समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना नेमकी कुणाची ?

मे २०१६ पासून सुरुवात झालेल्या नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे म्हणजेच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नागपुर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करतील.

पण उद्घाटनापूर्वी एक मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे या समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना नेमकी कोणी मांडली होती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केलाय की, ही संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांची होती. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, ही संकल्पना पूर्वीपासूनच माझ्या डोक्यात होती. तर माध्यमांमध्ये आणखी एक दावा केला जातोय की, या एक्सप्रेसवेची संकल्पना विलासराव देशमुख यांची होती.

एकाच प्रकल्पाची संकल्पना तीन वेगवगेळ्या व्यक्तींनी मांडली असल्याच्या दाव्यांमुळे संकल्पनेचं श्रेय नेमकं कुणाचं हा प्रश्न पडतो. 

याबाबत केले जाणारे तीनही दावे नेमके कशाच्या आधारावर केले जात आहेत ते सविस्तर बघुयात. 

१) पहिला दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या संकल्पनेचा.

२०१४ मध्ये युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु केले होते. त्यात सगळ्यात मोठा प्रकल्प होता नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे म्हणजेच समृद्धी महामार्गाचा. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी या एक्सप्रेसवेची घोषणा केली होती. मे २०१६ मध्ये या एक्सप्रेसवेची डिजाईन तयार करण्यासाठी कंसल्टंसी नेमण्यात आली. 

एक वर्षाने मे २०१७ मध्ये एमएसआरडीसी अंतरंगात समृद्धी महामार्गाच्या नावाने कंपनीची स्थापना करण्यात आली. दोन महिन्यांनी भूमी अधिग्रहण सुरु झालं, तर एका वर्षानंतर म्हणजेच मे २०१८ मध्ये यासाठी निविदा मागवण्यात आल्या आणि प्रकल्पाला मंजुरी मिळाली. जून २०१९ मध्ये एक्सप्रेसवेच्या कामाला सुरुवात झाली आणि नोव्हेंबर २०१९ पर्यंत एक्सप्रेसवेचं २२ टक्के काम पूर्ण झालं होतं. 

देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी मुख्यमंत्री असतांना हा प्रकल्प सुरु केला होता असं सांगितलं जातं. 

५ एप्रिल २०२२ रोजी माध्यमांशी बोलतांना त्यांनी या प्रकल्पाच्या संकल्पनेबद्दल सांगितलं होतं.

ते म्हणाले की, 

“घाईघाईत उद्घाटन आटपून घेतलं तर रस्ता होईल, पण त्या रस्त्याला असलेलं महत्व कमी होईल. कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गावरून माझं नाव मिटवता येणार नाही. अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे अशी संकल्पना २० वर्ष माझ्या डोक्यात होती. हे काही माझं श्रेय नाही, जनतेने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली आणि हा प्रकल्प आम्ही सुरु केला.”

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे समृद्धी महामार्गाची संकल्पना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, असा दावा केला जातोय.

२) दुसरा दावा विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेचा.

ऑक्टोबर १९९९ मध्ये विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनीच राज्याच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मांडली होती. निव्वळ मुंबई, पुणे आणि नाशिक या गोल्डन ट्रँगलच्या बाहेर देखील विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी मुंबई-नागपूर एक्सप्रेसवेची संकल्पना मांडली होती, असं सांगितलं जातं.

विलासराव देशमुखांचं नागपूरशी एक वेगळं आपुलकीचं नातं होतं, ते नागपूरला स्वप्ननगरी म्हणायचे. विलासराव देशमुखांच्या काळात नागपूरमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प सुरु झाले. त्यांनी एकात्मिक रस्ते विकास आणि शहर विकास योजनेतून नागपूरसाठी निधी दिला. यासाठी टी. चंद्रशेखर या प्रामाणिक मानल्या जाणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला नागपूरचं आयुक्त म्हणून नेमलं आणि योजनांची प्रभावी अंलबजावणी केली.

विलासराव देशमुखांनी नागपूरमध्ये मिहानचा ड्रीम प्रिजेक्ट सुरु केला.

त्यांनी मुंबई-पुणे महामार्गाचं काम करणाऱ्या आर सी सिंह यांच्याकडे मिहान प्रकल्पाची जबाबदारी सोपवली. देश परदेशात बैठक घेऊन मिहानमध्ये गुंतवणूक खेचून आणली. कापूस एकाधिकार योजनेचा ५ हजार कोटींचा तोटा दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. याच कडीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी नागपूर-मुंबई महामार्गाची संकल्पना त्यांनी मांडली होती असं सांगितलं जातं.

३) तिसरा दावा बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेचा.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचं नाव बदलून ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असं करण्यात आलं होतं. २०१४ च्या युती सरकारच्या काळापासून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये या महामार्गाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच होती.

अलीकडेच माध्यमांशी बोलत असताना त्यांना समृद्धी महामार्गाच्या नामांतरणाचा प्रश्न विचारण्यात आला होता. 

या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, 

“मी मंत्री असताना हा प्रोजेक्ट सुरु झाला होता, योगायोगाने आज मी मुख्यमंत्री असताना त्याचे लोकार्पण होत आहे. बाळासाहेब हे मोठं उत्तुंग व्यक्तीमत्त्व होतं. त्यांच्या संकल्पनेतून पुणे-मुंबई महामार्ग तयार झाला होता. त्यामुळे एवढ्या या प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव देऊ अशी संकल्पना आम्ही मांडली होती. सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे-मुंबईच्या हायवेची संकल्पना मांडली होती, त्यामुळे समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय.  

या संकल्पनेबद्दल आणखी एक दावा केला जातो तो नितीन गडकरी यांचा. 

१९९५-९९ या काळात जेव्हा नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांनी मुंबई-पुणे हायवेचं बांधकाम केलं होतं. ते काम सुरु असतांना मुंबई-पुणे हायवेप्रमाणेच मुंबई-नागपूर हायवे बांधण्याची संकल्पना देखील त्यांनी मांडली होती, असं जाणकार सांगतात.

उद्घाटन होऊ घातलेल्या या एक्सप्रेसवेची मूळ संकल्पना कोणाची याबद्दल अनेकांचे वेगवगेळे दावे आहेत. परंतु दावे जरी वेगवगेळ्या लोकांचे असले तरी या एक्सप्रेसवेची सुरुवात युती सरकारच्या काळात झाली. त्यानंतर महाविकास आघाडीत हे काम सुरु ठेवण्यात आलं आणि आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हा एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी मोकळा होतोय हे नक्की.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.