना बसला आहे हे बोललं जात होतं. पण उदयन महाराजांच्या पराभवामुळे हा समज खोटा ठरवला गेला.

आज उदयन राजे भाजप तर्फे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्या केंद्रात मंत्रिपदाच्या चर्चा होत राहतात पण इतर अनेक नेत्यांप्रमाणे छत्रपती घराण्याच्या वारसदाराला देखील प्रतिक्षेच्या रांगेत वाट बघत बसावं लागत आहे.

  • भूषण टारे

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kundan says

    Nice history sar ,,,,,,, great knowladge of history for me

Leave A Reply

Your email address will not be published.