ऑक्सिजन चेक करण्यासाठी वापरत असलेली ९८ टक्के पल्स ऑक्सिमीटर चीनी आहेत.
कोरोना आल्यापासून आपल्या आणि लोकांच्या श्वासाची किंमत प्रत्येकाला चांगलीच कळून चुकली आहे. रुग्णांची ऑक्सिजनची पातळी घसरत आहे का?, किंवा सामान्य माणसाला ऑक्सिजनचा काही त्रास होतं आहे का? हे दवाखान्यात, घरी वारंवार तपासलं जातं आहे. यामुळे एकप्रकारे रुग्णाची लक्षण दिसून येण्यास देखील मदत होत आहे.
या सगळ्यासाठी वापरलं जातं एक छोटसं, खिशात बसणार मशीनं म्हणजे पल्स ऑक्सिमीटर.
पण भिडूंनों तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही वापरतं असलेली ९८ टक्के पल्स ऑक्सिमिटर ही ‘मेड इन चायना’ आहेत.
मध्यंतरी भारत – चीन दरम्यान अनेक वेळा संघर्षाचे प्रसंग उभे राहिले. दोन्ही देशांचे संबंध पण ताणले गेले. सीमेवर सैनिक देखील शहिद झाले. साडे तीन दशकांनंतर दोन्ही देशांचा सीमा रक्तरंजीत झाल्या होत्या. तेव्हा पासून मेड इन चायना सामानाऐवजी स्वदेशी वस्तुंचा वापर सुरु झाला होता. मात्र कोरोनानं चिनी वस्तूंचा वापर करण्यास पुन्हा भाग पाडलं आहे.
केमिस्टवाले सांगतात कोरोनापासून ऑक्सिमिटर अगदी दुर्मिळ वस्तु झाली आहे, त्यामुळे लोक जो मिळेल त्या ब्रँड खरेदी करत आहेत. भारतात ऑक्सिमीटरची किंमत २ हजार रुपयांपासून अगदी ३ हजार रुपयांपर्यंत आहेत. यात चायना ऑक्सिमिटर घेतले तर ते केवळ ५०० ते ६०० रुपयांमध्ये मिळून जातं.
भारतात ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिमिटरमध्ये उनान, हेल्थसेंस, स्मार्ट सेवर, आयस्पेयर, योबकान, डॉ. वकू, च्वॉइसएममेड, हिलॲनहेल्दी, लँडविंड, टी टॉपलायन आणि लॉयनिक्स अशा ‘मेड इन चाइना’ ब्रँडचा समावेश होतो. तर इतर ब्रँडमध्ये एक प्रमुख भारतीय नाव आहे ते म्हणजे बीपीएल. याशिवाय जर्मनचं ब्राऊंड ब्रेऊर आणि अमेरिकेच्या डॉ. ट्रस्टच्या नावाचा समावेश आहे.
तसं बघायला गेलं भारत मेडिकल साधनांसाठी बऱ्यापैकी आयातीवर अवलंबून आहे.
आयात केल्या जाणाऱ्या ऑक्सिमिटर नेमका आकडा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या वेबसाइट आढळत नाही. मात्र, सरकारी आकडे एक गोष्ट बऱ्यापैकी स्पष्ट करतात ते म्हणजे मेडिकल साधनांचा एक मोठा भाग हा चीनमधूनच आयात केला जातो.
२०२० ते २१ या पहिल्या १० महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी पर्यंत भारतानं चीनमधून २६९ मिलीयन डॉलरची मेडिकल उपकरण आयात केली होती. (२०१९-२० या संपुर्ण आर्थिक वर्षात हा आकडा २४८ मिलीयन डॉलर होता.) यात टेस्ट किट, पल्स ऑक्सिमिटर आणि अन्य वस्तुंचा देखील समावेश होता.
भारताच्या मेडिकल साधनांच्या एकून आयातीमधील हा भाग १/४ इतका मोठा आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा आकडा अमेरिका आणि जर्मनच्या सारख्या अन्य देशांच्या तुलनेत पण चांगलाच वाढला आहे. चीनची एकुण टक्केवारी २४ टक्के होती तर अमेरिका १७ टक्के आणि जर्मनी १२ टक्के.
सातारचे मेडिकल चालक रोहित सबणीस सांगतात,
अगदी सुरुवातीपासूनच भारतीय बाजारात चीनी ऑक्सिमीटर वापरला जात आहे. पण या बाबत खरेदीदारांचा काहीही आक्षेप नसतो.
तर अमरावतीमधील मेडिकल चालक तेजस काळे सांगतात,
बाजारात काही लोकल ब्रँड उपलब्ध आहेत पण ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं नाहीत. त्यामुळे आम्हाला चीनी ब्रँड ठेवण्यावाचून पर्याय नसतो. लोकं देखील स्वस्तातील ऑक्सिमीटर मागतात, तेव्हा कोणीच म्हणतं नाही की हा चीनी आहे की अन्य कोणता. फक्त ऑक्सिमिटर द्या आणि ते ही स्वस्तातील मिळाल्यास झालं.
पल्स ऑक्सिमीटर चीनी असण्याचं मुख्य कारणं म्हणजे एक तर भारतात यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसणं, आणि दुसरं आयात करणं त्या तुलनेत सोपं पडणं.
स्वदेशी ऑक्सिमिटर बनवणारे मिटकॉन बायोमेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिनांग धामी एका इंग्रजी माध्यमासोबत बोलताना सांगतात,
इथं विकले जाणारे ९८ टक्के ऑक्सिमिटर चीन वरुन आयात केलेले असतात. फक्त २ टक्केच भारतात असेंबल आणि निर्मीत होतात.
यामागं मुख्य कारणं म्हणजे भारतात यासाठी लागणारा कच्चा माल त्वरेने उपलब्ध होतं नाही. त्या तुलनेत चीनी मालाची किंमत कमी असते, त्यामुळे विक्रेत्यांना चीनवरुन आयात करणं सोपं वाटतं.
हे हि वाच भिडू
- चीनच्या साम्राज्याला आळा घालण्यासाठी भारत अमेरिकेने केलेली आयडिया म्हणजे क्वाड
- चीनच्या युद्धात वेळेत तेल पुरवठा न झाल्याने नेहरूंनी इंडियन ऑईलचा पाया रचला
- चीन आणि पाकिस्तानचे पुंग्या टाईट करणारे काली मिसाईल खरंच अस्तित्वात आहे कि नाही ?