ऑक्सफर्डमधल्या निवडणुकीत इम्रान खाननं अध्यक्षपदासाठी बेनझीर भुट्टोंचा प्रचार केला होता
सध्या पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून इम्रान खान आठवत असला, तरी त्याची खरी ओळख तयार झाली ती क्रिकेटर म्हणून. पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याचा चिकणाबांड चेहरा, बहारदार बॉलिंग ॲक्शन आणि तितकीच धमाकेदार बॅटिंग यामुळं इम्रानचे सगळ्या जगभर चाहते होते. इंग्लंडमध्ये शिकलेल्या इम्रानवर लय पोरी जीव ओवाळून टाकत होत्या.
अशातच अफवा उठली की, इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांची मुलगी बेनझीर भुट्टो यांचं अफेअर सुरू आहे. अनेक मुली दिलजले झाल्या, पण दिलजले होणाऱ्या मुलांची संख्याही कमी नव्हती. कारण, बेनझीरही काय साधी असामी नव्हती. आरसपानी सौंदर्याचा नमुना म्हणून तिचं नाव घेतलं जायचं.
या दोघांची ओळख झाली ती इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात.
इम्रानसाठी ऑक्सफोर्डमधली सुरुवात फारशी सुखदायक नव्हती. तो ऑक्सफर्डमध्ये दाखल झाल्यावर त्याला धक्का बसला. कारण तिथं युवकांची बंडखोरी पूर्ण भरात होती. ज्या ब्रिटिश संस्कृतीबद्दल त्याला आपल्या पालकांकडून, इंग्रजीच्या पुस्तकांमधून कळलं होतं, ती संस्कृती त्याला दिसलीच नाही.
शरीरसंबंध, अमली पदार्थ आणि रॉक संगीताच्या हल्ल्यापुढे ती संस्कृती आपल्याला जाणवलीच नाही, असं इम्रान आपल्या आत्मचरित्रात सांगतो. पुढं तो म्हणतो की, ‘ब्रिटनमध्ये ईश्वरावर आणि धर्मावर खुलेपणानं खालच्या पातळीवर टीका व्हायची. पाकिस्तानातही इंग्लिश बोलणारे मुल्लांना मागासलेले समजत होते; मात्र चारचौघांमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत कुणात नव्हती. मायदेशी इस्लामी संस्कारांचं पालन व्हायचं आणि लोक स्वतःला धार्मिक समजायचे. ब्रिटनमध्ये मात्र धर्म हा चेष्टेचा आणि निंदेचा विषय ठरला होता.’
सांस्कृतिक वातावरणामुळं आधीच इम्रानची घुसमट होत असतानाच त्याला तिकडचं हवामानही मानवत नव्हतं. तिथल्या अतिथंड हवामानामुळं त्याला लाहोरमधल्या वातावरणाची आठवण येऊ लागली. पंजाबमध्ये शेकोट्यांपुढे जागवणाऱ्या रात्रींना आपण मिस करत असल्याचं तो आत्मचरित्रात लिहितो.
आता घरापासून लांब राहणाऱ्या कोणत्याही मुलाला एकटं वाटल्यावर आईची आठवण येणं साहजिक असतं. इम्रानचंही तसंच झालं होतं. आईला लिहीत असलेल्या पत्रातून तो तिला आपल्याला एकटं वाटतंय हे जाणवणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायचा. मात्र तरीही त्याच्या आईला याची जाणीव झालीच. इम्रान आत्मचरित्रात लिहितो, ‘आईनं मला सांगितलं की, तुला एकटं वाटत असेल तर इकडे निघून ये. तुला वाटेल तेव्हा परत जा.’ यामुळं इम्रानला विश्वास मिळाला, पण त्याचा एकटेपणा दूर झाला नाही.
त्यावेळी इम्रानला ऑक्सफर्डमध्ये दोन मित्र मिळाले, ज्यांच्यामुळं त्याचा एकटेपणा तर दूर झालाच. सोबतच त्याचे ऑक्सफोर्डमधले दिवसही भारी गेले. ते दोन मित्र होते, भारताचे विक्रम मेहता आणि झुल्फिकार अली भुट्टोंची मुलगी बेनझिर भुट्टो. या तिकडीच्या मैत्रीमागचं कारण, फक्त ते एकाच उपखंडातून आलेत हे नव्हतं, तर तिघांनीही शिक्षणासाठी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हेच विषय घेतले होते. दर रविवारी इम्रानआणि विक्रम बेनझिरच्या घरीही जात असत.
ऑक्सफर्ड संघटनेच्या अध्यक्षपदाला लय महत्त्व होतं. त्यात नॉन-ब्रिटिश व्यक्ती निवडणूक लढवणार म्हणल्यावर चर्चा तर होणारच. बेनझिरचं सौंदर्य, तिचा राजकीय वारसा बघता तिच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. प्रचाराचा भाग म्हणून, बेनझिर घरी येणाऱ्या प्रत्येकाचं आदरातिथ्य चीज आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ देऊन करायची.
इम्रान आणि त्याचा मित्र विक्रमला ऑक्सफोर्ड संघटनेमध्ये फारसा रस नव्हता, पण केवळ बेनझिरला पाठिंबा द्यायचा म्हणून यांनी तिच्या प्रचारात भाग घेतला. पॉप्युलर क्रिकेटर केवळ मैत्रीखातर आपल्या मैत्रिणीच्या प्रचारात सक्रिय होता.
याचा अपेक्षित तोच फायदा झाला आणि ऑक्सफोर्डच्या वादविवाद संघटनेच्या अध्यक्षपदी बेनझिर निवडून आली. ते पद मिळवणारी ती पहिली एशियन व्यक्ती ठरली. यासाठी तिची बुद्धीमत्ता जितकी महत्त्वाची होती, तितकाच तिच्या मित्रांनी मैत्रीखातर केलेला प्रचारही.
हे ही वाच भिडू:
- बेनझीर भुट्टोला पंतप्रधान बनवणारं गाणं आजही आपल्या बेंजोवर दणका उडवतंय..
- मोदींप्रमाणेच बेनझीर भुट्टो आणि बच्चनला देखील करण थापर यांनी घाम फोडला होता.
- थेट देशाच्या पंतप्रधानाला फाशी देण्याचा मूर्खपणा फक्त पाकिस्तानच करू शकतो..