पाब्लोने लपवलेला १३० कोटींचा खजिना पुतण्याला घावतो तेव्हा..

भावड्या आपण लहानपणापासून खजिन्याच्या स्टोऱ्या ऐकत आलेलो असतोय. घरातली एखादी म्हातारी आपल्या आज्ज्या पंज्या पैकी कोणीतरी परसात खजिना लपवून ठेवलाय वगैरे वगैरे स्टोऱ्या ऐकलेल्या असतात. पण किती जरी उकरलं तरी काय घावत नाही.

आपल्याला पण हस्तर भेटावा तुंबाड सापडावं कोणाला वाटत नाही? अशी स्वप्नं आपल्याला रोजच पडत असत्यात. एक माणूस आहे ज्याचं हे स्वप्न खरं ठरलं.

नाव निकोलस एस्कोबार. पाब्लो एस्कोबार चा  पुतण्या.

आता तुम्ही म्हणणार पाब्लो सारखा जगाच्या ड्रग इंडस्ट्रीवर राज्य करणारा टग्या  काका आम्हाला पण असला कि आमच्या पण परड्यात सापडणारच कि ओ. आमचं काका एष्टीत बस कंडक्टर असल्यावर त्यांच्याकडं चिल्लरचाच खजिना मिळणार.

गडयांनो निकोलस एस्कोबारचा हा प्रवास  सोपा नव्हता. कारण  त्याचा काका जरा जास्तच वांड होता.

ड्रग किंग म्हणून पाब्लोने तुफान पैसे कमवले पण त्याचं लहानपण अगदी दारिद्र्यातून गेलं होतं. लॅटिन अमेरिकेतील कोलंबिया देशात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाब्लोच लहानपणापासूनच देशाचा राष्ट्राध्यक्ष होण्याच स्वप्न होतं. वडील शेती करायचे, आई शाळेत शिक्षिका होती. पोरग जात्याच हुशार होतं पण प्रचंड महत्वाकांक्षी होतं.

अगदी चड्डीत असल्यापासून पाब्लोला पैशे कमवायचं वेड लागलं होतं आणि त्यासाठी लागणारे सगळे शॉर्टकट त्याने शोधून काढले होते. शाळेत असतानाच तो छोट्या मोठ्या चोऱ्या करू लागला. पेपर फोडणे, खोटी सर्टिफिकेट मिळवून देणे यात तो आघाडीवर असायचा. पुढे कॉलेजला गेला पण शिक्षण काही पूर्ण केलं नाही.

अजून ड्रगच्या लफड्यात पडला नव्हता तरी तो चोरी मारीच्या धंद्यातून लाखो रुपये कमवत होता. असं म्हणतात कि एका माणसाला किडनॅप करून पाब्लोने जवळपास ७० लाख रुपये त्याच्या कडून उकळले होते.

सत्तरच्या दशकात तो जगातील सर्वात मोठा ड्रग तस्कर बनला. आणि पाब्लो एस्कोबार या नावाने जगाला परिचीत झाला.

त्याच्यवर आलेल्या नार्कोस या सीरियलमध्ये आपण बघितलंच असेल कि त्याने कोकेनच्या जगात काय काय करून ठेवलं. अमेरिका व एकूणच जगातला तो सर्वात मोठा ड्रग सप्लायर होता. त्याकाळातील ८०% कोकेनचा बिझनेस पाब्लोच्या अंडर चालत होता.  करा त्याने किती पैसे कमवले असतील आणि  काय काय केलं असेल.

पाब्लोच्या श्रीमंतीचे किस्से 

पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचं पुस्तक ‘द अकाऊंट स्टोरी’ नुसार, तो एका दिवशी जवळपास १५ टन कोकेनची तस्करी करत होता. तर त्यावेळी त्याचं वार्षिक उत्पन्न १,२६,९८८ कोटी रुपये इतकं होतं. पाब्लोने या काळ्या धंद्यातून इतका पैसा कमावला होता की, त्याच्याकडील गोदामात ठेवलेले त्याचे करोडों रुपये उंदीर खाऊन टाकायचे.

त्याने १५ विमाने खरेदी केली होती. यातील म्हणे एका विमानाचा अपघात झाला तर गड्याने ते विमान पुन्हा बांधले आणि आपल्या घराच्या समोर शोसाठी  टांगून ठेवले.

१९८९ मध्ये फोर्ब्स मॅगझिनने एस्कोबारला जगातला ७ वा सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितलं होतं. त्याची खाजगी संपत्ती अंदाजे ३० बिलियन डॉलर म्हणजेच १६ खरब रुपये इतकी होती. त्याच्याकडे ८०० आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्या होत्या.

जर तो जिवंत असता तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त पैसा त्याच्याकडे असला असता.

एकदा आपल्या मुलीला उब मिळण्यासाठी एका रात्रीत त्याने जवळपास १८ कोटी रुपयांच्या नोटांचा कोळसा केला होता. पाब्लो कोलंबियेमध्ये गरीबांचा मसीहा मानलं जायचं. त्याने अनेक चर्चची उभारणीही केली आहे. १९८६ मध्ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने देशाचं १० बिलियन डॉलर (५.४. खरब रुपये) कर्ज चुकवण्याचीही ऑफर दिली होती.

पण  एव्हढ असलं तरी तो पैशांच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह होता. ड्रगमध्ये मिळालेले अब्जावधी रुपये सांभाळणे हे त्याच्या साठी सगळ्यात मोठं टास्क असायचं. जेव्हा पोलिसांनी त्याच्या विरुद्धचा फास आवळला तेव्हा त्याने आपली संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवण्यास सुरवात केली.

असं म्हणतात की तो ज्या लोकांना हे पैसे लपवायचं काम द्यायचा त्यांना लगेच ठार मारून टाकायचा. त्यामुळे पैसे कुठे लपवले आहेत हे पाब्लो सोडून कोणालाही माहित नव्हतं.

१९९३ साली जेव्हा पोलीस एन्काउंटरमध्ये पाब्लो मारला गेला तेव्हा त्याच्या संपत्तीचा शोध सुरु झाला. कोणी म्हटलं की मेंडलेंन शहराच्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये हे पैसे लपवून ठेवलेले आहेत. तर कोणी म्हटलं कि कोलंबियाच्या जंगलात हा खजिना दडवलेला आहे.

कित्येक ट्रेजर हंटर टीम या मोहिमेवर निघाले. खुद्द पाब्लोचा लेक रॉबर्टो यात आघाडीवर होता. खरं तर अगदी लहाणपणीच त्याची आणि बापाची ताटातूट झाली होती. किडनॅपिंगच्या भीतीने त्याला कोलंबियाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं. त्याला एका अमेरिकन गुप्तहेराने दत्तक घेतलं. त्याच्या देखरेखीखालीच रॉबर्टो वाढला. त्याच्या दत्तक पित्याने मरताना रॉबर्टोला पाब्लोच्या खजिन्याचे सिक्रेट लिंक सांगितले. याच लिंकच्या भरवश्यावर रॉबर्टो कोलंबियाला आला.

त्यातल्या कित्येकांनी प्रयत्न केले पण त्यांना विशेष यश असं मिळालं नाही.

पाब्लोला सख्ख्या बायकोपासून दोन पोरं झाली. एक मुलगा आणि एक मुलगी पण त्याच्या मृत्यूनंतर जीव वाचवण्यासाठी त्याची बायको सगळ सोडून कोलंबियामधून परागंदा झाली. अर्जेंटिना व इतर देशांमध्ये ती आपलं नाव बदलून राहत होती आणि साधी नोकरी करून आपलं आणि पोरांचं पोट भरत होती. नवऱ्याने मिळवलेल्या अफाट संपत्तीचा तिला आणि तिच्या लेकरांना देखील काही फायदा झाला नाही.

पण पाब्लोच्या पोराला जे घावलं नाही ते त्याच्या पुतण्याला निकोलस एस्कोबारला मिळालं.

निकोलसच लहानपण पाब्लोच्या सोबत गेलं. एकदा तर पाब्लोच्या शत्रूंनी त्याच अपहरण देखील केलं होतं. जवळपास सात तास त्याला मारहाण झाली होती. त्याचे वडील रॉबर्टो हे सख्या भावाचं म्हणजे पाब्लोच अकाउंट सांभाळायचे. पण त्यांना देखील पाब्लो पैसे कुठे लपवतोय हे ठाऊक नव्हतं.

निकोलस सांगतो तो जेव्हा कधी पाब्लोच्या जुन्या घरात जायचा तेव्हा त्याला डायनिंग रूममध्ये बसल्यावर कारपार्किंगच्या दिशेने लक्ष जायचं. प्रत्येकवेळी  एक अद्भुत माणूस गेट मधून आत यायचा आणि अचानक गायब व्हायचा.

तिथून एखाद्या कुजलेल्या देहाच्या १०० पट जास्त प्रचंड घाण वास यायचा.

शेवटी निकोलसने तिथे उत्सुकतेने शोध घ्यायचं ठरवलं. भिंतीच्यावर थोडी ठोकाठोकी केल्यावर तिथे छिद्र पडले. या छिद्रातून प्रचंड घाणेरडा वास येत होता. निकोलसच्या मते तो वास एखाद्या कुजलेल्या मृतदेहापेक्षाही १०० पट घाण होता. तरीही त्याने चिकाटीने ती भिंत पाडली.

तर अहो आश्चर्यम तिथे प्लॅस्टिक बॅगमध्ये जवळपास १८ मिलियन डॉलर सापडले. म्हणजेच आपल्या भाषेत १३० कोटी रुपये फक्त.

निकोलसने एका मुलाखतीमध्ये या खजिन्याचे सिक्रेट सगळ्या जगासमोर आणलं. मात्र त्याच म्हणणं होतं की त्या पैशांपैकी बरीच रक्कम जुन्या व खराब नोटांमुळे वापरता येत नाही. मात्र तरीही काकांची कृपा त्याच्यावर झालीच. फक्त पैसेच नाही तर सोबत एक टाईप रायटर, एक सोन्याचा पेन, सॅटेलाईट फोन आणि एक अनडेव्हलप्ड कॅमेऱ्याचा रोल  देखील सापडलाय.

असो. आपल्याला काय? आपले काका काय एवढे बच्चन लागून गेले नाहीत, आपण फक्त कौन बनेगा करोडपती बघायचं आणि क्या करोगे इतने सारे धनराशी का याचा विचार करत बसायचं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.