अजय देवगणच्या या गाण्यामागे शेतकरी आंदोलनाचा मोठा इतिहास दडला आहे.

आज पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमाभागात पोलिसांचा व शेतकऱ्यांचा जोरदार संघर्ष सुरु आहे. सरकार हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

विशेषतः पंजाबमधून आलेल्या शीख शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पण हे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत. आज नाही तर कधीच नाही अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलनकर्ते एकच नारा देत आहेत,

“पगडी संभाल जठठा पगडी संभाल ओय “

अजय देवगणच्या लिजंड ऑफ भगतसिंग सिनेमात हे गाणं आपण ऐकलं होतं. पण या गाण्याचा आणि पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा संबन्ध काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर या गाण्याचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इतिहास १०० वर्षे जुना आहे आणि याचा शहीद ए आझम भगतसिंग यांच्या कुटुंबाचा अगदी जवळचा संबन्ध आहे.

गोष्ट आहे १९०७ सालची. तत्कालीन इंग्रज सरकारने पंजाब प्रांतात कोलोनायजेशन बिल नावाचा एक कायदा लागू केला होता. हा कायदा सरकारला कालवे काढण्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची जमीन कोणत्याही परवानगी शिवाय ताब्यात घेण्याचा अधिकार देत होता. जे शेतकरी सरकार विरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांची जमीन या कायदयाच्या नावाखाली सरकार दरबारी जमा करण्याचा हा डाव होता.

याच्या विरुद्ध आवाज उठवला सरदार अजितसिंग यांनी.

सरदार अजित सिंग म्हणजेच क्रांतिकारक भगतसिंग यांचे सख्खे काका. जालंधर मधील खट्करकलां या गावात त्यांचा जन्म झाला. जालंधर येथील साईनदास अँग्लो संस्कृत शाळेत त्यांच प्राथमिक शिक्षण झालं होतं. पुढे बरेली येथे वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी आले. इथेच त्यांची आर्य समाजाच्या विचारांशी ओळख झाली. लाला लजपतराय व इतर क्रांतीवीरांच्या पासून प्रेरणा घेऊन निम्म्यातच कॉलेज सोडून दिलं.

अन् स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.

लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली गरीब शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न यांना वाचा फोडण्यास सुरवात केली. यात त्यांचे मोठे बंधू किशन सिंग यांची देखील साथ होती. यासाठी भारत माता संगठन स्थापन करून तिच्या मार्फत त्यांचं कार्य सुरु होतं. 

१९०३ साली दिल्लीमध्ये इंग्लंडच्या राजाच्या राज्याभिषेकाच्या निमित्त दिल्ली दरबार भरवण्यात आला होता. संबंध देशातले राजे महाराजे या कार्यक्रमासाठी हजर होते. त्यावेळी अजितसिंग आपल्या भावाला घेऊन दिल्लीला गेले होते. या संस्थानिकांना १८५७ च्या उठावाप्रमाणे प्रेरित करायचे प्रयत्न त्यांनी तिथे केले पण यात यश आले नाही.

मात्र याच १८५७ च्या उठावाच्या पन्नास वर्षांच्या स्मृतीचा मुहूर्त साधून त्यांनी पंजाबमध्ये कोलोनायजेशन बिलाच्या विरुद्ध पगडी संभाल हे आंदोलन सुरु केलं. 

त्याकाळी अनेक पंजाबी शेतकऱ्यांची मुले ब्रिटिश सैन्यात नोकरीला होती, अनेक जण सरकारी नोकरी करत होते. आपल्या शेतकरी बापाची पगडी आपल्यालाच सांभाळायची आहे असं म्हणत या सगळ्यांच्या स्वाभिमानाला अजितसिंग यांनी हात घातला. पंजाबमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या झांग स्याल या वर्तमानपत्राचे संपादक बांके दयाल यांनी हे गीत अजित सिंग यांना ऐकवले होते. त्यातूनच या आंदोलनाची प्रेरणा घेण्यात आली होती.

तू धरती की मांग संवारे सोए खेत जगाए
सारे जग का पेट भरे तू अन्नदाता कहलाए
फिर क्यो भूख तुझे खाती है और तू भूख को खाए
लुट गया माल तेरा लुट गया माल ओए
पगड़ी संभाल जट्टा. 

अजित सिंग यांच्या आवाहना नुसार पंजाबी तरुण वर्ग पेटून उठला.

३ मार्च १९०७ रोजी आज पाकिस्तानात असलेल्या ल्यालपूर या गावी शेतकऱ्यांचा महा मोर्चा काढण्यात आला. पगडी संभालच्या घोषणा देत पंजाबी शेतकरी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला होता.

फक्त पंजाबमध्येच नाही तर भारतात झालेल्या पहिल्या शेतकरी आंदोलनापैकी एक असे या आंदोलनाचे वर्णन करण्यात आले. ल्यालपूर येथे २०० सैनिकांची बैठक देखील झाली. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उठावाचा कट शिजू लागला. बघता बघता हे क्रांतीचे लोण संबंध पंजाबमध्ये पसरले. गदर संघटनेमार्फत परदेशात असणाऱ्या पंजाबी लोकांकडून या उठावासाठी मदत पाठवण्यात येत होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या विरोधात उतरले आहेत हे बघून ब्रिटिश सरकारला हादरा बसला. शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे पंजाबी रेजिमेंटच्या जवानांच्यात पसरले तर आपली धडगत नाही याची त्यांना खात्री होती.

हा धोका देशभर पसरू नये म्हणून निष्ठुरपणे हे आंदोलन चिरडण्यात आले. सर्व मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली. लाला लजपतराय व सरदार अजितसिंग यांना भारताबाहेर मंडाले येथील कारागृहात पाठवण्यात आले.

त्याचवर्षी भगतसिंग यांचा जन्म झाला. पण त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या घरातील वडील काका व सगळे कर्ते पुरुष मंडळी पगडी संभाल आंदोलनामुळे जेल मध्ये गेले होते. स्वातंत्र्यलढ्याचं बाळकडू भगतसिंग यांना जन्मापासूनच मिळालं. त्यांना आपल्या काकांचा सहवास जास्त लाभला नाही पण त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा भगतसिंग यांनी पुढे नेला.

दरम्यानच्या काळात पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने एवढं विक्राळ स्वरूप घेतले कि ब्रिटिशांना हा अन्यायी कायदा मागे घ्यावा लागला. अजितसिंग यांची लवकरच मंडाले येथून सुटका देखील झाली.

अजित सिंग यांचे कार्य त्यांचे व्यक्तिमत्व पाहून स्वतः लोकमान्य टिळक यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांची राष्ट्रपती पदी निवड व्हावी असं मत व्यक्त केलं होतं.

पुढे सुटकेनंतर गुजरात इथल्या काँग्रेस अधिवेशनात अजितसिंग सहभागी झाले. तिथे देखील त्यांनी सशस्त्र क्रांतीशिवाय भारताला तरणोपाय नाही असं जाहीर वक्तव्य केलं. त्यांच्यावर ब्रिटिश पोलिसांची पाळत सुरु झाली. त्यांना झुकांडी देऊन अजितसिंग यांनी भारताचे बॉर्डर पार केले.

अफगाणिस्तान, इराण मग ब्राझील, अमेरिका, इटली, जर्मनी अशा अनेक देशात राहून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतीची मशाल तेवत ठेवली.गदर पार्टीत राहून त्यांनी आपलं काम चालू ठेवलं . या काळात मुसलोनी, हिटलर अशा नेत्यांशी त्यांचा संपर्क होता.

असं सांगितलं जातं की जर्मनीला आलेल्या सुभाष बाबूंना हिटलर ची भेट घालून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

पुढे १९४६ साली ते नेहरूंच्या सांगण्यावरून भारतात परत आले. त्यांना अटक करण्यात आली पण काही दिवसांनी सुटका झाली. जवळपास ४० वर्षांनी ते आपल्या घरी परत गेले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे अखेरचे शब्द होते,

“Thank God, my mission is fulfilled.

आजवर भगतसिंग यांच्यावर जितके सिनेमे आले त्यात पगडी संभाल जठ्ठा हे गाणे आहेच. या शब्दांनी फक्त शहीद ए आझम भगत सिंगच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.

आजही दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते पगडी संभाल आंदोलनाला आपला आदर्श मानून त्याच जिद्दीने सुरु आहे. फरक इतकाच की तेव्हा परकीय ब्रिटिश सरकार होतं यावेळी शेतकऱ्यांचा लढा आपल्याच सरकारशी सुरु आहे.

 हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.