पुत्र प्रेमासाठी त्यांना हटवले आणि इंदिरा गांधींचा वाईट काळ सुरु झाला…

१९६६ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदाच पंतप्रधान बनल्या होत्या. पण त्या पूर्वी पक्षात बंडखोरीने डोक वर काढलं. मोरारजी देसाई पक्षाच्या या निर्णयाने नाराज होते. पण लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर कोणाला नाराज करून चालणार नव्हते.

१९६७ च्या निवडणूका कॉंग्रेसने जिंकल्या आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या. याच मंत्रिमंडळात इंदिरांनी मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधान बनवले. अननुभवी असलेल्या इंदिराना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचा हा दबाव हाताळायला अवघड जात होते. त्यांच्या या शांततेचा आणि दबावाचा विरोधक चांगलाच समाचार घ्यायचे. राम मनोहर लोहिया यांनी तर त्यांना एकदा नेहरूंची गुंगी गुडिया देखील म्हंटले.

त्यामुळे इंदिरा यांना ही सगळी परिस्थिती हाताळणारे कोणीतरी विश्वासातील व्यक्ती हवा होता. अशावेळी त्यांना इंग्लंडमध्ये भारताचे उपउचायुक्त आणि त्यांचे जुने मित्र असलेले परमेश्वर नारायण उर्फ  पी. एन हक्सर यांचे नाव चटकन आठवले. हक्सर यांना भारतात बोलून घेतले आणि त्यांना पंतप्रधान सचिव बनवण्यात आले. कालांतराने त्यांना मुख्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली.

इंदिरा गांधी यांना पक्ष व सरकारमधील सर्वसत्ताधीश बनवण्यापर्यंतच्या कामात पी.एन.हक्सर यांची प्रचंड मदत झाली.

माजी केंद्रिय पर्यावरण मंत्री जयराम रमेश “इंटरट्विंड लाइव्हज : पी. एन. हक्सर अँड इंदिरा गांधी’ या पुस्तकात सांगतात,

“इंदिरा गांधी १९७२ पर्यंत हक्सर यांच्यावरच अवलंबून होत्या. १९७१ चे युद्ध, भारत-रशिया मैत्री करार, शिमला करार, आणि भारताच्या पहिल्या अणु चाचणीच्या प्रयत्नांचे शिल्पकार पी.एन. हक्सर हेच होते. साडे पाच वर्षात असा एकही निर्णय नव्हता ज्यात इंदिरा गांधी यांनी हक्सर यांची मदत किंवा सल्ला घेतला नव्हता” 

एकूणच काय तर इंदिरा गांधी यांना ज्या ज्या निर्णयांमुळे आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते, त्या सगळ्या निर्णयांमध्ये पी. एन. हक्सर यांचा मोठा वाटा होता. मात्र १९७३ साली इंदिरा गांधी यांनी हक्सर यांना अचानक पंतप्रधान कार्यालयातून हटवून योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. मात्र त्यांच्या याच निर्णयानंतर इंदिरा गांधी यांचा वाईट काळ सुरु झाला होता.

हक्सर यांना हटवण्यामागे इंदिरा गांधी यांना दिलेला एक कटू सल्ला कारणीभूत होता, जो इंदिरा गांधींना पटला नव्हता.

१९७३ मध्ये जो पर्यंत हक्सर पीएमओमध्ये मुख्य सचिव पदावर होते तो पर्यंत इंदिरा गांधी यांची लोकप्रियता शिखरावर होती. मात्र १९७३ मध्ये इंदिरा गांधी यांनी त्यांना मुख्य सचिव पदावरून हटवले आणि योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

मात्र यानंतर इंदिरा गांधी यांची जी काही परिस्थिती झाली होती ती कोणापासून लपून राहिली नव्हती.

२ वर्षातच इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर देखील त्या जास्त दिवस पदावर राहता आलं नव्हतं. १९८४ मध्ये त्यांची हत्या झाली. मात्र आजही असं म्हंटलं जात कि पी. एन. हक्सर जर इंदिरा गांधीं सोबत असते तर पुढच्या या सगळ्या घटना टळल्या असत्या.

पीएमओतून का हटवले?

त्यावेळी क्षातील नेत्यांचं म्हणणं होते की, इंदिरा गांधी यांचा धाकटा मुलगा अर्थात संजय गांधी यांचं ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ असं वागणं हळू हळू प्रचारात येत आहे. त्यामुळेच पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते संजय गांधी यांच्या योजनांवर काहीसे नाराज होते. तर इंदिरा गांधी या संजय गांधी यांच्या योजनांवरुन प्रभावित होत्या. त्यांच्या प्रभावात येऊन त्या निर्णय घेत होत्या असं देखील म्हंटलं जाऊ लागलं होते. 

त्यामुळेच हक्सर यांनी इंदिरा गांधी यांना समजावण्याच आणि सल्ला देण्याचं ठरवलं. त्यांनी इंदिरा गांधी यांना सांगितले कि,

संजय गांधी यांच्यामुळे आपल्या पंतप्रधान या प्रतिमेला धक्का बसत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी संजय गांधी यांना स्वतःपासून लांब पाठवावे.

साहजिकच इंदिरा गांधी यांना हा सल्ला आणि मत आवडलं नाही. इंदिरा गांधी यांनी हक्सर यांना सांगितले कि,

सगळे जण संजयच्या विरोधात बोलत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी पण कशी त्याची साथ सोडू?

यानंतरच असं म्हंटले जाऊ लागले कि इंदिरा गांधी हक्सर यांच्यावर नाराज होत्या. यातून दोघांचे संबंध देखील बिघडण्यास सुरुवात झाली. याच नाराजीतून इंदिरा गांधी यांनी हक्सर यांना मुख्य सचिव पदावरुन हटवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांना योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

नेहरूंच्या काळात अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या हक्सर यांच्यासाठी हा काहीसा अपमानित करणारा निर्णय होता. हक्सर यांचा त्याकाळी असा दबदबा होता कि, ते जर केबिनमध्ये आले तर कॅबिनेट मंत्री उठून उभे राहायचे. इंदिरा गांधी यांच्यापेक्षा जास्त पक्षातील नेते हक्सर यांनाच जास्त घाबरायचे. त्यामुळेच त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे अचानक ‘अर्श से फर्श तक’ असा आणणारा होता.

मात्र भारतीय राजकारणाच्या इतिहासात मागे वळून बघितले तर ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे कि हक्सर यांना हटवणे हि इंदिरा गांधी यांच्या राजकीय आयुष्यातील हि सगळ्यात मोठी चूक होती. कारण ते जर असते तर कदाचित इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला नसता. कदाचित संजय गांधी यांचा मृत्यू झाला नसता, आणि कदाचित ऑपरेशन ब्ल्यू स्टार देखील घडले नसते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.