मागणी आजची असली, तरी भारतात नोटांवरचे फोटो बदलण्याचा इतिहास दीडशे वर्ष जुनाय…

मुस्लिमबहुल देश असलेल्या इंडोनेशियाच्या नोटांवर हिंदू देवीदेवतांचे फोटो बघून भारतील हिंदू धर्मियांना आनंद होतो. पण इंडोनेशियाचं अनुकरण करून भारताच्या चलनी नोटांवर सुद्धा हिंदू देवीदेवतांची चित्र छापण्यात यावीत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केलीय.

अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन या मागणीबद्दल माहिती दिलीय. 

ते म्हणाले की, “भारत एक विकसित राष्ट्र व्हावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. ही गोष्ट देवी देवतांच्या आशीर्वादानेच शक्य आहे. म्हणून भारतीय नोटांवर एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला देवी लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा छापली पाहिजे. देवी लक्ष्मीला समृद्धीची देवी मानण्यात येते तर गणेशाला विघ्नहर्ता मानतात, त्यामुळे दोघांच्या प्रतिमा फोटोवर छापल्यास त्याचा फायदा देशाला होईल.”

“हा बदल करतांना सरसकट सगळ्याच नोटा बाद न करतात टप्प्याटप्प्याने हा बदल करावा.” अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. पण केजरीवालांची मागणी टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल की नाही ही नंतरची गोष्ट आहे. 

पण आतापर्यंत भारतीय नोटांमध्ये कोणत्या टप्प्यावर कोणते बदल करण्यात आलेय ही स्टोरी मात्र इंटरेस्टिंग आहे.

खिशामध्ये २, ५ चे एक दोन सुट्टे नाणे असले की काही वाटत नाही पण तेच जर जरा जास्तच असले की, डोक्याला पार ताप येतो असा अनेकांचा अनुभव असेल. पण यावर असलेला नोटांचा रामबाण उपाय हा इंग्रजांनी त्यांच्या काळातच करून ठेवला होता. १८६१ मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात कागदी नोटा छापण्याची परवानगी देणारा कायदा पारित केला. त्याच कायद्यानुसार भारतातल्या प्रेसिडेन्सी बँकांनी  राणी व्हिक्टोरीयाचा फोटो असलेल्या नोटा छापायला सुरुवात केली.

पण म्हणतात ना सुक्यासोबत ओलं सुद्धा जळतं, अगदी त्याचप्रमाणे नोटांसोबत नकली नोटा सुद्धा यायला लागल्या. 

यामुळेच १८६८ मध्ये प्रेसिडेन्सी बँकांचे नोटा छापण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि हे अधिकार अकाउंट जनरल आणि चलन व्यवस्थापकाकडे देण्यात आले. मग त्यांनी राणी व्हिक्टोरीयाचा फोटो असलेल्या १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नवीन नोटांची सिरीज छापायला सुरुवात केली. एका साध्या कागदावर ब्लॅक अँड व्हाईट छपाई करून या नोटा तयार व्हायच्या.

पण जसजशी छपाईच्या तंत्रज्ञानात प्रगती झाली तसतसे नोटांमध्ये सुद्धा बदल होत गेले.

१९०१ मध्ये राणी व्हिक्टोरीया यांच्या निधनानंतर भारतीय नोटांमध्ये बदल करण्यात आले. राणीच्या फोटोऐवजी भारत सरकारच्या नावाने नोटांची छपाई सुरु करण्यात आली. या नोटांमध्ये हिरव्या आणि लाल रंगाच्या सिरीज होत्या, त्यात हिरव्या रंगाच्या नोटांवर ४ भाषांमध्ये लिहिलं जात होत तर लाल रंगाच्या सिरीजमध्ये ८ भाषांचा वापर केला जात होता. तसेच मागणीनुसार ५ रुपयांची नोट सुद्धा सुरु करण्यात आली होती.

या नोटा मोल्ड पेपरमध्ये छापल्या जात होत्या. त्यात व्हेव्ही लाईन, वॉटरमार्क, नोटा छापणाऱ्याचा कोड, गिलो पॅटर्न आणि रंगीत अंडरप्रिन्ट करण्यात येत होती.  

पण १९२३ मध्ये पुन्हा एकदा नोटांमध्ये राजेशाही फोटोंचा वापर सुरु झाला.  मे १९२३ मध्ये पाचवे किंग जॉर्ज यांचा फोटो असलेल्या १० रुपयाच्या नोटांची छपाई करण्यात आली. हळुहळू सर्व नोटांवर किंग जॉर्ज यांचा फोटो छापण्याला सुरुवात झाली. नोटा छापल्या जायच्या परंतु या नोटांमध्ये सुसूत्रता नव्हती. 

पण या १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि नोटांमध्ये सुसूत्रता आली.

रिजर्व्ह बँकेला सगळे व्यवहार स्वतःच्या हातात घेतल्यानंतर १९३६ मध्ये किंग एडवर्ड आठवा याच्या फोटोचा वापर करून नवीन नोटा छापण्याची तयारी केली. पण राजाने पदाचा त्याग केल्यामुळे नोटांची छपाई बारगळली. मग २ वर्षांनी १९३८ मध्ये किंग जॉर्ज सहावे यांच्या फोटोचा वापर करून नोटा छापण्यात आल्या.

पुढे याच सहावे किंग जॉर्जच्या राजवटीत १९४७ सालात भारताला स्वातंत्र्य मिळालं.

पण नुकत्याच स्वतंत्र झालेला भारत नवीन संविधान लागू होईपर्यंत ब्रिटिशांच्या अधिपत्याखालीच होतं. म्हणून १९४९ पर्यंत किंग जॉर्ज सहावे यांचा फोटो असलेल्या नोटा चलनात होत्या. स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये महात्मा गांधींची हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर त्यांचा फोटो नोटांवर छापण्याचा विचार करण्यात आला मात्र यावर निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा होता.

यावर उपाय म्हणून १९४९ मध्ये १ रुपयांच्या नोटेवर असलेला किंग जॉर्ज सहावे यांचा फोटो काढून त्यावर भारताची राजमुद्रा छापण्यात आली. 

१९५० मध्ये राजमुद्रा असलेल्या २,५ आणि १० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. या नोटा लाल, हिरवा आणि जांभळ्या रंगाच्या होत्या. तर १९५३ मध्ये १ हजार, ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटांवरचे चित्र सुद्धा बदलण्यात आले आणि त्यावर त्रिमुखी सिंहाची मुद्रा छापण्यात आली होती.

राजाचा फोटो नोटेतून काढून टाकण्याबरोबरच समुद्रावर तरंगणाऱ्या जहाजेचे सुद्धा फोटो काढून टाकण्यात आले. तर त्याजागी हरीण, वाघ, हत्ती यांसारख्या प्राण्यांचे फोटो २ आणि ५ रुपयांच्या नोटेवर छापायला सुरुवात झाली. काही १९७० च्या दशकात भारतात झालेल्या हरित क्रांतीचा प्रभाव सुद्धा नोटांवर दिसायला लागला. १९६७-६९ मध्ये नोटांवर शेती, शेतकरी आणि तंत्रज्ञानाचे फोटो छापण्यात आले होते.

याचदरम्यान २ ऑक्टोबर १९६९ हे महात्मा गांधीचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याची सुरुवात झाली.

१९६९ मध्ये रिजर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या १०० व्या जयंती निमित्य १०० रुपयांची विशेष नोटा छापल्या होत्या. सर्वप्रथम याच नोटेवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला होता. १९७० च्या दशकात या विशेष नोटेसोबतच सेवाग्राम आश्रमात बसलेल्या अवस्थेतला महात्मा गांधींचा फोटो वेगवेगळ्या नोटांवर छापायला सुरुवात झाली.

पण महात्मा गांधींच्या फोटोला खऱ्या अर्थाने नोटेवर स्थान मिळालं ते १९८७ सालात…

१९४७ मध्ये दिल्लीत घडलेल्या एका प्रसंगामध्ये महात्मा गांधींचा एक कँडिड फोटो क्लिक झाला होता. मग काय रिजर्व बँकेने सुद्धा महात्मा गांधींचा तो कँडिड फोटो क्रॉप केला आणि ५०० रुपयांच्या नोटेच्या पुढच्या भागात छापला. तर नोटेच्या मागच्या बाजूला महात्मा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या दांडी यात्रेचं चित्र छापण्यात आलं.

१९९६ मध्ये भारतीय नोटांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले. रिपोग्राफिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नोटेची सुरक्षितता वाढवण्यात आली. वॉटरमार्क बदलण्यात आले. नोटेमध्ये सेक्युरिटी थ्रेड टाकण्यात आलं आणि आंधळ्या लोकांसाठी इंटॅग्लिओ सुविधा सुद्धा नोटांमध्ये वापरली गेली.

पण २००० मध्ये तर नोटांची अक्खी सिरीज बदलून नवीन सिरीज लागू करण्यात आली होती.

यात हिरव्या रंगाच्या ५ रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने जमीन नांगरणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो छापण्यात आला होता. १० रुपयांच्या भगव्या नोटेच्या मागच्या बाजूला वाघ, गेंडा आणि हत्तीचा फोटो छापण्यात आला. २० रुपयांच्या लाल रंगाच्या नोटेवर मागच्या बाजूला नारळाच्या झाडांचा फोटो छापण्यात आला. तर ५० रुपयांच्या गुलाबी नोटेच्या मागच्या बाजूला संसदेचं चित्र छापण्यात आलं होतं.

हिमालयातले पर्वत दाखवणारी १०० रुपयांची हिरवी नोट, दांडी यात्रेचा इतिहास दाखवणारी ५०० ची पिवळी नोट आणि लॉटरीचं तिकीट घेणाऱ्या लोकांच्या स्वप्नात धुमाकूळ घालणारी १००० रुपयांची गुलाबी नोट सुद्धा याच सिरीजमध्ये छापण्यात आली. या सगळ्या नोटांमध्ये महात्मा गांधी नोटेच्या डाव्या भागातच होते.

पण २०१६ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर नोटांमध्ये बराचसा बदल झाला.

नवीन तंत्रज्ञानाने छापण्यात आलेल्या नोटा आकाराने लहान झाल्या आणि नोटेच्या डाव्या भागात असलेला महात्मा गांधींचा फोटो नोटेच्या मध्यभागी आला. कोणार्क सूर्य मंदिराचं चाक, वेरुळचे कैलास लेणे, हंपीमधील दगडी रथ, राणी की वाव, सांचीचा बौद्ध स्तूप, लाल किल्ला आणि मंगळयानाचे फोटो नोटांवर छापण्यात आले.

गेल्या १६१ वर्षांमध्ये भारतीय नोटांमध्ये अनेकदा बदल करण्यात आलेले आहेत, पण आजपर्यंत कधीही कोणत्याही धर्माच्या देवी देवतांचे फोटो छापण्यात आलेले नाहीत. मात्र आता अरविंद केजरीवाल यांनी नोटांमध्ये महात्मा गांधींच्या फोटोसोबत देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.