इंटरनेटवर राडा घालणारा हा आफ्रिकन तैमुर आहे तरी कोण?

आता फोटोवरून कळालच असल की आपण कोणाबद्दल बोलतोय. महाराष्ट्राच्या तैमुरचा आफ्रिकन भाऊ ओसिता इहमे. गेले कित्येक दिवस त्याच्या मिम( सभ्य भाषेत मेमे) नी अख्ख्या जगात धुमाकूळ घातलाय. आपल्या कावणाऱ्या बापाला धिस इज बिजनेस म्हणून सांगणारा छोटू आपल्या सगळ्यांच लाडका आहे. महाराष्ट्राच्या तैमुरप्रमाणे तो थोडा आगाऊ आहे पण तरी तो आपल्याला आवडतो.

पण सांगायची गोष्ट म्हणजे हा छोटू छोटा नाही तर तब्बल ३८ वर्षांचा आहे. म्हणजे जरा कमी चाळीस. धक्का बसला ना?

होय. ओसिता इहमेचा जन्म २० फेब्रुवारी १९८२चा. नायजेरियाच्या अबिबा शहरात लहानाचा मोठा झाला. पाच भावंडापैकी एक.  घरची परिस्थिती नायजेरिया च्या इतर कुटुंबाच्या मानाने चांगली होती.वयाच्या आठव्या वर्षी त्याला कुठला तरी रोग झाला आणि त्याची उंची ४ फुटावरच खुंटली. त्याचा गोड निरागस चेहरा तसाच राहिला. बडबडायचा भरपूर, त्याचा कॉमेडीचा सेन्स बघून सगळे म्हणायचे याला पिक्चरमध्ये घातल पाहिजे. ऑफर पण येऊ लागलो.

पण ओसिताने बरोबरच्या मुलांप्रमाणे व्यवस्थित वेळेत शिक्षण पूर्ण केलं. लाओस विद्यापीठातून कम्प्युटर सायन्स मध्ये डिग्री घेतली. मग फिल्म कडे वळला. (कळाल का बाबा तैमुर. शिक्षण महत्वाच असतंय बेटा. राजकारण सिनेमा नंतर)

त्याचा पहिलाच सिनेमा होता अकीना उकावा. यात त्याला पावपाव या लहानमुलाचा रोल मिळाला.

त्याच्या सोबत होता त्याच्यासारखाच चिनेडू इकेडीझी (नावातील चूकभूल देणेघेणे) हा वयाने त्याच्या पेक्षा मोठा होता पण उंचीला दोघे सेम. या पहिल्याच सिनेमात दोघांनी आपल्या खोड्यांनी राडा घातला. सिनेमा तुफान चालला. लोक या दोघांच्या प्रेमात पडले.

पुढे प्रत्येक सिनेमात त्यांना तशाच भूमिका मिळू लागल्या. सांगून पटणार नाही पण उंचीला छोट्या असणाऱ्या पण मोठ्या माणसांच्या प्रमाणे गप्पा हाणणारे हे दोघे नायजेरियन सिनेमाचे सुपरस्टार झाले. सुरवातीला टाइपकास्ट झालेले ओसिता आणि चिनेडू त्यांच्या वयाच्या भूमिका देखील करू लागले. त्यात देखील यशस्वी झाले. खोऱ्याने पैसे आणि पुरस्कार मिळू लागले.

शंभरच्या वर सिनेमात त्यांनी काम केलंय. दोघानाही आफ्रिकेचा ऑस्कर समजल्या जाणाऱ्या अॅकेडमी अवार्डच्या लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डने सन्मानित करण्यात आलंय.

आजही त्यांची गणती नायजेरियाच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये होते. त्यांची करोडोची मालमत्ता आहे. मोठ्या कार्समध्ये फिरतात, राजवाड्यासारख्या घरात राहतात. सोन्याच घड्याळ वापरतात. ओसिताच्या गर्लफ्रेंडची त्याचं सिक्रेट लग्नाच्या गॉसिप चर्चा नायजेरिया मध्ये खूप चालतात. खरं सेलिब्रेटी लाईफ ते जगतात.

इतके असले तरी आपल्या खोडकर दिसणाऱ्या चेहऱ्यामागे ओसिताने सामाजिक भान जपलंय. नायजेरिया आणि एकंदरीतच आफ्रिका खंडात पसरलेल्या गरिबीची परिस्थिती भयावह आहे.

ओसिताने वेगवगळ्या सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आफ्रिकन मुलांच्या शिक्षणासाठी त्याने बरेच पैसे खर्च केले आहेत. 

थिस इज बिजनेस म्हणणाऱ्या ओसिताने खरोखरच नायजेरियाच्या वेगवेगळ्या उद्योगात आपले पैसे गुंतवले आहेत. त्याला राजकारणातदेखील इंटरेस्ट आहे. नायजेरियन आणि आफ्रिकन तरुणांच्यासाठी त्याने इंस्पीरेशन प्रेरणा चळवळ सुरु केली आहे. तसेच INSPIRED 101. नावाचे त्याने लिहिलेलं पुस्तक देखील खूप प्रसिद्ध आहे.

एवढे दिवस तो आफ्रिकेत फेमस होताच पण गेल्या वर्षी कोणी तरी त्याचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केले आणि राडा झाला

जर्मनी असो की परभणी ओसिता आणि चिनेडूने पंधरा वर्षापूर्वी काम केलेल्या सिनेमातील प्रत्येक सीन आज भाषेची बंधने तोडूंन तुमच्या आमच्या मोबाईल मध्ये पोहचलाय, आपल्याला हसवतोय.

आपल्या मित्राला नेमक काय म्हणायचय ते ओसिताच्या एका फोटो मिमवरून आपल्याला कळत. एवढी ताकद त्या दोघांच्या एक्सप्रेशन मध्ये आहे. आज या लाडक्या छोटूचा ३८ वां वाढदिवस. त्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Mohsin 735 says

    भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …..????????????

Leave A Reply

Your email address will not be published.