साखर कारखान्यात तयार होतोय ऑक्सिजन. उस्मानाबादच्या अभिजित पाटलांनी करून दाखवलं..

राज्यातील ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक उपाय सुचवला होता. मात्र पुन्हा चर्चेत नसल्यामुळे हा उपाय बऱ्याचं जणांच्या लक्षात पण गेला असेल. त्यामुळे पुन्हा सांगतो. तर तो उपाय होता राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करण्याचा.

वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी २३ एप्रिल रोजी राज्यातील साखर कारखान्यांनी मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी असं म्हंटलं होतं. त्यानुसार इन्स्टिटयूटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी तब्बल १९० कारखान्यांना या संदर्भात पत्र पाठवलं होतं. पण त्यावेळी एक प्रश्न उपस्थित झाला होता तो म्हणजे, कारखान्यांना हे शक्य आहे का?

तर त्याचं उत्तर आता होय असचं द्यावं लागेल. कारण उस्मानाबादच्या धाराशिव या खाजगी साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा देशातला पहिला प्रयोग आज यशस्वी झाला आहे.

कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी हा प्रयोग सक्सेसफुल करून दाखवला आहे. आता इथून रोज ९० ते १०० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन उत्पादित होऊ लागला आहे.

शरद पवार यांनी कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी असं सुचवलं सुचवल्यानंतर बहुतांश कारखान्यांनी यासाठी का-कु करण्यास सुरुवात केली. अनेकांनी तर चक्क दुर्लक्ष केलं. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केवळ चारच साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी lलागणाऱ्या यंत्रणेची मागणी नोंदवली.

या पाठीमागे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे तेल कंपन्याच्या सोबत इथेनॉल पुरवठ्याचे करार आहेत. ते करार अडचणीत येतील आणि त्यामुळे नुकसान होईल अशी भीती इतर साखर कारखानदारांना असल्याच्या चर्चा होऊ लागल्या.

मात्र अभिजित पाटील आणि धाराशिव कारखान्यांने यासाठी पुढाकार घेतला. फक्त पुढाकाराचं नाही घेतला तर तशी हालचाल पण सुरु केली.

‘बोल भिडू’शी बोलताना अभिजित पाटील सांगतात, 

२३ तारखेला मिटिंग झाल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ तारखेला मौज इंजिनीयरिंग आणि वसंतदादा शुगर्सची टीम कारखान्यावर येऊन पाहणी करून गेली. धाराशिव कारखान्यामध्ये पूर्वीपासूनच इथेनॉल आणि अल्कोहोलची निर्मिती होतं होती. त्यामुळे पुर्वीचीच यंत्रणा वापरून हा प्रयोग करायचे ठरले. केवळ काही जुजबी फेरफार करणं गरजेचं होतं.

त्याच दिवशी फेरफार करण्यासाठी जे काही पार्ट्स बाहेरच्या देशातून मागवावे लागणारं होते यात मग कॉम्प्रेसर पंप असेल, एअर फिल्टर किंवा मॉलेक्युलर सिव्ह असतील या सगळ्याची ऑर्डर देण्यात आली. यात परदेशी बनावटीचा कॉन्सन्ट्रेटर आणि मॉलिक्युलर जर्मनीमधून आणावे लागले.

यानंतर कारखान्यावरील ६० हजार केएलपीडीच्या डिस्लेरीमधून हे सगळे पार्ट्स बसवून कार्यान्वित करण्यात आले आणि मौज इंजिनीयरिंगच्या धीरेंद्र ओक यांनी संपूर्ण भारतीय बनावटीचा हा ऑक्सिजन निर्मिती प्लॅंट उभा केला.

प्रकल्पासाठी खर्च किती आला?

धाराशिव कारखान्याने इथेनॉल आणि अल्कोहोलच्या निर्मितीसाठी साधारण त्यासाठी ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून यंत्रणा उभारलेली आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी कारखान्याने यात आणखी १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींची अशी झाली मदत :

शासन आणि प्रशासन या दोन यंत्रणा एकमेकांसोबत चालल्या तर काय घडू शकत याच उदाहरण म्हणजे धाराशिव कारखाण्यात सक्सेसफुल झालेला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प.

कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे हे कळताच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे सगळे सातत्याने प्रकल्पाला भेट देऊन लक्ष ठेऊन होते.

179171825 1091250784689245 3766685027563222696 n.jpg? nc cat=111&ccb=1 3& nc sid=8bfeb9& nc ohc=GPIn0XDAM4oAX yFeo3& nc ht=scontent.fpnq5 1

यासोबतच कारखान्याला ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तात्काळ देण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अन्न व औषध विभाग आणि इतर प्रशासनाला दिल्या होत्या.

प्रकल्प अंतिम टप्यात आल्यावर शेवटच्या दोन दिवसात अचानक पाणी गेल्यामुळे मॉलिक्युलर भिजले होते. आता जर ते पुन्हा कार्यान्वित करायचे तर शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊनची परिस्थितीमध्ये होती. त्यावेळी आमदार कैलास पाटील यांनी भट्टीत रात्री २:३० वाजेपर्यंत थांबून हे सगळे मॉलिक्युलर हिट करून घेतले.

संपूर्ण जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण होणार

धाराशिवमध्ये तयार होतं असलेल्या ऑक्सिजनची शुद्धता अगदी ९८ टक्क्यांपर्यंत आहे. तर अशा शुद्ध ऑक्सिजनची सद्यस्थितीमध्ये कारखाना ४ ते ५ टन इतकी निर्मिती करत आहे. पुढच्या ४ दिवसांमध्ये आणखी २ पंप येणार आहेत ते आल्यानंतर हि क्षमता दिवसाला १८ ते २० टनापर्यंत वाढणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याची आजची गरज १८ टनापर्यंत आहे. त्यामुळे या प्रकल्पातून पूर्ण जिल्ह्याची गरज पूर्ण होणारच आहे, शिवाय इतर जिल्ह्याला देखील या ऑक्सिजन प्रकल्पामधून पुरवठा होऊ शकणार आहे. एकूणच जिल्ह्यातील एका जरी कारखान्यामध्ये हा प्रकल्प उभा राहिला तर पूर्ण जिल्ह्याची गरज पूर्ण होऊ शकते हे नक्की.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.