कोल्हापूरचे पहिलवान पंतप्रधानांसोबत फोटो काढून घेण्यासाठी हट्टाला पेटले ..

शाहू महाराजांची नगरी कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी. इथल्या लाल मातीत घुमून अनेक हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी निर्माण झाले. कुस्तीला खऱ्या राजाश्रय कोल्हापुरात मिळाला. संस्थाने खालसा झाल्यावर छत्रपतींची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली. या मातीने कुस्तीला लोकाश्रय मिळवून दिला.

आजही कोल्हापुरात जागोजागी आखाडे, तालमी पाहायला मिळतात. इथल्या पहिलवानांनी दिल्लीच काय तर ऑलिंपिक पर्यंत मजल मारलेली आहे.

कोल्हापूरच्या तालमीच्या पहिलवानांवर तिथली जनता इतकं प्रेम करते की अगदी राजकारणात देखील तालमीच्या वस्तादांच शब्द प्रमाण मानला जातो.

असाच एक किस्सा कोल्हापूरच्या पहिलवानांच्या राजकारणातील दबदब्याचा..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. तेव्हा देशाचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव हे होते. त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची बोलणी सुरु होती. कोणाकोणाची नावे त्यात घेतली जावी यावरून चर्चा आणि वाद विवाद सुरु होते.

त्याकाळात कोल्हापूरचे खासदार होते उदयसिंहराव गायकवाड. अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसचे एकनिष्ठ खासदार, दिल्लीत दबदबा असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जायचं. अनेक वर्ष त्यांनी इथल्या खासदारकीची सीट जिंकली होती. गायकवाड यांचा अनुभव आणि एक निष्ठतेचा सन्मान करण्यासाठी केंद्राने त्यांना मंत्री करावं अशी कोल्हापूरच्या जनतेची अपेक्षा होती.

हे पंतप्रधानांच्या कानावर घालावं म्हणून कोल्हापूरचे सर्व दिग्गज पैलवान एकत्र आले आणि त्यांनी दिल्लीला जायचं ठरवलं.

दिल्लीत तेव्हा सगळ्या मराठी माणसांचा आधार होते केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार. कोल्हापुरातून महाराष्ट्र केसरी युवराज पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे असे एका पेक्षा एक मोठे पहिलवान दिल्लीला आले होते. त्यांनी शरद पवारांना साकडं घातलं की आमची पंतप्रधानांशी भेट घालून द्या.

शरद पवारांनी मिटिंग फिक्स केली. संध्याकाळच्या वेळी सगळेजण पंतप्रधान निवासाच्या बंगल्यावर गेले. बोलणं झालं, नरसिंह राव यांच्या सोबत त्यांचे फोटो काढण्यात आले. सगळं आवरल्यावर पहिलवान मंडळी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या बंगल्यावर परतली.

रात्री तो फोटोग्राफर त्यांना फोटो देण्यासाठी आला. पण पाहतात तर काय सगळे फोटो खराब आले होते. अंधारात कोणाचाही चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. पहिलवानांच्या पैकी कित्येकजण पहिल्यांदाच पंतप्रधानांना त्यांच्या निवासस्थानी भेट होते. त्यांच्यासाठी ही अपूर्वाईची गोष्ट होती.

पण फोटोग्राफरच्या चुकीमुळे ते क्षण व्यवस्थित टिपले गेले नव्हते. 

कोल्हापूरकर यामुळे नाराज झाले. अशातच महाराष्ट्र केसरी पहिलवान युवराज पाटील मात्र प्रचंड संतापले. महाबली सतपालला हरवणारा पहिलवान म्हणून त्यांची देशभरात ख्याती होती. रांगड्या स्वभावाच्या पैलवान युवराज यांना आपली भेट वाया गेली म्हणून राग आला होता. ते म्हणाले,

उद्या पुन्हा पंतप्रधानांच्या घरी जायचं आणि चांगला फोटो काढून घ्यायचा.

पंतप्रधानांसारखी अत्युच्च पदावरील व्यक्ती ही प्रचंड व्यस्त असते, त्यांना भेटून ५ मिनिटे बोलण्यासाठी देखील मारामार असते आणि आपल्याला फक्त फोटो काढण्यासाठी ते परत परत का भेटीतील असं म्हणत इतर पहिलवानांनी युवराज पाटील यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण ते हट्टाला पेटले.

अखेर नुसता विचारून तरी बघू असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयाला लावला. महाराष्ट्रातील अमुक अमुक हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी झालेले मल्ल पुन्हा भेटण्यासाठी येणार असल्याचे त्यांना सांगितले. ते कशासाठी पुन्हा येणार आहेत त्याचे कारणही सांगण्यात आले. पंतप्रधानांचे खाजगी सचिव राम खांडेकर हे पवारांच्या जुन्या परिचयाचे होते. त्यांच्याजवळ फक्त पाच मिनिटे वेळ द्या अशी विनंती करण्यात आली. 

गंमत म्हणजे, पंतप्रधान कार्यालयाने त्यांची विनंती मान्य केली. हे सारे राष्ट्रीय मल्ल असल्याने त्या आदरापोटी कदाचित पंतप्रधानांनीच त्यांच्या भेटीसाठी संमती दिली असावी.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपला कोल्हापुरी फेटा गुंडाळून हि सारी मंडळी पुन्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेली. सकाळचे दहा वाजले असावेत. त्या दिवशीही शरद पवार त्यांच्या सोबत आले होते. नरसिंह राव या पहिलवानांना दुसऱ्यांदा बघून कशी प्रतिक्रिया देतील याची सुद्धा काही कल्पना नव्हती.

मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी त्यांचे आनंदाने स्वागत केलं. सर्वानी त्यांच्यासोबत मनसोक्त फोटो काढले. नरसिंह राव म्हणाले,

‘तसे कामाच्या निमित्ताने मला भेटायला तर रोज शेकडो लोक येतात, परंतु तुमच्यासारखे धिप्पाड लोक बघितले की डोळेही सुखावतात.’

निवृत्त झाले असले तरी हे सारेच पहिलवान त्यावेळी प्रकृतीने दणकट होते. त्यांच्या सोबत आलेले शामराव भिवाजी पाटील व सखाराम बापू खराडे हे कुस्ती खेळत नसले तरी त्यांचीही प्रकृती चांगली होती.

यावेळी पंतप्रधानांनी या रांगड्या पहिलवानांशी मनसोक्त गप्पा देखील मारल्या. ते स्वतः मराठी देखील उत्तम बोलायचे. पण हिंदकेसरी दीनानाथ सिंह त्यांच्याशी उर्दूमिश्रित हिंदी बोलले. त्यांच्या भाषेचा लहेजा पंतप्रधानांना खूप आवडला. पहिलवानही इतकी चांगली भाषा बोलू शकतो याचे त्यांना अप्रुप वाटले.

दीनानाथ सिंह यांनी त्यांना ‘‘बडी मुश्कील से इस दिलकी बेकरारी को करार आया.. जिस जालीमने मुझको तडपाया, उसीसे प्यार आया..!’’ हा शेर ऐकवला.

पंतप्रधानांना उर्दू देखील येत होती. त्यांनीही आपण हैदराबादमध्ये शाळेत उर्दूतून शिकलो असे सांगितले. त्यांनी पहिलवानांना तुम्ही कुठे शिकला असे विचारले. दीनानाथ सिंह म्हणाले,

साहेब, आमच्या जन्माचा आखाडा झाला. माती हेच आमचे कॉलेज. त्यामुळे मला शिकता आले नाही.

काहीच शिक्षण नसताना साहित्य व शेरोशायरींचे ज्ञान कसे व कुठून मिळाले याबद्दल त्यांना उत्सुकता होती. ‘यह सब ईश्वर की देन है’ असे पहिलवान म्हणाले. यावेळी खुश होत नरसिंह राव यांनी देखील आपण राजकारणातून जवळपास निवृत्त झालो असताना अचानक दैव योगाने पंतप्रधान कसे बनलो याचा किस्सा सांगितला.

एकूणच कुस्तीची ताकद आणि मराठी पहिलवानांचा दबदबा दिल्लीकरांना देखील अनुभवायला मिळाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.