म्हणून डॉक्टरांना ४७ व्या वर्षींच पद्मश्रीने गौरवण्यात आलं.

वर्ष होतं १९७४. डॉ. श्रीराम लागूंच सामना सिनेमाचं कोल्हापुरात जयप्रभा स्टुडीओमध्ये शुटींग सुरु होतं. अचानक त्यांना एक निरोप आला.

“कोल्हापूरच्या कलेक्टरांचा फोन आलाय आणि ते तुम्हाला बोलवत आहेत.”

लागुंना दरदरून घाम फुटला. कलेक्टर फोन करत आहेत म्हणजे काही तरी अघटीत घडलं असणार. घरच्यांपैकी कोणाचा तरी अपघात, गंभीर आजार वगैरे नको नको ते विचार मनात येऊन गेले. आई, बायको, भावंड सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर चमकत होते. काय नेमक झालं असेल काहीच ठाऊक नव्हत. थरथरत्या हातांनी डॉक्टरांनी फोन उचलला. कलेक्टर म्हणाले,

“आपण श्रीराम लागू बोलताय ना?

भारत सरकारने यंदा तुमचे नाव पद्मश्री या सन्मानार्थ निवडले आहे !! तुमची हरकत नाही ना?

डॉक्टर लागू अवाक झाले. त्यांना आपल्या कानावर विश्वास बसेना. सावरायला काही क्षण लागले. तोंडातून शब्द फुटेना. हे सगळ अनपेक्षित होत. डॉक्टरांना वाटत होतं एक आणि कलेक्टर वेगळच सांगत होते. डॉक्टर काहीच बोलत नाहीत म्हणून कलेक्टर पुढे म्हणाले,

” तुमची नक्की काही हरकत नाही ना?”

श्रीराम लागू म्हणाले,”का? हरकत घेण्यासारखं त्यात काही असत का? मला माहित नाही म्हणून विचारलं! “

यावर कलेक्टरनी उत्तर दिल की,

“तसं नाही हो! काही जण पुरस्कार जाहीर झाला की तो नाकारतात. कारण त्यांना त्यामुळे प्रसिद्धी मिळते. तुमच्या उत्पल दत्त यांनी सुद्धा असच केलं. पुरस्कार जाहीर झाल्यावर सरकारचा निषेध म्हणून पत्रक काढून नाकारला. म्हणून आम्ही आता आधीच विचारून घेतोय.”

पुढे २६ जानेवारीला रीतसर पद्म पुरस्कार सन्मान ज्यांना मिळालाय त्यांची यादी जाहीर झाली. वर्तमानपत्रात डॉक्टर लागूंच नाव पाहताच सामनाच्या शुटींग युनिट मध्ये उत्साह संचारला. स्टुडीओमध्ये सगळेजण डॉक्टरांचं अभिनंदन करू लागले. निर्माते रामदास फुटाणे यांनी तर एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. जयप्रभा स्टुडीओचे मालक भालजी पेंढारकर यांना बोलावलं.

सत्काराच्या कार्यक्रमाला भालजी पेंढारकर तर आलेच शिवाय त्यांनी सोबत सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना देखील आणलं.

खरेतर लता मंगेशकर तेव्हा डॉक्टर लागूनां ओळखत देखील नव्हत्या. पण तरीही त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता लागूंच्या गळ्यात हार घालून त्यांचा सत्कार केला. पण श्रीराम लागुना राहून राहून एकच प्रश्न सतावत होता, आपल्याला हा पुरस्कार का दिला असेल?

तेव्हा लागूंच वय होतं अवघ ४७. खरं तर आत्ता पर्यंत त्यांचे दोनच सिनेमे आले होते. ज्याच शुटींग सुरु होतं तो सामना त्यांचा तिसरा सिनेमा. पहिला पिंजरा हा तुफान गाजला होता. त्यापाठोपाठ हिंदीमध्ये जया भादुरी बरोबर आहट नावाचा सिनेमा येऊन गेला होता. शिवाय त्यांची नटसम्राट वगैरे नाटकं मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालत होते. पण अजून पद्मपुरस्कार मिळाव एवढी त्यांची मोठी कारकीर्द नव्हती.

मुळात व्यावसायिक अभिनय क्षेत्रात येऊनच त्यांना फक्त ४ ते पाच वर्ष झाली होती. डॉक्टर लागू म्हणतात, 

“तो पुरस्कार मला मिळाल्यावर मी चक्रावून गेलो. माझ्या समकालीनांपैकी कोणाच्याच वाट्याला हा सन्मान आल्याचे दिसत नव्हते. म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ असणार असा फुशारकीचा विचारही मनात डोकावू लागला होता.”

मुंबईला परतल्यावर एकदा त्यांची भेट कुमुद्बेन मेहता यांच्याशी झाली. त्यांचा अनेक उच्चपद्स्थांशी परिचय होता, अत्यंत निर्मळ मनाच्या अत्युच्च कलाभिरुची असणाऱ्या गांधीवादी कुमुद्बेन मेहता या सेन्सॉरच्या लढाईत डॉक्टर लागू व इतर नाटकवाल्यांच्या पाठीशी राहिल्याने मराठी नाट्यसृष्टीत सर्वांच्या आदराचे स्थान होत्या.

डॉक्टर लागुनी त्यांच्याकडे आपल्याला पद्मश्री कसा काय मिळाला याची चर्चा सुरु केली. तेव्हा कुमुदताईनी सिगरेटचा एक सखोल झुरका घेतला आणि डोळे मिचकावत म्हणाल्या,

“डॉक्टर, गेल्या वर्षी तुम्हाला हार्ट अटॅक आला. त्या आधी दिल्लीत यशवंतराव अन् दिल्लीकर श्रेष्ठींनी तुमची नाटके पाहिली होती. तुमच्या हार्ट अटॅकनंतर सगळ्यांना वाटले की तुमची कारकीर्द संपली ! उद्या तुमचे बरे वाईट झाले तर लोकांनी असे म्हणू नये की सरकारने तुमचे काहीच कौतुक केले नाही! म्हणून पटकन तुम्हाला पद्मश्री देऊन टाकली आहे !”

श्रीराम लागू आपल्या आत्मचरित्रात सांगतात,

“आपले हवेत तरंगलेले पाय पकडून ते परत जमिनींवर टेकवणारी माणसे आपल्या मित्रपरिवारात असणे मोठे भाग्याचे असते! “

यानंतर जवळपास चाळीस वर्षे श्रीराम लागू यांनी आपली कारकीर्द गाजवली. आपल्या अभिनयाचा मापदंड बनवून इतरांना आदर्श निर्माण केला. अनके पुरस्कार मिळवले. पण या पहिल्या पुरस्काराची गमतीशीर कथा ते कधीच विसरले नाहीत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.