पाब्लो कधीच संपला पण त्याच्यामुळे कोलंबियात आत्ता हिप्पोंचा प्रॉब्लेम सुरू झालाय

१९४९ चा काळ. लॅटिन अमेरिकेतील कोलंबिया देशात एका भावी ड्रग ‘किंग’चा जन्म झाला. एका गरीब कुटुंबात वाढलेल्या या मुलाचं लहानपणापासूनच कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष होण्याच स्वप्न होतं. परंतु या स्वप्नाच्या प्रवासाची सुरवात त्यानं चोरी आणि स्मगलिंगने केली.

सत्तरच्या दशकात तो जगातील सर्वात मोठा ड्रग तस्कर बनला. आणि पाब्लो एस्कोबार या नावाने जगाला परिचीत झाला.

पाब्लोच्या श्रीमंतीचे किस्से 

पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचं पुस्तक ‘द अकाऊंट स्टोरी’ नुसार, तो एका दिवशी जवळपास १५ टन कोकेनची तस्करी करत होता. तर त्यावेळी त्याचं वार्षिक उत्पन्न १,२६,९८८ कोटी रुपये इतकं होतं. पाब्लोने या काळ्या धंद्यातून इतका पैसा कमावला होता की, त्याच्याकडील गोदामात ठेवलेले त्याचे करोडों रुपये उंदीर खाऊन टाकायचे.

१९८९ मध्ये फोर्ब्स मॅगझिनने एस्कोबारला जगातला ७ वा सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितलं होतं. त्याची खाजगी संपत्ती अंदाजे ३० बिलियन डॉलर म्हणजेच १६ खरब रुपये इतकी होती. त्याच्याकडे ८०० आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्या होत्या.

जर तो जिवंत असता तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त पैसा त्याच्याकडे असला असता.

एकदा आपल्या मुलीला उब मिळण्यासाठी एका रात्रीत त्याने जवळपास १८ कोटी रुपयांच्या नोटांचा कोळसा केला होता. पण १९९३ मध्ये त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी त्याचा एन्काऊंन्टर केल्याचा दावा केला. तर पोलिसांना शरण न येण्यासाठी पाब्लोने स्वतःला गोळी मारुन घेतली असे त्याच्या भावानं सांगितलं.

गरीबांचा मसिहा

पाब्लो कोलंबियेमध्ये गरीबांचा मसीहा मानलं जायचं. त्याने अनेक चर्चची उभारणीही केली आहे. १९८६ मध्ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने देशाचं १० बिलियन डॉलर (५.४. खरब रुपये) कर्ज चुकवण्याचीही ऑफर दिली होती.

पाब्लोचं काळं-विषारी साम्राज्य :

गरीबांचा मसिहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाब्लो नावानं आज मात्र कोलंबिया मध्ये छी-थू होतं आहे. १९८० च्या स्वतःच्या शौकसाठी त्याने ५५०० हजार एकरावर फॅलो हॅसियेंदा नॅपोलेस (नेपल्स इस्टेट) या आलिशान साम्राज्य उभं केलं होते.

या स्वतःच्या जागेवर त्यानं प्राणी संग्रहालयही उभं केलं. अनेकविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी त्याने या संग्रहिलयात आणले. त्याच सोबत त्याने परदेशातुन चार पाणघोडे (इंग्रजी नाव : Hippo, हिंदी नाव : दरियाई घोड़े) देखील आणले.

सर्व साधारणपणे लॅटीन अमेरिकेत ही प्रजाती आढळून येत नाही. त्यामुळे त्याने हे पाणघोडे बाहेरुन आयात केले. चार असलेली ही संख्या आज वाढून जवळपास ७०-८० च्या घरात गेली आहे. कोलंबियाच्या ‘रिओ – दि – माग्दलिना’ नदीत हे प्राणी आढळून येतात.

१९९३ रोजी पाब्लो ॲस्कोबारच्या मृत्युनंतर त्याचे शेत, प्राणी संग्रहालय आणि किल्ले सरकारनं ताब्यात घेतले. त्यानंतर प्राणीसंग्रहालयातील इतर प्राण्यांची संख्या कमी झाली. तर काहींना या ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यात आले.

पण पाणघोड्यांची संख्या वाढतच गेली. आज याच वाढत्या संख्येंने आजूबाजूचे नागरिक त्रस्त आहेत.

पशुवैद्यक जीना सेरना डी. डब्लु. वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगतात,

कोलंबियात या पाणघोड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यांना नियंत्रीत ठेवू शकत नाही. ते माग्दलिनाच्या पर्यावरणीय व्यवस्थेवरती विपरीत परिणाम करत आहेत. त्यांना मोकळ्या वातवरणात फिरण्याची सवय असल्याने स्थानिक प्रजातींनाही धोकादायक बनत आहेत. कधी कधी ते मुले खेळत असलेल्या फुटबॉलच्या मैदानावर देखील येतात.

एका संशोधनानुसार आफ्रिकेमध्ये दरवर्षी पाणघोड्यांमुळे जितक्या नागरिकांचा जीव जातो तितके दुसऱ्या कोणत्याच प्राण्यामुळे नाही. पाब्लो ॲस्कोबार या साम्राज्याच्या मागील बाजूसच एक प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील मुलांना आणि शिक्षकांना देखील रात्रीच्या वेळी इथे चरण्यासाठी येणाऱ्या पाणघोड्यांची भयानक भिती वाटते.

पाब्लोमुळे कोलंबियाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला पण आफ्रिकेवरुन आणलेल्या चार पाणघोड्यांचा प्रॉब्लेम २०२० सालात देखील येईल याचा विचार मात्र कोणीच केला नसेल. 

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.