स्वयपांक करत असताना समजल आपल्याला पद्मश्री मिळाला आहे !!!

त्या नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम संपवून घरी आल्या. घरी चहापाणी केलं, साफसफाई केली आणि स्वयंपाक करणार तोच त्यांना फोन आला. पलीकडून सांगितलं गेलं,  तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे !!!  त्यांनी गडबडीनं टिव्ही चालू केला, तेव्हा समजल शासनानं त्यांचा पद्मश्री पुरस्कार देवून गौरवलेलं आहे. एका गृहणीला पद्मश्री भेटण्याची ही कथा जागतिक महिला दिनानिमित्त खास बोल भिडूच्या वाचकांसाठी…

सितव्वा बेळगाव जिल्ह्यातील कब्बूर हे त्यांच मुळ गाव. पण आज कामाच्या निमित्ताने त्या घटप्रभा येथे स्थायिक झाल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षी देवदासी होण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला. सितव्वा या त्यांच्या घरातीलं नववं अपत्य. नववी देखील मुलगी झाली म्हणून सितव्वाच्या आईवडिलांनी सितव्वाला देवाला सोडण्याचा निर्णय घेतला. देवदासीचं आयुष्य जगताना होणाऱ्या हालअपेष्टा त्यांना जीवन संपवण्यापर्यन्त घेवून चालल्या होत्या पण यातून बाहेर पडायचं ठरवून त्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करु लागल्या.

याचदरम्यान सन १९९१ साली कर्नाटक राज्य महिला कल्याण निगमच्या माध्यमातून सितव्वा शासनाच्या एका प्रकल्पाचा हिस्सा झाल्या. देवदासी प्रथेविरोधात जागरूकता निर्माण करणं, देवदासी महिलांना मुख्य कामात आणणं, एड्स सारख्या रोगाबाबत जागरूकता निर्माण करणं अस या कामाचं स्वरूप. या प्रकल्पामार्फत त्या गावोगावच्या देवदासी महिलांना भेटू लागल्या. घरबसल्या मेणबत्ती करणं, अगरबत्ती करणं, शिवणकाम करणं यांसारखे कामं त्या महिलांना शिकवू लागल्या यावेळी त्यांच वय होत अवखं १७ वर्ष.

शासनाच्या या कामासोबतच आपणही हे काम तितक्याच ताकदिने करु शकतो या विचाराने त्यांनी १९९७ साली महिला कल्याण आणि रक्षण संस्था अर्थात महिला अभिवृद्धीमत्तु संरक्षण म्हणजेच मास या संस्थेची स्थापना केली. गावोगावच्या जत्रेत जायचं आणि लोकांना देवदासी प्रथेविरोधात समजून सांगायचं अस त्याचं स्वरुप. कामानं व्यापक स्वरूप घेतलं आणि यल्लमा देवीच्या पुजाऱ्यांनी, सनातनी लोकांनी त्यांना धमक्या द्यायला सुरवात केली पण जस जस या कामांच स्वरुप लोकांच्या लक्षात येवू लागलं तसा तसा विरोध संपू लागला. विरोध करणारेच त्यांच काम पाहून त्यांच्या पाठींब्यासाठी उभे राहू लागले.

हळूहळू करत संस्था निर्माण झाली. संस्थेमार्फत गेल्या वीस वर्षात तब्बल ४८०० देवदासी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पद्मश्री सित्ताव्वा यांनी केलं. चिकोडी, अथणी, रायबागसह बेळगाव जिल्ह्यातील दहा तालुक्यातून हे काम मोठ्या प्रमाणात चालू लागलं. “माझ्या वाट्याला जे आलं ते या मुलींच्या वाट्याला यायला नको” या विचारातून सुरू झालेलं हे काम आज देवदासी प्रथा समुळ नष्ट करण्याच्या मार्गावर येवून ठेपलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.