नॉमिनेट तर होतात पण भारतीय पिक्चर्सना ऑस्कर का मिळत नाही.

भारतातली जातीव्यस्था आणि पोलीस कस्टडीमध्ये होणारी क्रूरता याचं अचूक चित्र पडद्यावर दाखवणारा ‘जय भीम’ हा ‘तमिळ’ चित्रपट संपूर्ण भारतात गाजला होता. आता या पिक्चरची ऑस्करसाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा मल्याळम चित्रपट मारक्कर: अरबिकदलिंते सिंहम हा हि भारताचं ऑस्करमध्ये प्रतिनिधित्व करेल.

मात्र प्रत्येक वेळी ऑस्करला नॉमिनेट तर होतात मात्र ती ऑस्करची गोल्डन ट्रॉफी काय भारतात येत नाही. मराठी पिक्चर कोर्ट,श्वास, हरिश्‍चंद्राची फॅक्टरी जेव्हा ऑस्करसाठी गेले होते तेव्हाही आपण खुश झालो होतो मात्र पदरी पुन्हा निराशाच. त्यामुळं एकदा बघू तरी म्हटलं कार्यक्रम नक्की कुठं गंडतोय.

१)भारत आपले सर्वोत्तम चित्रपट ऑस्करला पाठवत नाही

जाणकार सांगतात की अनेक वेळा भारतातील बेस्ट पिक्चर भारताची ऑफिशियल एंट्री म्हणून ऑस्करला जात नाहीत. गँग्स ऑफ वासेपूर, पानसिंग तोमर,लंचबॉक्स यांसारखे चित्रपट भारताच्या ऑफिशियल एंट्रीचा भाग नव्हते. अनेकवेळा भारताच्या नॅशनल अवॉर्ड जिंकणारे चित्रपट ऑस्करसाठी मात्र पाठवले जात नाहीत.

२)हॉलीवूडची कॉपी करण्याची बॉलीवूडला लागलेली सवय  

प्रीतम सारखे संगीतकार काही परदेशी गाण्यांच्या चाली जसेच्या तसे उचलतात हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. पण पिक्चरमध्ये पण अनेक सीन हॉलीवूडमधून उचलले जातात. २०१२मध्ये भारताची ऑफिशियल एन्ट्री असलेल्या बर्फी पिक्चरमध्ये हॉलवूड क्लासिक ‘सिंगिंग इन द रेन’ चे अनेक सीन उचलण्यात आले होते.आता भारतात अशा थापा चालून जातेत पण ऑस्कर ज्युरी त्या बरोबर पकडतेत.

३) बॉलिवूडला दिलं जाणारं झुकतं माप-

मागच्या काही वर्षात भारताच्या ऑफिशियल एंट्रीमध्ये प्रादेशिक पिक्चर स्थान मिळवत असले तरी त्याआधी मराठी,बंगाली, तामिळ यांसारख्या प्रादेशिक भाषातून येणाऱ्या चित्रपटांवर अन्याय झाला असं बोललं जातं. 

आम्ही अगदीच म्हणत नाही की ‘अशी ही बनवा बनवी’ ऑस्करला पाठवा पण सामना, जैत रे जैत यांना पाठवण्यात काय हरकत होती.

४)ऑस्करला पिक्चर पाठवल्यांनंतर स्क्रिनिंगसाठी येणारा खर्च – 

ऑस्करला पिक्चर गेल्यांनतर तिथले ज्युरी यावर मतदान करतात. आणि या ज्युरींपर्यंत पिक्चर पोहचवण्याची जबाबदारी फिल्मच्या प्रोड्युसरची असते. ऑस्करतसं एक स्क्रिनिंग फ्री देतं पण त्याला सगळे ज्युरी येत नाहीत. त्यामुळं बाकीच्यांना दाखवण्यासाठी पुन्हा स्क्रिनिंग करावं लागतं. आणि याच स्क्रीनींगला लागणार खर्च अवच्या सव्वा असतोय. प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक वेट्रीमारान यांना त्यांच्या ‘विसरणाई’ यांच्या चित्रपटाच्या फक्त स्क्रीनींगसाठी $१७,५०० लागले होते.

५) ऑस्करच्या ज्युरींची मानसिकता –

ऑस्करला जे असतात ते तर तर एकतर गोरे अमेरिकन पुरुष त्यामुळं त्यांना बाकी कॅटॅगरीजवर अन्याय होतो असा आरोप असायचा. आता मात्र ऑस्करनं आपलं ज्युरीमंडळ सर्वसावेशक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तरीही फक्त अमेरिकेसाठी सुरु झालेल्या ऑस्करच्या ज्युरींना परदेशी चित्रपट किती कळतात यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. 

या सगळ्या कारणांशिवाय आपल्या चित्रपटांना मिळणारी एकमेव अधिकृत श्रेणी म्हणजे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट किंवा सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणी. आणि ह्या कॅटॅगरीमध्ये जगभरातून पिक्चर येतात. त्यामुळं इकडे कॉम्पिटिशन नेक्स्ट लेव्हल असतंय. जय भिमला पण ऑस्कर पटकवण्यासाठी २७६ चित्रपटांशी सामना करावा लागणार आहे.

त्यामुळं ही सगळी चॅलेंजेस झेलत जय भिम भारतात ऑस्कर आणणार का हे येणाऱ्या दिवसांतच कळेलच. बाकी तुम्हाला आणखी कोणते मराठी चित्रपट ऑस्करच्या यादीत असावेत असं वाटतं ते खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

Web title : Oscars: why did Indian Movies fail to win Oscars.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.