बेळगावच्या चौगुलेंनी भारताला पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं असतं पण..
पुण्यातील डेक्कन जिमखाना ही भारतातील आद्य क्रीडा संस्था. 1910 या सालापासूनच या जिमखान्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या कुस्त्या होत असत. काही वर्षातच खोखो आट्यापाट्या, रस्सीखेच, सायकलिंग,क्रॉस कंट्री वगैरे स्पर्धा होऊ लागल्या.
टाटा कंपनीचे अध्यक्ष सर दोराबाजी टाटा यांच्याकडे डेक्कन जिमखान्याची जबाबदारी आली आणि ही संस्था वेगात प्रगती करू लागली.
दोराबाजी टाटांनी पाश्चात्य देशातली क्रीडा संस्कृती पाहिली होती. ज्याप्रकारे औद्योगिक क्रांती भारतात करायचं त्यांचं ध्येय होत त्याच प्रमाणे भारताला क्रीडा क्षेत्रातही सर्वोच्च स्थानावर न्यायचं स्वप्न त्यांनी पाहिलं.
दोराबाजी टाटा,मोरेश्वर देशमुख, न चि केळकर, एल बी फाटक, हरी तुळपुळे अशा या डेक्कन जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की
1920 साली बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये भरणाऱ्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेत भारताची टीम पाठवायची.
टाटांचा दबदबा आणि डेक्कन जिमखान्याबद्दल असणारी इंग्रज अधिकाऱ्यांची सहानुभूती यामुळे भारताचे स्टेट सेक्रेटरी लॉर्ड मोंटेंग्यू यांनी भारतीय टीम पाठवण्यास परवानगी दिली.
24 एप्रिल 1920 मध्ये डेक्कन जिमखान्यातर्फे सिलेक्शन सामने भरवण्यात आले आणि त्यातून सहा जणांची निवड करण्यात आली.
कोल्हापूरचे शिंदे आणि मुंबईचे कुमार नवले कुस्ती साठी, कलक्त्याचा पूर्णचंद्र बॅनर्जी छोट्या शर्यतीसाठी तर साताऱ्याचे सदाशिव दातार, हुबळी चे एच डी कैकाडी आणि बेळगाव चे पीडी चौगुले मॅरेथॉन शर्यतीसाठी निवडले गेले.
पीडी चौगुले म्हणजे फडेप्पा दरेप्पा चौगुले. हे वयाने सर्वात लहान होते. मूळचे कुस्तीगीर पण कसल्या तरी अपघातामुळे हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर ते शर्यतीकडे वळले. अनेक स्पर्धा गाजवल्या.
1919 साली 27 मैलांची मॅरेथॉन जिंकून त्यांनी अनधिकृत विश्व विक्रम देखील केला होता.
5 जून 1920 रोजी ही भारतीय टीम जहाजाने इंग्लंडला निघाली. तिथे त्यांचे काही दिवस इंग्रज प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव होणार होता.
टाटांनी मुख्य स्पॉन्सरशिप दिली होती मात्र टिळकांनी व अनेक भारतीयांनी या संघासाठी देणगी दिली होती. भारताच्या ब्रिटिश गव्हर्नरनी देखील त्यांची येण्याजाण्याची व अँटवर्पच्या ब्रिटिश सैनिकी तळावर राहण्याची व्यवस्था केली होती.
पण प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून या खेळाडूंच्या अडचणींना प्रारंभ झाला. जहाजातला पहिल्यांदाच करत असलेला मोठा प्रवास त्यांना झेपत नव्हता. उलटयानी त्यांना बेजार केले. त्यात पीडी चौगुले हे शाकाहारी असल्यामुळे त्यांच्या खाण्याचे प्रचंड हाल होत होते.
हिच परिस्थिती इंग्लंड आणि बेल्जियममध्ये कायम राहिली. याच सोबत वर्णद्वेषाचाही मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये सर्व करताना अनेक स्पर्धा जिंकल्या.
आपल्या गुलाम देशातील खेळाडू आपल्या पेक्षा वरचढ ठरत आहेत हे गोऱ्याना सहन होत नव्हते.
विशेषतः पीडी चौगुलेनी तिथे बरेच नाव कमावले. अमेरिकेतील वर्तमानपत्रामध्ये हिंदू डार्क हॉर्स ऑलिंपिकमध्ये चमकणार अशा बातम्या झळकू लागल्या.
10 ऑगस्ट 1920 रोजी भारतीय टीम अँटवर्पमध्ये दाखल झाली. बेल्जियमच्या राजाच्या हस्ते उदघाटन झाले. ब्रिटिश भारताचा झेंडा घेऊन भारताचे खेळाडू या समारंभात सहभागी झाले होते.
स्पर्धांना सुरवात झाली. प्रवास, खाण्याचे हाल, हवामानातील बदल यामुळे भारतीय खेळाडू लवकर स्पर्धेतून बाहेर पडले.
याला आणखी एक कारण होते ते म्हणजे धावण्याचे शूज.
आपल्या खेळाडूंना धावताना शूज वापरण्याची सवय नव्हती. या शूज मुळे पायांना जखमा होत होत्या. बॅनर्जी तर पहिल्याच फेरीत बाहेर पडला.
आता सगळ्या आशा स्टार खेळाडू असणाऱ्या पीडी चौगुले यांच्यावर होत्या.
दहा हजार मिटर स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्यांनी धावायला सुरवात केली पण तीन किलोमीटरवर एका माथेफिरूने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचा नेम हुकला पण घाबरलेल्या चौगुलेंनी स्पर्धा निम्म्यात सोडली.
22 ऑगस्ट रोजी चौगुलेची मुख्य 42 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा होती. बाकीच्या खेळाडूंनी त्यांना समजावून धावण्यास तयार केले. दातार आणि चौगुले स्पर्धेला उतरले. कैकाडी आलेच नाहीत.
भर पावसात स्पर्धा सुरू झाली. 15 किलोमीटरपर्यंत चौगुलेंनी आघाडी घेतली होती. पण शूजमध्ये पाणी गेल्यामुळे घोट्यापाशी जखमा झाल्या होत्या. या जखमा झोंबु लागल्या, त्यामुळे त्यांचा वेग मंदावला.
सदाशिव दातारनी स्पर्धा सोडली पण चौगुले प्रचंड वेदना घेऊन जिद्दीने धावतच होते. कशीबशी स्पर्धा त्यांनी पूर्ण केली.
त्यांचा 19वा क्रमांक आला. तत्कालीन ब्रिटिश पत्रकाराने लिहून ठेवले आहे,
“अँटवर्प ऑलिंपिकमध्ये भावना हेलवणारे एकच दृश्य होते ते म्हणजे मरेथॉनच्या अंतिम टप्प्यात स्टेडियममध्ये प्रवेश करणाऱ्या चौगुलेंच्या चेहऱ्यावरच्या वेदना व निराश यांच्यावर त्यांच्या संयमित कणखरपणाने केलेली मात. भारताच्या हजारो वर्षांच्या संयमशील इतिहासाचे ते प्रतीक होतेच पण एक मूक राजकीय विधान देखील होते.”
पीडी चौगुले यांना या स्पर्धेत प्रमाणपत्र मिळाले. ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले.
त्या दिवशी जर परिस्थितीने त्यांना साथ दिली असती तर त्यांनी भारताला पहिलं मेडल निश्चित जिंकून दिलं असतं.
आज अनेक भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळात जगात नाव कमवत आहेत, ऑलिंपिक गाजवत आहेत, मेडल मिळवत आहेत याच श्रेय जातं पी.डी. चौगुलेंच्या सारख्या निडर खेळाडूंनी सुरू केलेल्या परंपरेला.
मात्र आज परिस्थिती अशी आहे की आपल्या पैकी अनेकांना पी.डी. चौगुलेंच नाव देखील ठाऊक नसते. आज बेळगाव संयुक्त महाराष्ट्र मध्ये त्यांची आठवण जपलेली आहे. तिथे त्यांना पवनंजय नावाने ओळखल जात होतं. त्यांच्या नावाने स्पर्धा भरवली जाते.
संदर्भ- दैनिक सकाळ: शताब्दी भारताच्या ऑलिम्पिक प्रवेशाची
हे ही वाच भिडू.
- आफ्रिकन म्हणून चेष्टा होणारे सिद्दी भारताला ऑलिंपिकमध्ये गोल्ड मिळवून देतील?
- त्या दिवशी कुस्ती बघायला गेलेला पैलवान, भारतासाठीच पहिल कांस्य पदक घेवुन आला.
- पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणाले, हा सरदारजी धावत नाही तर उडतोय !!