घरदार सोडून एका गाडीत राहणाऱ्या लोकांच्या स्टोरीने काल ऑस्कर जिंकलाय..

काल रात्री जाहीर झालेल्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम चित्रपट म्हणून विजयी ठरला तो नोमॅडलँड हा चित्रपट. चित्रपटाची दिग्दर्शिका क्लो झाओ हि ऑस्कर जिंकणारी आशियातली पहिली महिला दिग्दर्शिका ठरली. सहा वेळेस ऑस्कर पुरस्कार नामांकित नोमॅडलँड या चित्रपटातून भटक्या लोकांचं जीवन दाखवण्यात आलं. मात्र हि नोमॅडलँड काय भानगड आहे हे आपण बघूया.

अमेरिकेच्या पश्चिम भागात भटकी लोकं आपल्या एका व्हॅनसोबत राहताना दिसतात, सगळं आयुष्य एकट्यानेच घालवतात. सुरवातीला एकटं राहणारी हि लोकं हळूहळू समुदाय करून राहू लागली आणि आता हा प्रचंड समुदाय नोमॅडलँड कम्युनिटी म्हणून ओळखला जातो.

आपलं मूळ नावगाव विसरून आणि घरातल्या महत्वाच्या माणसांचा मृत्यू झाल्यानंतर ज्या स्त्रिया जगरहाटीच्या रोजच्या दुनियेपासून दूर जाऊन आपल्या बॉक्स व्हॅनमध्ये जीवन व्यतीत करतात त्या म्हणजे नोमॅडलँडचा गाभा.

बॉब वेल्स या अवलियाने त्याच्या वैयक्तिक अनुभवातून हि नोमॅडलँड्स कम्युनिटी बनवली. बॉब वेल्स हा एक भटकणारा आणि अमेरिकन लेखक आहे. अनेक लोकांसाठी तो प्रेरणास्थान आहे.

त्याला हि नोमॅडलँडची कल्पना कशी सुचली, वडील गेल्यानंतर त्याच्यावर घरची जबाबदारी पडली , त्यातून धंद्यात जबर नुकसान झालं आणि बायको मुलं त्याच्यापासून वेगळे झाले आणि तो एकटा पडला. घरदार गमावून बसल्यामुळे त्याला त्याने त्याच्या उरलेल्या काही पैशातून विकत घेतलेल्या बॉक्स व्हॅनमध्ये राहावं लागलं. या व्हॅनमध्ये तो एकटाच राहू लागला. या वाईट अनुभवामुळे तो रात्र रात्र ओरडत बसायचा.

काही दिवसांनी त्याने पुन्हा लग्न केलं आणि घरात राहू लागला. एके दिवशी त्याला तीन मुले आणि त्यांची आई अमेरिकेच्या कडाक्याच्या थंडीत गाडीत झोपलेली आढळली. तिथून त्याला तणावमुक्त आयुष्य कस असावं याचा विचार आला. घरात पुन्हा लग्नाचा तणाव आणि घरात राहणे हे त्याला पटेनासं झालं आणि त्याने पुन्हा घटस्फोट घेतला आणि व्हॅन घेऊन तो भटकायला लागला.

हळूहळू बॉब विल्सच्या जीवनशैलीत प्रचंड बदल झाले. दररोजच्या गोंधळाच्या आयुष्यातून तो वेगळा झाल्यामुळे निसर्ग, प्राणी, पक्षी, टेकड्या, झरे अशा अनेक गोष्टी त्याला सुखावह वाटू लागल्या. पुढे हळूहळू त्याला अशा घरगुती कारणांमुळे एकटे पडलेले लोक दिसू लागले आणि त्याने त्या लोकांना एकत्र घेऊन एक कम्युनिटी बनवली आणि तिला नोमॅडलँड कम्युनिटी म्हणून घोषित केलं.

या कम्युनिटीत घरातल्या कर्त्या पुरुषाचं किंवा पतीचं निधन झालेल्या स्त्रिया, अतोनात दुःख झाल्यामुळे एकटं पडलेल्या स्त्रिया, घरच्या जबाबदारीला वैतागलेले लोकं, मानसिक आजारामुळे त्रस्त असलेले लोक अशा हजारो त्रासांना वैतागलेली लोकं त्याला मिळत गेली त्या लोकांबद्दल तो लिहू लागला. जशी जशी लोक मिळत गेली तशी तशी हि नोमॅडलँड कम्युनिटी वाढू लागली.

या व्हॅनमध्ये सगळ्या जीवनावश्यक आणि तात्पुरत्या गोष्टी उपलब्ध असतात. या थोड्या गोष्टींमध्ये तणावविरहित जीवन कसं जगावं याबद्दल हि कम्युनिटी मार्गदर्शन करते. दरवर्षी या नोमॅडलँड कम्युनिटीचा मेळावा भरतो आणि तेव्हा या मेळाव्यात अनेक लोक उत्साहाने भाग घेतात आणि कम्युनिटी जॉईन करतात. नोमॅडलँडचा भाग होणारे अनेक लोक हि उच्चाधिकारी, व्यावसायिक, वैज्ञानिक आहेत. सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. स्वावलंबनाचे धडे घेतात.

बॉब वेल्स हा या भटक्या विमुक्त लोकांचा म्होरक्या असून अनेक रस्त्यावर जीवन जगणाऱ्या भटक्या लोकांसाठी आणि त्यांच्या भरभराटीसाठी , मदत करण्यासाठी त्याने होम ऑन व्हील्स अलायन्स नावाची ना नफा तत्वावर एक संस्था काढली आहे. वेल्स म्हणतो कि,

हजारो वर्षांच्या जीवनप्रवाहात जगण्याचं शहाणपण सांगणाऱ्या भटक्या लोकांच्या हालचाली वेगाने मुख्य प्रवाहात बदलत आहेत.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.