त्या दिवशी ऑलिंपिक गोल्ड मिळवणारी धावपटूदेखील उषासाठी रडली होती.

पिलुवालाकंडी टेकापरंविल उषा उर्फ पीटी उषा. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरील शांत निवांत पय्योली गावात तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीचीच होती.

एकदा चौथीत असताना उषाच्या शाळेतल्या क्रीडाशिक्षकांनी तिला धावताना बघितलं. तिच्या साध्या चालण्यातही विलक्षण वेग होता. छोट्या उषाची त्यांनी तिच्या वयाहुन मोठ्या एका मुलीसोबत शर्यत लावली. ही मुलगी जिल्हास्तरीय विजेती धावपटू होती.

उषाने मात्र तिला सहज हरवलं.

तिच्या आयुष्यातली ही पहिली शर्यत होती पण या विजयाने तिचं आयुष्य बदलून टाकलं.

तिचे शिक्षक ओ.एम.नांबियार यांनी तीच ट्रेनिंग सुरू केलं. लवकरच केरळमधल्या सगळ्या ज्युनिअर स्पर्धा तिने जिंकल्या. यात 100 मीटर, 200 मीटर, उंच उडी, लांब उडी, अडथळ्याची शर्यत या सगळ्याचा समावेश होता.

उषामधल्या प्रचंड टॅलेंटला न्याय देण्यासाठी तिची केरळच्या मुलींच्या क्रीडा ट्रेनिंग कॅम्पमध्ये निवड करण्यात आली. लवकरच राष्ट्रीय पातळीवर तिचा लौकिक जाऊन पोहचला.

अगदी लहान वयात तिने राष्ट्रीयस्पर्धा जिंकून अनेक मेडल्सची लयलूट केली.

कधीकाळी रेल्वे ट्रॅकवर, समुद्रकिनाऱ्यावर धावणारी उषा भारतभरात पय्योली एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. १९८० साली अवघी सतरा वर्षांच्या उषाची मॉस्को ऑलिम्पिकसाठी निवड झाली. पण या स्पर्धेत तिला चमक दाखवता आली नाही.

त्या स्पर्धेत तिला मेडल मिळालं नाही पण ऑलिंपिकच महत्व कळालं. या स्पर्धेत यश ही संपूर्ण देशासाठी गर्वाची बाब आहे आणि तो सन्मान आपण आपल्या भारतमातेला मिळवून घ्यायचाच हे उषाच्या पक्क डोक्यात बसलं.

उषाने जिद्दीने पुढच्या ऑलिंपिकची तयारी सुरू केली.

कठोर मेहनत आणि योग्य प्रशिक्षण याचा परिणाम दिसू लागला. उषाने १०० मीटर व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला.

दिल्लीमध्ये झालेल्या एशियाड गेम्स मध्ये पीटी उषाने दोन सिल्व्हर मेडल जिंकले. खुद्द इंदिरा गांधी यांनी तिची पाठ थोपटली.

१९८४ सालचा ऑलिंपिक जवळ आला तसं उषाने एका गेमवर विशेष लक्ष केंद्रित केलं,

मुलींची 400 मीटर धावण्याची अडथळ्यांची शर्यत.

या स्पर्धेत तिला जिंकण्याची सर्वात जास्त संधी होती. यापूर्वी तिने अमेरिकन चॅम्पियन ज्यूडी ब्राऊन हिला देखील याच शर्यतीमध्ये हरवलं होतं.

अमेरिकेच्या हॉलिवूडची स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉस एंजलीसमध्ये हे ऑलिम्पिक भरलं होतं. ४०० मिटर अडथळ्याची स्पर्धा सुरू झाली. पहिल्या फेरीत उषाने ५६.८१ सेकंदात हे अंतर पार केले.

सेमिफायनल मध्ये तिने ५५.४२ सेकंद ही वेळ नोंदवली. हा एक कॉमनवेल्थ देशांमधला विक्रम होता.

एरव्ही भारतीय अँथलीट्सना कोणी खिजगणतीतही घेत नव्हतं पण पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये एका भारतीय महिला अँथलीटच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली होती.

आणि फायनल सुरू झाली.

गेट सेट गो चा इशारा झाल्या झाल्या पीटी उषा अगदी प्राण पणाला लावून धावली पण…

पण ऑस्ट्रेलियाची डेबि फ्लिंटॉफ सुरवातीलाच अडखळली, नियमाचा भंग झाल्यामुळे स्पर्धा थांबवण्यात आली. उषाने केलेला सुंदर स्टार्ट वाया गेला.

स्टेडियममध्ये हजर असलेल्या प्रत्येकाला दिसत होतं की, पीटी उषाची एकाग्रता काहीशी भंग झाली आहे.

परत फायनल राउंड सुरू केला, यावेळी सुरवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही तरी देखील उषा जीव तोडून धावली. पहिल्या तिघीमध्ये ती होती पण शेवटची लाईन क्रॉस करताना रोमानियाची क्रिस्टियाना कोजोकारू अगदी बरोबरीला आली होती.

गोल्ड आणि सिल्व्हर मेडल निश्चित झाला होता पण ब्रॉंझ मेडलचा निर्णय लागला नव्हता. अखेर टीव्ही फ्रेममध्ये पाहून निर्णय देण्यात आला की

शतांश सेकंदाने उषाचा पराभव झाला आहे.

अख्खा स्टेडियम स्तब्ध झालं होतं. मिल्खा सिंग यांच्या पराभवाची आठवण झाली. उषा सोबत संपूर्ण भारत देशाने पाहिलेलं स्वप्न भंग झालं होतं.

उषा आणि तिचे कोच नांबियार रडत होते. त्याच वेळी सुवर्णपदक जिंकलेली नवल एल मुटावकेल सुद्धा मेडल स्वीकारताना रडत होती.

नवल मुटावकेल ही मोरोक्कोची धावपटू.

एका गरीब देशातून येऊन तिने जगज्जेती बनण्याचं पराक्रम केला होता. ऑलिंपिकमध्ये गोल्डमेडल जिंकणारी ती पहिली मुस्लिम महिला होती.

तिच्या प्रमाणेच परिस्थितीशी झगडा करून आलेल्या पीटी उषाशी तिची खास मैत्री जुळली होती. या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून आपणही काही कमी नाही हे दाखवून द्यायचं अस त्यानी ठरवलं होतं.

मुटाकेलने ती स्पर्धा जिंकून आपलं स्वप्न पूर्ण केलं. हा सुवर्णक्षण होता मात्र तरीही तिची

खास मैत्रीण पीटी उषा आपल्या सोबत पोडीयम वर नाही याचं दुःख अनावर होऊन ती रडत होती.

आजही या दोघी बेस्ट फ्रेंड आहेत. पीटी उषाने तिच्या सोबतचा फोटो मध्यांतरी ट्विटरवर शेअर केला होता. आज या दोघीही लिजंड ऍथलिट आपआपल्या देशात पुढचा वर्ल्ड चॅम्पियन घडवण्यासाठी मेहनत घेत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.