म्हणून जगभरात नाव गाजवलेल्या इंग्रजाचा शिलालेख खानदेशातल्या धरणगावात उभारलाय

धरणगाव शहरात ब्रिटिश अधिकारी औट्रम बद्दलचे दोन दुर्मिळ शिलालेख सापडल्याची बातमी काल सगळीकडे प्रसिद्ध झाली. खरे तर इतिहासाचा एक अभ्यासक म्हणून माझी खूप दिवसांची इच्छा होती की, धरणगाव (जिल्हा, जळगाव) येथे जावे. धरणगाव हे ब्रिटिश काळातील खानदेशच्या जिल्ह्याचे ठिकाण होते.

तेव्हाचा खानदेश जिल्हा म्हणजे आताचे धुळे, नदुरबार जळगाव ते पार बरहानपूर पर्यंतचा प्रदेश त्यात येत असे. या ठिकाणी ब्रिटीशांच्या वखारी (फॅक्टरीज) होत्या. 

पार्थला आठवीच्या इतिहासातील फॅक्टरी म्हणजे काय हे त्याला सांगतांना पुस्तकातील  पुढील वाक्य त्याला समजून सांगितली होती,

“This was the base from which the Company’s traders, known at that time as “factors”, operated. The factory had a warehouse where goods for export were stored, and it had offices where Company officials sat. As trade expanded, the Company persuaded merchants and traders to come and settle near the factory.”

त्यामुळे किमान त्याचे अवशेष तरी बघून यावे असे वाटत होते. माझे हे वाटने मी आमचे मित्र, मार्गदर्शक, इतिहासकार, हेरिटेज फाउंडेशनचे संचालक व डेक्कन अर्कीयोलोजिकल अँड कल्चरल रिसर्च इंस्टीट्यूट, हैद्राबादचे डायरेक्टर श्री भुजंग बोबडे यांना बोलून दाखवल्यावर त्यांना देखील ही कल्पना आवडली. अलीकडे आम्ही सोबत अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यामुळे अशा काही नवीन कल्पनांसाठी सर कायमच उत्साहाने तयार असतात.

पण कालचा दिवस महत्वाचा होता. बोबडे सरांना जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच माहिती दिली होती की, धरणगाव येथे शिलालेख सारखं काही सापडले आहे. त्यामुळे इतर स्थळांना भेटी देण्यासोबतच तेही बघणे होईल असे बोबडे सरांनी सांगितले.

रविवारी आम्ही निघालो. श्री. बोबडे सर, मी, सोबत मित्र व  इतिहासाचे अभ्यासक सुशीलकुमार अहिरराव, मित्र आर.के वर्मा व अर्थातच पार्थ देखील सोबत होता. कारण त्याला पण या प्रकाराबाबत उत्सुकता होती. असे आम्ही सगळे जन धरणगावला पोहचलो. धरणगाव येथील नायब तहसीलदार श्री प्रथमेशऊ मोहोड हे देखील तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचले व पुढील सर्व वेळ ते आमच्या सोबतच होते.धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयाच्या परीसरात बांधकामाची दुरूस्ती करत असताना दोन मोठे वर्तुळाकार शिलालेख प्राप्त झालेले दिसले.

WhatsApp Image 2021 07 06 at 12.26.26 PM

हे दोन्ही शिलालेख चांगल्या स्थितीत होते. एक मराठी व एक इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील पण एकच मजकूर असलेले हे दोन्ही शिलालेख चक्क वर्तुळाकार होते. ते किती दिवसापासून कुठे होते? की एखाद्या जुन्या बांधकामात गाडले गेले होते? हाही इतिहास अज्ञातच आहे. त्यांच्या भाषेवरुन हे दोन्ही शिलालेख 19 व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील आहेत असे श्री बोबडे सर यांचा अंदाज आहे. हे दोन्ही शिलालेख जेम्स औट्रमबद्दल आहेत.

एक साधा सैनिक म्हणून ब्रिटिश सैन्यात लागलेला व नंतर लेफ्टनंट जनरल या पदापर्यन्त मजल मारणार्‍या, कानपुर व लखनौ येथे 1857 च्या उठावात केलेल्या कामगिरीबद्दल गौरवल्या गेलेल्या, अफगाण व सिंध युद्धात पराक्रम गाजविणार्‍या, अनेक ठिकाणी रेसिडेंट म्हणून काम केलेल्या, लंडन, कलकत्ता अशा विविध ठिकाणी ज्याचे पुतळे बसविले गेले. ज्याच्यावरून रस्ते,घाट व शहरांना नावे दिली गेलीत. अशा या जेम्स औट्रम बद्दल हे दोन्ही शिलालेख आहेत.

ज्याची कारकीर्द इतकी व्यापक होती व जगभर त्याच्या कार्याचा गौरव झाला होता. त्याचे धरणगाव सारख्या छोट्या गावात काय काम? व त्याचे शिलालेख इथे कसे सापडले.  कोण होता जेम्स औट्रम?

सर जेम्स औट्रम (१८०३-१८६३).- हा प्रसिद्ध इंग्लिश सेनापति बेंजामिन औट्रम या एंजिनीयरचा मुलगा होता. त्याच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या आतच वडील वारल्यामुळें त्याची आई त्याला घेऊन अबर्डीन येथें रहावयास गेली. तेथेंच त्याचें प्राथमिक शिक्षण झालें. १८१८ सालीं अबर्डीन येथील मॅरिस्कल कॉलेजमध्यें त्याला ठेवण्यांत आलें. १८१९ सालीं हिंदुस्थानच्या लष्करी खात्यांत लेफ्टनंट म्हणून तो रुजू झाला. 5 ऑगस्ट 1819 ला 4th native infantry battalion मध्ये भरती करून त्याला खांदेशातील धरणगाव या मुख्यालयी पाठविण्यात आले.

धरणगाव (जिल्हा,जळगाव)- खांदेशातील धरणगाव हे ब्रिटिशकालीन जिल्ह्याचे केंद्र होते. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलिस मुख्यालय हे धरणगाव याच ठिकाणी होते. शिवकाळापासून धरणगाव हे बाजारपेठेचे गाव आहे. सुरतेवरून येता येता महाराज येथे थांबल्याची वंदयता आहे. कापसाची व मिरच्यांची मोठी बाजारपेठ असल्याने ब्रिटिशकाळात धरणगावला विशेष महत्व होते.

गुजरात रेल्वेलाइनवर असल्याकारणाने व तत्कालीन ब्रिटिशांची मोठे केंद्र असलेल्या सूरतला रेल्वेने जोडलेले असल्याने खांदेशातील कापूस निर्यात करण्यासाठी ब्रिटीशांना धरणगावचे विशेष महत्व होते.

येथे ब्रिटिशांची मोठी फॅक्टरी होती. वखारी होत्या. अजूनही त्या बांधकामाचे अवशेष या गावाच्या चोहोबाजूने दिसून येतात. गुड शेपर्ड स्कूल ही जुनी शाळा आहे. येथील अनेक जुन्या इमारतींना पाहिल्यावर इंडो-गॉथिक शैलीची आठवण येते. येथे बंद पडलेल्या व भग्न अवस्थेत असलेल्या जुन्या कॉटन जिनिंग आहेत. तीन step-well (बावडी/पायर्‍यांच्या विहीर) या परिसरात पाहायला मिळतात. जुने भवानी देवीचे व महादेव मंदिर आहे.

बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे हे जन्मगाव. फुलराणी व औंदुबर सारख्या अजरामर कविता लिहिणार्‍या बालकवींचे एखादी स्मारक या ठिकाणी खरे तर व्हावे अशी अपेक्षा. आम्ही आवर्जून त्या ठिकाणाला भेट दिली जिथे बसून औंदुबर सारखी कविता बालकवींनी लिहिली. त्या ठिकाणी आता औंदुबर देखील राहिलेला नाही. पण त्यात वर्णन केलेला ‘निळासावळा झरा’, ‘काळा डोह’ मात्र अजुनीही आहे.

धरणगाव व औट्रम – अशा या ऐतिहासिक शहरात 1825 ते 1835 अशी दहा वर्ष औट्रम राहत होता. येथेच औट्रमचे कार्यालय व निवासस्थान देखील होते. पुढे हेच निवासस्थान 1887 पासून महाराणी व्हिक्टोरिया ज्युबिलीच्या स्मारकप्रीत्यर्थ धर्मार्थ दवाखाना(charitable dispensary)म्हणून वापरण्यास सुरुवात झाली.(असा एक शिलालेखिय उल्लेख देखील या ठिकाणी सापडतो.) आज देखील ग्रामीण रुग्णालय म्हणून त्याचा वापर केला जात आहे.

WhatsApp Image 2021 07 06 at 12.26.25 PM

हे ग्रामीण रुग्णालय व त्याच्या बाजूला असलेले नगरपालिका भवन हे तत्कालीन प्रशासकीय इमारतींचे संकुल असल्याचा इतिहास अभ्यासकांचा दावा आहे.

आम्ही दिनांक 05/07/2021 रोजी गेलो असतो जे वर्तुळाकार दगडात कोरलेले शिलालेख आम्हाला उपलब्ध झाले ते याच ठिकाणी. खरे तर ते शिलालेख आता व्यवस्थित जतन करणे गरजेचे आहे. खानदेश येथें असतांना येथील भिल्ल लोकांवर औट्रमने आपल्या अंगच्या कर्तबगारीनें चांगली छाप बसविली व त्यांचें एक पथक(फलटण) अर्थात भिल रेजिमेंट निर्माण करून शास्त्रीय पद्धतीनें त्या पथकाला त्यानें चांगलें लष्करी शिक्षण दिलें. या पथकाच्या साहाय्यानें खानदेशांतील लुटारूंचा त्यानें चांगला बंदोबस्त केला. धरणगाव येथे त्यांच्यासाठी मोठी वसाहत देखील त्याने बांधली होती.

त्याला शिकारीचा विलक्षण नाद असल्यामुळें व शिकारीवर असतांना आणीबाणीच्या वेळीं जीं त्यानें अनेक अचाट साहसें केलीं त्यामुळें या भिल्ल लोकांची त्याच्यावर अतिशय भक्ति जडली होती. विश्वास बसला होता. औट्रमने उभी केलेली भिल रेजिमेंट पुढे ज्या ज्या ठिकाणी आदिवासींचा उठाव व्हायला लागला तेथे होऊ लागला. बॉडीगार्ड म्हणून देखील भिल रेजिमेंट मधील सैनिक काम करू लागले.

लहानपणीं औट्रम फार अशक्त असे पण पुढें त्यानें चांगलेंच शरीर कमावलें व तो सहा फूट उंचीचा जवान बनला. १८३५ मध्यें त्याला गुजराथमध्यें पाठवण्यात आलें व तेथें असतांना कांहीं काळ त्यानें ‘पोलिटिकल एजंट’ या नात्यानें काम केलें. १८३५ ते १८३८ पर्यंत गुजरातमधील संस्थानिकांचे उठाव मोडण्याचे काम देखील त्याने केले.

गौताळा- औट्रम घाट व औट्रम- आजच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर चाळीसगाव व कन्नड यांच्या मध्ये असलेल्या घाटाला औट्रम घाट म्हटले जाते, याचा याच रस्त्यावरून प्रवास करणार्‍या अनेकांना पत्ताच नाही. कारण त्याला कन्नडचा घाट म्हणून कॉमन पब्लिक ओळखते. ज्यांना किमान इतके माहिती आहे की या घाटाला औट्रम  घाट म्हटले जाते त्यातिल अनेकांना असे वाटते कि, औट्रम म्हणजे या रस्त्याचा व घाटाचा इंजिनीयर होता. त्यापलीकडील औट्रम  त्यांना अवगत नसतो.

या भागातील अगदी एमपीएससी यूपीएससी करणार्‍या बर्‍याच विद्यार्थ्याना देखील औट्रम घाटाचा औट्रम व 1857 च्या उठावात कानपुरमध्ये हॅवलॉकला मदत करणारा, लखनौ उठावात ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करणारा, अवधचा पहिला कमिशनर म्हणून नेमणूक झालेला लेफ्टनंट जनरल औट्रम हा सेमच आहे याची जाणीव व ज्ञान दोन्ही नसते.

तर असो, तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍यांप्रमाणेच औट्रमला देखील शिकारीची आवड होती. धरणगाव येथे असतांना औट्रम याने ज्या बहुतांश शिकार केल्या त्या तत्कालीन घनदाट जंगल असलेल्या गौताळा घाटात केल्या. 1681 ला औरंगजेबाने या घाटाला प्रथम दुरुस्त केले असल्याच्या नोंदी मिळतात. 1827 ते 30 च्या काळात धरणगाव येथे सेवेत असतांना औट्रमने भिल्लांच्या मदतीने या घाटाचे बरेच काम केले होते व तो रस्ता पहिल्यापेक्षा अधिक सोयीचा केला होता. तसेच या घाटात होणार्‍या लूटमारीचा देखील त्याने बंदोबस्त केला होता.

औट्रमच्या या सर्व कामाची दखल घेत जेव्हा 1872 ला मोटरगाडी नेण्याइतपत हा घाट मजबूत बनविण्यात आला. तेव्हा खानदेशचे कलेक्टर असलेले अॅशबर्नर यांनी या घाटाचे उद्घाटन केले व त्यास औट्रम घाट असे नाव दिले.

अफगाण युद्ध व औट्रम –

१८३८ मध्यें पहिलें अफगाण युद्ध सुरू झालें. त्या वेळीं सर जॉन कीन याचा ए. डी. सी. म्हणून औट्रमची नेमणूक झाली. या कामावर असतांना त्यानें पुष्कळ शौर्याचीं कृत्यें केलीं. त्यांतल्या त्यांत गझनीजवळील झटापटींत शत्रूंचें निशाण काबीज करण्यांत त्यानें जी मर्दुमकी गाजविली ती खरोखर वाखाणण्यासारखी होती. या त्याच्या धाडसी कृत्यामुळें त्याला मेजरचा हुद्दा प्राप्त झाला.

सिंध प्रांत व औट्रम –

१८३९ मध्यें त्याला लोअर सिंधचा पोलिटिकल एजंट नेमण्यांत आलें. नंतर थोड्याच दिवसांत अपर सिंधचा पोलिटिकल एजंट म्हणूनहि त्याची नेमणूक झाली. या जागेवर असतांना त्याचा वरिष्ठ अंमलदार सर चार्लस नेपीयर हा होता. नेपीयरच्या मनांत अपर सिंध खालसा करावयाचा होता. या गोष्टीला औट्रम हा प्रतिकूल होता. त्यानें नेपीयरच्या कृत्यावर निर्भिडपणें सणसणीत टीका केली. पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं.

पुढें कांहीं दिवस लोटल्यानंतर ८००० बलूंची लोकांनीं हैद्राबाद येथील गोर्‍या लोकांच्या छावणीवर छापा घातला. त्यावेळीं औट्रम यानें आपल्या शौर्याची पराकाष्ठा करून आपल्या छावणीचें संरक्षण केलें. या वेळीं त्याची सर्वांनीं फारच तारीफ केली.

खुद्द नेपीयरनेहि ‘हिंदुस्थानचा बायार्ड’ असें यास उपनांव दिलें.

बडोदा/लखनौ/अवध/पर्शिया व औट्रम-

1843 मध्यें त्याला मराठी मुलुखांत पाठवण्यात आलें. या वेळीं त्याला लेफ्टनंट कर्नल असा हुद्दा मिळालेला होता. 1847 त त्याला बडोदा येथें पाठवण्यांत आलें. बडोद्यास असतांना, त्यानें इंग्रज अधिकार्‍यांनीं चालविलेल्या लांचलुचपतीच्या प्रकारावर उघड टीका केली. त्यामुळें मुंबई सरकारचा त्याच्यावर कांहीं काळ रोष झाला. 1854 मध्यें लखनौच्या रेसिडेंटच्या जागीं त्याची नेमणूक झाली.

1856 सालीं त्यानें अयोध्या प्रांत इंग्लिशांच्या राज्याला जोडला व तो त्या प्रांताचा कमिशनर झाला. त्याला पर्शियावर स्वारी करण्यास पाठवण्यात आलें. खूशाब येथें त्यानें शत्रूंची कत्तल करून त्यांनां शरण यावयास लावलें. या त्याच्या पराक्रमाबद्दल त्याला ‘ग्रँड क्रॉस ऑफ दि बाथ’ हा बहुमानाचा किताब देण्यांत आला.

1857 चा उठाव व औट्रम –

पर्शियामधून औट्रमला पुन्हां हिंदुस्तानांत बोलावण्यांत आलें, व कलकत्त्यापासून तो कानपूरपर्यंतच्या टापूंत जें लष्कर होतें त्याच्यावर त्याला अंमलदार नेमण्यांत आलें. याशिवाय अयोध्येच्या कमिशनरचें काम त्याच्याचकडे सोंपविण्यांत आलें. हें साल 1857 होतें. बंडाच्या धामधुमीला नुकतेंच तोंड फुटलें होतें. बंडखोरांच्या मार्‍यापुढें टिकाव धरणें अशक्य झाल्यामुळें हॅवेलॉक सेनापतीला कानपूर येथें आश्रय घ्यावा लागला होता.

औट्रम हा आपल्या सैन्यानिशीं कानपूर येथें हॅवेलॉकच्या मदतीला आला. त्यानें लगेच हॅवेलॉकला लखनौ येथील फौजेच्या मदतीला पाठवलें व त्याच्याबरोबर स्वयंसेवक या नात्यानें तो गेला. मंगलवार व अलमबाग येथील हल्ल्यांत त्यानें चागलेंच शौर्य गाजविलें व शत्रूंचा धुवा उडविला. त्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉस देण्यांत आला. लखनौच्या दुसर्‍या वेढ्यांच्या प्रसंगी गोमती नदीच्या बाजूच्या बंडवाल्यांच्या सैन्यावर त्याला पाठवण्यांत आलें.

या हल्ल्यांतहि त्यानें जय संपादन करून बंडवाल्याचा कायमचा बंदोबस्त केला. लखनौ इंग्लिशांच्या ताब्यांत आलें.

औट्रम याला लेफ्टनंट जनरल करण्यांत आलें. १८५८ मध्यें पार्लमेंटमध्यें त्याचे जाहीररीत्या आभार मानले. व त्याला बॅरोनेट करण्यांत येऊन एक हजार पौंडांचा सालिना तनखाहि देण्यांत आला.

पुढें त्याची प्रकृति नादुरूस्त झाल्यामुळें तो १८६० मध्यें इंग्लंडास परत गेला. त्याच वर्षी कलकत्ता येथे औट्रम इंस्टीट्यूट या नावाची सैंनिकांसाठी एक स्वतंत्र संस्था ब्रिटिश सरकारने सुरू केली होती.   त्यानें केलेल्या शौर्याबद्दल त्याचें अभिनंदन करण्यासाठीं इंग्लिशांनीं एक जंगी मिरवणून काढली व त्याला एक मानपत्र अर्पण करण्यांत येऊन, लंडन व कलकत्ता येथें त्याचा पुतळा उभा करण्याचें ठरलें. तो १८६३ च्या मार्च महिन्यांत 11 तारखेला मरण पावला.

त्याचें शव वेस्ट मिन्स्टरमध्यें पुरण्यांत आलें व त्याच्या थडग्यावर ‘बेअर्ड ऑफ इंडिया’ हे अर्थपूर्ण शब्द कोरण्यांत आले.

तेव्हाच्या टाइम्स ऑफ इंडियाने त्याच्या निधनाची बातमी देतांना एक छान ओळ वापरली होती- ‘No lips will open’. 1863 ला लंडन येथे त्याचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. कोलकता येथे देखील त्याचा पुतळा आहे. हुगळी नदीच्या किनारी असलेला घाट देखील औट्रमच्या नावाने ओळखला जातो. पाकिस्तानच्या जमशेदाबाद या शहराचे नाव पूर्वी औट्रमच होते. अशा या जागतिक किर्तिच्या ब्रिटिश अधिकारी व सेनानीच्या कारकीर्दीची सुरुवात खानदेशमधील धरणगाव या लहानशा गावातून झाली. आपल्या आयुष्याची दहा वर्ष तो या ठिकाणी राहत होता.

  •  समाधान महाजन
Leave A Reply

Your email address will not be published.