किल्लारी भूकंपानंतर काँग्रेसचे इतर नेते पडले पण पद्मसिंह पाटील भरघोस मतांनी निवडून आले..

३० सप्टेंबर १९९३. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. सगळीकडे गणपती विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पाडत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे गृहमंत्रीदेखील असल्यामुळे रात्रभर ते मिरवणुकांचा आढावा घेत होते. रात्री तीन साडेतीन वाजता ते नुकताच झोपले असतील नसतील इतक्यात काही मिनटात हादरे जाणवू लागले. वर्षा बंगल्याच्या काचा हलण्यापर्यन्त हा मोठ्ठा धक्का होता.

महाराष्ट्रातला आजवरचा सर्वात मोठा भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू होते लातूर जिल्ह्यातील किल्लारी.

शरद पवारांना या संकटाची तीव्रता जाणवली. रात्री भूकंप झाला अन सकाळी साडे सात वाजता स्वतः मुख्यमंत्री किल्लारीमध्ये होते. त्यांच्या सोबत दोन कर्तबगार मंत्री सावली सारखे उभे होते. एक म्हणजे लातूरचे विलासराव देशमुख आणि दुसरे उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील.

भूकंपाचे धक्के संपुर्ण राज्यभराला जाणवले असले तरी मुख्य नुकसान लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात झालं होतं. 

 गावातील सारी घरे जमिनदोस्त झाली होती. ढिगाऱ्याखालून माणसांच्या कण्हण्याचे आवाज येत होते. अनेकजण झोपेतच मृत्यूच्या दाढेत सापडले होते. काही अडकलेले मृतदेह हातानेच बाहेर ओढून काढले. सर्वत्र आक्रोश सुरु होता. कोणालाच कळत नव्हतं काय करायचं.

मुख्यमंत्री शरद पवार यांनी सगळी सूत्रे हातात घेतली. त्यांनी लातूर, उस्मानाबाद बरोबरच परभणी, जालना, बीड, औंरगाबाद, नांदेड इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, उपजिल्हाधिकाऱ्यांना व संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाचारण केलं. प्रत्येकाकडे गावांची जबाबदारी देण्यात आली.

पुढचे १५ दिवशी मुख्यमंत्री स्वतः सोलापुरात ठाण मांडून बसले होते. तिथून मदतीची सगळी चक्रे फिरवली जात होती.

विशेष म्हणजे त्यावेळेसचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी तातडीने पाहणी दौऱ्यावर निघाले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने न येता पंधरा दिवसांनी येण्याची विनंती केली.

कारण तुम्ही लगेच आलात तर अधिकाऱ्यांना मदत कार्य थांबवून तुमच्यामागे फिरावे लागेल असे स्पष्टपणे सांगितले. त्यांची विनंती मान्य करून ते दोघेही पंधरा दिवसांनंतर किल्लारी भागात आले. केंद्रिय अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक बॅंकेशी चर्चा करुन तात्काळ कर्ज संमत करण्यात आलं.

मुंबईत मुख्य सचिवांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष उभारण्यात आला. किल्लारी उमरगा अशी थेट संपर्कासाठी हॉटलाईन उभारण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न तर सुरु होते पण शिवाय लातूर- उस्मानाबादचे पालकमंत्री विलासराव देशमुख व पद्मसिंह पाटील मदत कार्यात आघाडीवर होते.

  विशेषतः पद्मसिंह पाटील.

उस्मानाबाद मध्ये पेहलवान म्हणून ओळखलं जाणारे पद्मसिंह पाटील म्हणजे रांगडं व्यक्तिमत्व. जिल्हापरिषदेचे सदस्य या पदापासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली होती. याच काळात त्यांची तिकीट देण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून आलेल्या शरद पवार यांच्याशी ओळख झाली. पवारांना त्यांनी आपला राजकीय गुरु मानलं.

पद्मसिंह पाटलांच्या नावाचा दरारा उस्मानाबादचं नाही तर मुंबईच्या राजकारणात देखील प्रसिद्ध होता. जेव्हा छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यावर हल्ला होत असताना पद्मसिंह पाटील यांचं संरक्षण देण्यात आलं. त्यांच्यामुळेच भुजबळांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही.

पवारांच्या मंत्रिमंडळात सिंचन मंत्री, गृह मंत्री अशा मोठ्या जबाबदाऱ्या पद्मसिंह पाटलांकडे सोपवण्यात आल्या. अशातच जेव्हा त्यांच्या उस्मानाबाद मध्ये भूकंप झाला तेव्हा ते तातडीने घटनस्थळी हजर झाले.

मराठवाड्यातील इतर नेते जेव्हा आपल्या कपड्याना चिखल लागू नये म्हणून आपल्या हस्तीदन्ती मनोऱ्यात बसून कारभार हाकत होते तेव्हा पद्मसिंह पाटील स्वतः गावोगावी फिरून भूकंपग्रस्तांना आपला खांदा देत होते. त्यांच्या कुशीत शिरून रडणारी जनता आपला नेता आपल्या पाठीशी उभा आहे हे पाहून धीराने पुन्हा उभे राहण्याचे बळ एकवटत होती.

मृतांवर अंत्यसंस्कार करणे, जखमींना ढिगाऱ्यांखालून काढून उपचाराला पाठवणे, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणे ही कामे त्यांनी पुढे होऊन केली.

कालांतराने किल्लारी उस्मानाबाद येथील लोकांच्या भूकंपाच्या जखमा भरल्या. तत्कालीन राज्य सरकारने केलेल्या कामाचे कौतुक अगदी जागतिक स्तरावर झाले. शरद पवार, विलासराव व पद्मसिंह पाटील हे मंत्री शिवाय प्रवीण सिंह परदेशी यांच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या मेहनतीला शाबासकी देण्यात आली.

पुढच्या दोनच वर्षात राज्यात विधानसभा निवडणूका आल्या. राज्यात तेव्हा एन्रॉन प्रकल्पावरून शरद पवारांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. याचा फटका त्यांना बसला. मात्र काँग्रेसला सगळ्यात मोठी झळ मराठवाड्यात बसली. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्व उमेदवार पडले. औरंगाबाद , नांदेड व इतर मराठवाड्याच्या भागात काही वेगळी स्थिती नव्हती.

भूकंपाच्या वेळी जे नेते जमिनीवर उतरले नाहीत त्यांना या निवडणुकीत मराठवाड्याच्या जनतेने दणका दिला होता. यात दुर्दैवाने विलासराव देशमुखांचा देखील समावेश झाला. किल्लारीच्या भूकंपात त्यांनी मोठं कार्य केलं होतं मात्र त्यांना मुख्यतः नियंत्रण कक्षाची जबाबदारी दिली असल्यामुळे त्यांना म्हणावे तेवढे जिल्ह्यात फिरता आले नाही. विरोधकांनी त्याचे भांडवल करत त्यांच्या विरुद्ध मोहीम राबवली. 

असं म्हणतात की काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी देखील विलासरावांच्या विरोधात आतून मदत केली होती. याचाच परिणाम विलासराव देशमुख ३२ हजार मतांनी पडले.

याउलट उस्मानाबाद मतदारसंघात पदमसिंह पाटील यांचा एकतर्फी विजय झाला. काँग्रेस विरोधी लाट असूनही ते विरोधकांपेक्षा दुप्पट मते घेऊन निवडून आले.

आजही जेव्हा सर्वसामान्य जनतेवर नैसर्गिक अथवा कोणतेही संकट कोसळले तर मराठवाड्यात पद्मसिंह पाटलांचे उदाहरण हमखास सांगितले जाते. नेत्यांनी हेलिकॉप्टर अथवा विमानाने दौरा करण्याऐवजी स्वतः जमिनीवर उतरून जनतेला धीर दिला तर त्यांना सावरण्यासाठी दुप्पट बळ मिळते हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.