त्या हत्येनंतर महाराष्ट्रातील महाविद्यालयीन निवडणुका बंद झाल्या…..
भारतात इलेक्शन प्रकरण किती सिरियसली चालतं, किती डाव प्रतिडाव आखले जातात, समोरचा माणूस कसा पराभूत होईल, कुठल्या गोष्टीच्या बळावर आपण निवडून येऊ अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या वेळी चालतात. निवडणुका म्हणलं तर कुठं शांततेत पार पडतात तर काही ठिकाणी अगदी काहींच्या जीवावर उठतात. तर आजचा किस्साही अशाच एका निवडणुकीच्या वेळी झालेल्या हत्येचा आहे.
महाविद्यालयांमध्ये अगोदर निवडणुका प्रकरण जोरदार चालायचं. कॉलेजात असणारे विविध पक्षाचे प्रतिनिधी इतर विद्यार्थ्यांना आपल्या गटाच्या बाजूने कसं खेचता येईल याचाच सतत विचार करायचे. विद्यार्थी प्रतिनिधी हे महाविद्यालयीन निवडणुका अगदी जातीने लक्ष घालून चालवत असतात. अगदी राजकीय पक्ष आणि त्यांचे महत्वाचे नेते या निवडणुकांवर लक्ष ठेवून असतात आणि मदतही करत असतात.
५ ऑक्टोबर १९८९ झालेल्या एका विद्यार्थी उमेदवाराच्या हत्येमुळे या महाविद्यालयीन निवडणुका बंद करण्यात आल्या होत्या. हि हत्या आजवरची सगळ्यात विकृत हत्या मानली गेली. देशभरात या प्रकरणाने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती नक्की काय होतं हे प्रकरण ?
५ ऑक्टोबर १९८९ रोजी मुंबई महाविद्यालयांमध्ये तीन महिन्यानंतर होणाऱ्या विद्यार्थी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या परिसरातील जितेंद्र चौहान [ जेसी ] कॉलेज ऑफ लॉमध्ये पहिल्या वर्षाचा विद्यार्थी ओवेन डिसुझा आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत होता.
उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या ओवेन डिसुझाची महाविद्यालयाबाहेरच हत्या झाली. त्याच्यावर तब्बल ६४ वार झाले होते आणि त्याची बोटं कापण्यात आली होती.
इतक्या विकृत पद्धतीने झालेली हि हत्या महाविद्यालयीन निवडणुकांना काळिंबा फासणारी ठरली. फक्त मुंबईच नाही तर देशभरातून या घटनेचे पडसाद उमटले गेले.
ओवेन डिसुझाच्या मारेकऱ्यांनी ओळख शेवटपर्यंत पटू शकली नाही. परंतु डिसुझाच्या घरच्यांचं ठाम मत होतं कि राजकीय लोकांनीच हे हत्याकांड घडवून आणलं आणि यात ओवेन डिसुझाला जीव गमवावा लागला.
ओवेन डिसुझा हा काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय विद्यार्थी संघाचा [ NSUI – National Student Union of India ] विद्यार्थी नेता होता. आणि ओव्हन डिसुझाने प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद [ ABVP ] होती.
पूर्वी निवडणुकांमध्ये अपहरणाच्या सुद्धा घटना होत्या, विद्यार्थ्यांना मत मिळू नये किंवा निवडणुकीत विद्यार्थी दिसू नये या उद्देशाने असे प्रकार केले जायचे. परंतु डिसुझाच्या निर्घृण हत्येने शहर अस्वस्थ केलं होतं. या घटनेचा परिणाम असा झाला कि बऱ्याच चर्चा घडल्या आणि त्यातून १९९४ साली महाविद्यालयीन निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती.
ओवेन डिसूझाची बहीण लोना रावत या घटनेबद्दल सांगते कि ओवेनवर चॉपर आणि तलवारींनी हल्ला करण्यात आला, त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले, डोक्याला मार लागल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. जेसी कॉलेजच्या प्राचार्यांनी डिसुझाच्या घरी हत्येची बातमी पाठवली होती. ओवेन जोगेश्वरीतील अनेक सामाजिक कारणांशी जोडला गेलेला होता आणि तो गरीब आणि गरजू लोकांना कायम मदत करायचा.
डिसुझाचा मृत्यू झाला त्याच दिवशी एनएसयूआयच्या सदस्यांनी एफआयआर दाखल केली. या एफआयआरमध्ये तत्कालीन राज्य सचिव पराग अलवाणी यांचे नाव डिसुझाचे मारेकरी असं होतं. अलवाणी आता भाजपचे आमदार आहेत. पण पुढे ते निर्दोष सुटले.
अलवाणी यांनी आरोप केला कि एनएसयूआयने अंडरवर्ल्डशी संबंध ठेवल्याने हत्या घडली आणि पण त्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. या हत्येसंबंधी माझ्याविरुद्ध एकही पुरावा पोलिसांकडे नव्हता त्यामुळे माझी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
पुढे अनेक वेळा ओवेन डिसुझाच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. देशभर हे प्रकरण चर्चिलं गेलं होतं.
डिसुझाच्या मृत्यूचं इतकं मोठं प्रकरण झालं असूनही राजकारणी लोकं या निवडणुका महत्वाच्या मानतात. विद्यार्थी नेतृत्व हे राजकीय नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे. सुशिक्षित लोकांनी राजकारणात उतरावं म्हणून महाविद्यालयीन निवडणुका गरजेच्या आहेत असं मानलं जातं.
हे हि वाच भिडू :
- पंजाबच्या लोकगायकाची गाणं गात असताना स्टेजवरच हत्या करण्यात आली होती…
- पथ नाट्य सादर करणाऱ्या नाटककाराची काँग्रेस नेत्यांनी भररस्त्यात हत्या केली होती.
- सिरीयल किलरची खून करण्याची विकृत पद्धत पाहून त्याला सायनाईड मोहन नाव देण्यात आलं होतं…
- सिरीयलप्रमाणे आपल्या आईवडिलांचा खून करून त्यांना सिगरेटचे चटके देणारा सायको किलर.