असदुद्दीन ओवैसींनी दौऱ्याची सुरुवात अयोध्येपासून केलीय, नेमकं काय राजकारण आहे?
उत्तरप्रदेशमध्ये आगामी निवडणुकांसाठी सध्या वातावरण चांगलेच तापले आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. कारण ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने देखील या भाजप शासित राज्यात आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी सध्या प्रयत्न चालू केले आहेत. भाजपसोबतच एमआयएमला इथं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षासोबत देखील दोन हात करायचे आहेत.
अशातच आता असदुद्दीन ओवैसी ३ दिवसीय उत्तरप्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र या दौऱ्याची सुरुवात त्यांनी अयोध्येतून केली आहे.
७ डिसेंबर पासूनच्या या दौऱ्याची सुरुवात ओवैसी अयोध्येच्या रामजन्मभूमी स्थळापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुदौली गावापासून करणार आहेत. तिथून ते ९ सप्टेंबर रोजी सुलतानपूर आणि बाराबंकीला जाणार आहेत. मात्र सध्या भाजप आणि मित्रपक्षांकडून ओवैसींच्या या दौऱ्याला विरोध सुरु झाला आहे.
पक्षाचे राज्यप्रमुख शौकत अली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि,
ओवैसी ‘शोषित वंचित समाज संमेलनाला’ संबोधित करणार आहेत. तीन जिल्ह्यातील युनिट वर्कर सोबतची होणारी बैठक देखील त्यांच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे ओवैसी यांचा हा दौरा मंदिर-मस्जिद या राजकारणाशी आजिबात संबंधित नाही. ते प्रत्येक दौऱ्यादरम्यान तीन जिल्ह्यांना कव्हर करतात. यावेळी त्यांनी या तीन जिल्ह्याना निवडले आहे.
मात्र अयोध्या निवडण्यामागे एक धार्मिक कारण देखील असल्याचं बोललं जात आहे.
सध्या ओवैसी यांनी अयोध्येची निवड करण्यामागे एक धार्मिक कारण देखील असल्याचं बोललं जात आहे. कारण बाराबंकी लखनऊपासून जवळ आहे, इथचं ओवैसी याचं विमान उतरणार आहे. मात्र त्यानंतर देखील त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात करण्यासाठी अयोध्येची निवड केली आहे. कारण उत्तरप्रदेशच्या राजकारणात ‘अयोध्या’ या शब्दाला आणि स्थळाला बरंच महत्व आहे.
मागच्या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमिपूजन होण्यापूर्वी ओवैसी यांनी केलेल्या एका वक्तव्याने बराच वाद उभा राहिला होता. ते म्हणाले होते कि,
बाबरी मस्जिद की घटना हमेशा अयोध्या की विरासत में अंकित रहेगी.
यासोबतच त्यांनी हॅशटॅग ‘बाबरी जिंदा है’ म्हणत ट्विटरवरून ‘बाबरी मस्जिद थी, है, और रहेगी’. असं देखील म्हंटल होते. २०१९ मध्ये अयोध्येचा निकाल आल्यानंतर ते म्हणाले होते कि त्यांचा पक्ष मस्जिदला दान मिळण्यासाठी नाही तर कायदेशीर अधिकारांसाठी लढणार आहे.
तर पक्षाच्या एका नेत्याने माध्यमांना सांगितले होते कि,
जर भाजप अयोध्येमध्ये ओबीसी मोर्चाची बैठक घेऊ शकतो, बसपा ब्राह्मण संमेलन घेऊ शकतो तर एमआयएम का नाही? आम्हाला देखील सामान अधिकार आहेत. जरी आमचा दौरा रुदौलीमध्ये असला तरी हा भाग अयोध्या जिल्ह्यातील एक मतदारसंघ पण आहे. इथं अल्पसंख्याक समुदाय २० टक्क्यांपेक्षा कमी नाही, आणि आम्ही भाजपला हरवण्यासाठी दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाजाला एकत्र आणू.
नोव्हेंबर २०१८ मध्ये फैजाबादचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर ‘फैजाबादच’ नाव बदलून ‘अयोध्या’ केलं आहे. मात्र ओवैसी यांनी आपल्या दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या संबंधित पोस्टमध्ये अयोध्याचा उल्लेख फैजाबाद असाच केला आहे.
त्यांनी याच नावाचा उल्लेख केल्यावर एमआयएमचे नेते म्हणाले,
अशी कृती करण्यामागचे कारण म्हणजे आमचा पक्ष नाव बदलण्याच्या भाजपच्या धोरणाशी सहमत नाही. त्यामुळे आपल्या भाषणादरम्यान देखील ओवैसी फैजाबाद असाच उल्लेख करणार आहेत. आम्ही आमच्या पोस्टरवर पण फैजाबाद असाच उल्लेख केला आहे. हीच आमची रणनीती आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेमध्ये ओवैसी म्हणाले कि,
मी ७ सप्टेंबर फैजाबाद, ८ सप्टेंबर सुल्तानपुर आणि ९ सप्टेंबरला बाराबंकीचा दौरा करणार आहे. येणाऱ्या दिवसात आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन योगी सरकारला हरवण्यासाठी उत्तरप्रदेशच्या आणखी मतदारसंघाचा दौरा करणार आहोत.
ओवैसी यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे कि एमआयएम उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या १०० जागा लढवणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये एकूण १९.२६ टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे ओवैसी यांचा हा ३ दिवसीय अयोध्या दौरा महत्वपूर्ण मनाला जातं आहे. आता येणाऱ्या काळात एमआयएमला कितपत यश मिळत हे बघावं लागणार आहे.
हे हि वाच भिडू
- उत्तरप्रदेशच्या राजकारणात अमिताभ ठाकूर यांच्यामुळे येणारी वादळ नवीन नाहीत.
- पुण्यातील त्या एका वादानं उत्तरप्रदेशातील राजकारण कायमचं बदलून टाकलं
- शिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा केलीय, पण त्यांची ताकद किती?