दावा आत्ताचा नाही, ‘ताजमहल नव्हे तेजोमहल’ हे पिल्लू एका पुणेकर माणसाने सोडलं होतं…

देशात सध्या जे धार्मिक राजकीय वातावरण झालं आहे त्यात अयोध्या, बनारसनंतर आता हळूहळू आग्र्याकडे मोर्चा वळतोय, असं दिसतंय. गेल्या २-४ दिवसांत तिथलं ताजमहाल चर्चेचा हॉट टॉपिक बनला आहे.

कारण काय?

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठात दाखल करण्यात आलेली एक याचिका.

ताजमहालाचे २२ दरवाजे बंद आहेत. या बंद असलेल्या दरवाजांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती आढळू शकतात. तेव्हा त्याची तपासणी करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) द्यावेत, अशी मागणी या याचिकेमार्फत करण्यात आली आहे. 

मागणी करताना या याचिकेत राज्यघटना आणि एएसआयने दाखल केलेल्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे की, हिंदू देवतांच्या मूर्ती बंद दारामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

शिवाय या याचिकेत, 

“काही हिंदू संघटना आणि प्रख्यात संतांचा असा दावा आहे की ताजमहालच्या आधी इथे शिवमंदिर होतं. काही लोक असेही मानतात की हा ‘तेजोमहाल’ आहे, जो ज्योतिर्लिंग आहे. पी. एन. ओक यांच्यासारखे अनेक इतिहासकार आणि लाखो हिंदू भाविकांचा ठाम विश्वास आहे की या बंद खोल्यांमध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे.” 

असं देखील नमूद आहे.

देशात आधीच धार्मिक वातावरण गरम आहे. अशात भारताची शान आणि जगभरात भारताची ओळख समजल्या जाणारा ताजमहाल आता निशाण्यावर आल्याचं दिसत आहे. या याचिकेमध्ये वापरण्यात आलेल्या २ नावांवरून परत एकदा ताजमहालचा जुना वाद देखील पुढे येण्याची शक्यता आहे. 

२ नावं म्हणजे – तेजोमहाल आणि पी. एन. ओक

आणि जुना वाद – ‘ताजमहल का तेजोमहल’

साहजिक विषय चर्चेत आला की आठवण येते ती पुण्यातल्या पु. ना.ओक या माणसाची…

या माणसाने ताजमहल नसून तेजोमहल हा सिद्धांत मांडला, खरंतर याला पिल्लू सोडणं म्हणावं लागेल. अस्सल पुणेकर असा हा माणूस. त्यांनीच लोकांना अजून कामाला लावलं आहे…? 

सर्वांत पहिल्यांदा ताजमहल हे हिंदू धर्माच तेजोमहल आहे हा सिद्धांत मांडणारे व्यक्ती म्हणून ओक ओळखले जातात. फक्त ताजमहल या विषयावर त्यांचे सिद्धांत थांबले नाहीत तर ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनिती, सौदी अरेबियात विक्रमादित्याची सत्ता, अजपती वरून इजिप्त, अंगुली वरून इंग्लड अशा विविध संकल्पना त्यांनी मांडल्या होत्या… 

तर हे पु.ना.ओक कोण होते…?

पु.ना. ओक यांच्या थेअरी ऐकून तुम्हाला ते कोणीतरी साधे गृहस्थ वाटत असतील, प्रसंगी चेष्टा देखील करु वाटेल पण त्यांची एकंदरित कारकिर्द पाहील्यानंतर चेष्टेपुरता त्यांचा विषय घ्यावा, असं नक्कीच नाही. 

पु.ना.ओक यांचा जन्म इंदोरचा. १९१७ सालचा. आग्रा येथून ते एम.ए झाले. नंतर वकिली करुन ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्रोफेसर झाले. दूसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ते लष्करात भरती झाले. इथे ते अधिकारी होते. पुढे जपान्यांनी जे युद्धकैदी केले त्यामध्ये ओक होते. या युद्धकैद्यांची सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेना निर्माण केली आणि ते या आझाद हिंद सेनेचा भाग झाले.

आझाद हिंद सेनेसोबत त्यांनी अनेक कारवाया केल्या. आझाद हिंद सेनेच्या व्हिएतनाममधील फ्री इंडिया रेडीओचे ते संचालक होते. या दरम्यान नेताजींच्या ऑफीसमध्येच ओक बसत असत. यावरूनच त्यांचा आवाका लक्षात येतो. ओक प्रत्यक्ष मैदानात देखील सक्रीय होते. दूसरे महायुद्ध संपले त्या काळात ओक आपल्या सहकार्यांसोबत कलकत्ता जवळ येवून पोहचले होते. 

त्यानंतर ओक दिल्लीत राहू लागले. स्वतंत्र भारतात ते हिंदूस्थान टाईम्स व स्टेट्समन या दैनिकांच्या संपादक विभागात काम करत, पुढे केंद्र सरकारच्या माहिती व नभोवाणी मंत्रालयात ते क्लास वन ऑफिसर म्हणून कार्यरत राहिले.

निवृत्तीनंतर ते युनायटेड स्टेट्स इन्फोर्मेशन सर्व्हिस मध्ये संपादक म्हणून काम करू लागले. या काळात इतिहास संशोधन करुन वेगवेगळे सिद्धांत मांडू लागले.

याच दरम्यान त्यांनी ताजमहल नव्हे तेजोमहलचा सिद्धांत ११८ पुरावे देवून सादर केला. त्यांनी त्यांचा हा प्रबंध ऑल इंडिया हिस्ट्री कॉंग्रेसच्या १९६३ च्या अधिवेशनात मांडला. तिथून जी चर्चा सुरू झाली ती आजतागायत चालू आहे. 

त्यांच्या मते ताजमहलमध्ये एकूण सात मजले आहेत तर एकच मजला उघडा का?

लोकांसहीत अभ्यासकांना देखील तिथे का जावून दिले जात नाही. जे बांधकाम करून खोल्या बंद करण्यात आल्या त्या इंग्रजांनी केल्या. ताजमहलमध्ये मूर्ती, हिंदू सजावट कशाला. त्यांच्या मते कार्बन टेडिंग केल्यानंतरही ही बिल्डिंग किती जूनी याचा अंदाज बांधता येवू शकतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरी मांडून त्यांनी सातत्याने तेजोमहलचा दावा मांडला. मात्र सत्तेत कॉंग्रेस असो की भाजप दोन्हीही पक्षांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत त्यांना उडवून लावल्याचं दिसतं. या सर्व गोष्टींवर त्यांनी एकूण ‘चौदा’ पुस्तके लिहली.

सध्याचे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पुरातत्व विभागाने देखील २०१७ मध्ये त्यांचा तेजोमहलचा सिद्धांत फेटाळून लावला. 

मात्र आता परत एकदा २०२२ ला हाच मुद्दा डोकं वर काढताना दिसतोय. तोही सटीक अशा वेळेला. तेव्हा या अलाहाबादच्या याचिकेचं पुढे काय होतंय, बघणं गरजेचं आहे… मात्र सर्व सुफळ मंगल होवो, हीच आशा आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.