कुमारस्वामी म्हणतायत, बिटकॉईन घोटाळ्यात जनधन खात्यातुन ६००० कोटी गायब झालेत

आपल्या देशालाच काय सगळ्या जगालाच आता घोटाळ्यांची सवय झालीये. घोटाळ्यांच्या मार्केटमध्ये नवं काय आलं असेल, तर आभासी चलन. थोडक्यात बिटकॉईन, डॉजेकॉईन अशी आभासी करन्सी. या आभासी करन्सीच्या जोरावर जगात मोठमोठे व्यवहार होतायत आणि तेवढेच मोठे गफलेही.

कर्नाटकमध्येही एक असाच मोठा बिटकॉईन गफला झाला होता. त्यामुळं उडालेला धुरळा शांतही झाला होता. मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या घोटाळ्याबाबत केलेल्या आरोपांमुळं पुन्हा दंगा उठलाय.

कुमारस्वामी यांनी आरोप केलाय की, बिटकॉईन घोटाळ्यात लोकांची जनधन खाती हॅक करून प्रत्येक खात्यातून दोन-दोन रुपये करत एकूण ६००० कोटी गायब करण्यात आले आहेत. मला माहीत नाही हे कितपत खरंय, पण आकडा नक्कीच ६ हजार कोटींच्या जवळपास आहे. राज्यातलं भाजप सरकार हे प्रकरण झाकून टाकण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे.

सगळ्यात आधी बिटकॉईन घोटाळा काय आहे हे सांगतो-

बंगळुरू क्राईम ब्रँच पोलिसांनी नोव्हेंबर २०२० मध्ये श्रीकृष्ण रमेश उर्फ श्रीक्की आणि त्याच्या सहकाऱ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अटक केली. श्रीक्की आणि त्याच्या सहकाऱ्यांवर डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्स विकत घेऊन ते हाय-प्रोफाईल ग्राहकांना विकल्याचा आरोप होता. या खरेदी विक्रीत बिटकॉईनचा वापर करण्यात आला होता. आणखी तपास केल्यावर हे लक्षात आलं की, श्रीकृष्ण हा हॅकर असून बिटकॉईन एक्स्चेंज हॅकिंग, क्रिप्टोकरन्सीची चोरी, मनी लाँड्रिंग आणि सायबर फसवणुकीत त्याचा सहभाग आहे.

त्याचा कर्नाटक सरकारच्या ई-खरेदी पोर्टल हॅकिंगमध्ये सहभाग असल्याचं उघड झालं. त्या घोटाळ्यात जवळपास ११ कोटींचे गैरव्यवहार झाले. सोबतच ड्रग्स प्रकरणात त्याच्याकडून ९ कोटी रुपयांचे ३१ बिटकॉईन जप्त करण्यात आले.

पोलिसांना दिलेल्या जबाबात श्रीकृष्णनं, ‘आपण नेदरलँडमध्ये असताना हाँगकाँगची क्रिप्टोकरन्सी बिटफिनेक्स दोनदा हॅक केल्याचं सांगितलं. सोबतच कर्नाटक सरकारची वेबसाईट हॅक करून २८, १८ आणि २ कोटी रुपये तीन वेगवेगळ्या अकाऊंट्समध्ये ट्रान्सफर करणार होतो. मात्र २८ कोटींच्या दुसऱ्या ट्रान्सफर वेळी सरकारला माहिती मिळाली आणि आम्ही व्यवहार पूर्ण केला नाही,’ अशी माहिती दिली.

यावरून राजकारण तापलंय

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या आरोपांनंतर, काँग्रेस नेते प्रियांक खडगे यांनीही राज्यातल्या भाजप सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘सध्याचं सरकार बिटकॉईन घोटाळ्याचा तपास टप्प्याटप्यानं बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. या काही कोटी रुपयांच्या घोटाळ्यात भाजपचे मोठे नेते, त्यांची मुलं आणि राज्यातल्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. अंमली पदार्थाचे व्यवहार करण्यासाठी आणि त्याचा तपास बंद करण्यासाठी बिटकॉईन्सचा वापर झाला आहे. यामुळं गुंतवणुकीतलेही घोटाळे झाले आहेत.’

‘राज्य सरकारनं या प्रकरणातली कागदपत्रं सार्वजनिक करावी आणि तपास ईडी किंवा सीबीआयकडे सोपवावा. अमेरिकेच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी हा मुद्दा पीएम ऑफिसकडे उपस्थित केला आणि त्यानंतर बिटकॉईन घोटाळा उघडकीस आला,’ असा आरोपही त्यांनी केला.

या सगळ्या प्रकरणामुळं विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आपली खुर्ची गमवावी लागेल आणि २००८-१३ या कालावधीप्रमाणं भाजपला तिसरा मुख्यमंत्री बघावा लागेल, असा दावाही खडगे यांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, मोदींनी संवाद साधलाच नाही-

मीडियातल्या वृत्तांनुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, ‘या प्रकरणात आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी प्रयत्न केला असता त्यांनी संवाद साधला नाही. त्यांनी फक्त गंभीरतेनं काम करा, सगळं काही ठीक होईल असा सल्ला दिला. गृहमंत्री अमित शहा यांना मात्र बिटकॉईन घोटाळ्याबाबत पुरेशी माहिती आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.

आता खरंच जनधन खात्यांमधून दोन दोन रुपये करत पैसे गायब झाले असतील, तर विषय मेजर गंभीर झालाय. आता तपासात आणखी काही राज्यांची नावं पुढं यायला नको म्हणजे झालं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.