दलित कुटुंबातून आलेल्या पैकाबाई भारतातल्या पहिल्या महिला उद्योजिका होत्या.
गोष्ट आहे विसाव्या शतकाच्या सुरवातीची. देशावर इंग्रजांचं राज्य सुरु होतं. हि गुलामी कमी कि काय म्हणून दीन दलित समाजावर परंपरांच्या जोखडांचं ओझं ते वेगळंच होतं. विषमतेच्या दलदलीतून बाहेर येण्याची धडपड दलित समाजाला गावकुसाच्या बाहेरून शहराच्या दिशेने नेऊ लागली होती.
यातच होते भिवाजी खोब्रागडे
राहायला देवाडा येथे असले तरी भिवाजी यांचं मूळ गाव गडचिरोली जिल्ह्यातलं. तिथल्या खोब्रागडी नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या कुटूंबाना खोब्रागडे हे आडनाव पडले आहे. भिवाजी यांनी आपली पत्नी व दोन मुलांसह देवाडा सोडलं आणि चांदा गाठलं. चांदा म्हणजेच आजच चंद्रपूर.
इंग्रजांच्या बेरार प्रांतातील एक मुख्य ठिकाण. या परिसरात कोळसा, लोखंड, बेरियम सल्फेट, चिनीमाती इ. खनिजे मिळतात. तसेच जंगलाचे प्रमाणही मोठे असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना चंद्रपूर हेच मध्यवर्ती ठिकाण पडते. यामुळेच सुरवातीपासूनच हे गाव समृद्ध आहे.
पोटापाण्याचा उद्योग शोधण्यासाठी खोब्रागडे कुटूंब चंद्रपूरला आलं.
इथे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे असलेल्या दादमहाल वॉर्ड येथे त्यांनी आपले बस्तान बसवले. इथे त्यांनी फळांचा उद्योग सुरु केला. आंब्याच्या आंबराया, पेरूचे बगीचे, चिंचेची झाडे, टरबूज-खरबूज यांच्या वाड्या ठेक्याने घेऊन फळे विकण्याचा धंदा भिवाजीनी हाती घेतला. अगदी काही काळातच यात त्यांनी जम बसवला. या कामात त्यांची बायको देखील साथ देत असे.
त्यांच्या पत्नीचे नाव होते पैकाबाई तर मुलांचे नाव होते पत्रुजी आणि गोविंदराव.
भिवा जी खोब्रागडे यांना शिक्षणाचं महत्व खूप लवकर उलगडलेलं होतं. दारिद्र्याच्या खाईतून बाहेर यायचं असेल तर शिक्षणाचा सहारा घ्यावाच लागेल यावर त्यांची खात्री बसली होती. म्हणूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शाळेत घातलं.
चांद्यात फळ व्यावसायिक म्हणून खोब्रागडे कुटूंबाने नाव कमावलं. शहरात जातीभेदाचे दारे क्षीण झालेली असतात हे भिवाजीनी अनुभवलं होतं. आपल्या गावातील समाजबांधवांनादेखील त्यांनी शहरात येण्याबद्दल आवाहन केलं होतं. या भागातील दलित समाजाला स्वाभिमानाची व उद्योग धंद्याची प्रेरणा त्यांनी दिली.
आताशा त्यांच्या घराला चांगले दिवस येऊ लागले होते. पैका बाई यांच्या पोटी तिसऱ्या पुत्ररत्नाच आगमन झालं, याच नाव ठेवण्यात आलं देवाजी. हे देवाजी अवघे दोन वर्षांचे होते तेव्हा अचानक भिवाजी यांचं निधन झालं. दलित समाजाला दिशा देणारा आधारस्तंभ हरपला. व्यवसायात जम बसत असतानाच कर्ता माणूस गेल्यामुळे कुटुंबाची वाताहत होण्याची वेळ आली.
पैकाबाई मात्र धोरणी, खंबीर व मेहनती होत्या. त्यांनी आपल्या नवऱ्याचा व्यवसाय आपल्या हाती घेतला.
जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. बायका चूल आणि मूल यात अडकल्या असताना पैकाबाई यांनी पतीच्या व्यवसायाची जबाबदारी उचललीच नाही तर त्याच्या सीमा देखील विस्तारल्या. पतीचं छत्र हरपल्याची कोणतीही झळ त्यांनी मुलांवर पडू दिली नाही.
दलित समाजातीलच नाही तर भारतभरातील पहिल्या महिला उद्योजिका म्हणून पैकाबाईंना आजही ओळखले जाते.
हळूहळू मुले हाताशी येऊ लागली. आईला व्यवसायात मदत व्हावी आणि छोट्या भावाकडे लक्ष देखील देता यावे म्हणून मोठ्या दोघांनी शाळा निम्म्यात सोडली. त्यांचे एक दूरचे नातेवाईक चंद्रपूर मध्ये टेलरिंग काम करायचे, त्यांच्याकडे हे दोन्ही भाऊ शिकण्यासाठी जाऊ लागले. देवाजींच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष देण्यात आलं. देवाजी हुशार होते. त्यांनी इंग्रजी १०वि पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मात्र त्यांनीही शिक्षण सोडून कोळश्याच्या खाणी टाइम किपर म्हणून नोकरी सुरु केली.
फळबागांच्या ठेक्याचं काम चालूच होतं मात्र या तिन्ही भावांनी आईला लाकडाच्या धंद्यात उतरण्यासाठी तयार केलं. चंद्रपूर हे जंगलाचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतं. लाकडाच्या व्यवसायात खोब्रागडे बंधूनी भक्कमपणे पाय रोवले.
त्यांनी बल्लारपूर येथे मोठी जागा घेऊन आपला व्यवसाय वाढवला. चांदा ते सिरोंचा दरम्यान हजारो मजुरांना त्यांनी लाकडू कटाईच्या कामाला लावले. हिगणघाटच्या खास कारागिरांना बोलावून या व्यवसायात एक कसब निर्माण केलं. बल्लारपुरात हिंगणघाट मोहल्ला वसला आहे हि देणं खोब्रागडे कुटुंबाचीच देण.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम आरा मशीन आणून सॉ मिलचा धंदा त्यांनीच सुरु केला.
संपूर्ण देशभरातून मोठमोठे लाकडाचे व्यापारी खोब्रागडे बंधूंचं नाव ऐकून चांद्याला येत असत. विदर्भाच्याही पलीकडे दूरवरपर्यंत त्यांची प्रसिद्धीस पोहचली होती. आईने दिलेला मेहनतीचा व प्रामाणिकपणाचा मंत्र पत्रूजी,गोविंदराव आणि देवाजींनी जपला होता. याच मंत्राच्या जोरावर त्यांनी आपला व्यवसाय आंध्रप्रदेशापर्यंत वाढवला.
एकेकाळी दोन वेळच्या अन्नासाठी महाग असलेलं हे कुटुंब आंध्रप्रदेशच्या राजमहेंद्री येथील राजवाडा भाड्याने घेऊन तिथे व्यवसाय करू लागलं. या राजवाड्यातील डेपोचे उद्घाटन खोब्रागडे बंधूनी आपल्या परमप्रिय आईच्या हस्ते केल.
लाकडाच्या व्यवसायात मोठमोठी शिखरे पार करत असताना धाकट्या देवाजींनी यासोबतच कापसाच्या व्यवसायात देखील उडी घेतली. चांदा ही विदर्भाच्या कापसाची मोठी बाजारपेठ होती. दक्षिण उत्तर जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे हे प्रमुख ठिकाण. देशभरातील सगळा कापसाचा व्यवसाय इथूनच चालायचा. देवाजींनी या धंद्यातील उत्कर्ष ओळखून कापसातच पाय रोवले. यात प्रचंड पैसा कमावला.
त्यातूनच देवाजींनी चंद्रपूरच्या मेन रोडवर राजमहेंद्रीच्या राजवाड्याची प्रतिकृती उभा केली.
पुढे होलसेल सुताच्या बिझनेस पासून ते सोनेचांदी, जमीन खरेदीविक्री या व्यवसायांत ही पैसे गुंतवले. खोब्रागडे कुटुंब हात लावेल त्याला सोने बनवू लागले. चांद्यातील सर्वात श्रीमंतामध्ये त्यांची गणना होत असे. १९३० साली या गावात पहिली फोर्ड मोटार त्यांनीच आणली. पैकाबाईंनी फळांच्या ठेकेदारीत सुरु केलेला हा बिझनेस त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या कष्टामुळे आता गगनाला जाऊन पोहचला होता.
एका दलित कुटुंबाने विशेषतः स्त्रीने व्यवसायात पदार्पण करून त्याच्या शिखरावर जाण्याची हि भारतातली पहिली घटना असावी.
याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उदय झाला होता. दलित उद्धारासाठी त्यांनी सुरु केलेल्या चळवळीत खोब्रागडे कुटुंबाने देखील सहभाग घेतला. चवदार तळ्याच्या आंदोलनानंतर बाबासाहेबानी अमरावतीच्या अंबाबाई देवळात दलितांच्या प्रवेशासाठी आंदोलन केले. या आंदोलनात देवाजीबापू खोब्रागडे सहभागी झाले होते. त्या आंदोलनात बाबासाहेबांचे भाषण ऐकून त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यांनी देखील राजकारणात प्रवेश केला.
१९३७ ला बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने त्यांनी प्रांतीय निवडणुक लढवली आणि प्रचंड बहुमताने निवडूनदेखील आले.
डॉ.बाबासाहेबांचा प्रभाव देवाजींच्या मुलावरही पडला होता. त्यांच्याप्रमाणे आपणही बॅरिस्टर व्हायचे म्हणून स्वप्न त्यांनी पाहिलं. बाबासाहेब इंग्रज सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी १४ दलित मुलांना परदेशी शिक्षणासाठीची योजना आखली.
देवाजीबापूंच्या मुलाचीही त्यात निवड झाली होती मात्र बापूंनि आपल्या मुलाला स्वखर्चाने पाठवण्याचे ठरवले व आपल्या मुलाऐवजी तो खर्च दुसऱ्या होतकरू व गरीब मुलावर करण्याची विनंती केली. बाबासाहेब यासाठी तयार झाले. फक्त त्यांनी देवाजीबापूना एक अट घातली.
बॅरिस्टर बनल्यावर तुमच्या जेष्ठ पुत्राला माझ्या झोळीत टाकायचे.
पैकाबाईंचे संस्कार असलेल्या देवाजीबापूंनी बाबासाहेबांचा एक शब्द ही पडू देणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. त्यांनी त्यांची ही विनंती हसत हसत मान्य केली आणि आपला मुलगा चळवळीसाठी दान देऊन टाकला. हा मुलगा म्हणजे भारतीय आंबेडकरी चळवळीचे महान नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. बाबासाहेबांच्या धम्मचक्र परिवर्तनाचे सर्वात मोठे कार्यकर्ते व त्यांचे मानसपुत्र म्हणून पुढे जगभरात राजाभाऊंना ओळखले गेले.
उद्योग व्यवसाय व समाजकार्य यांची भिवाजी आणि पैकाबाईंनी दिलेली दीक्षा खोब्रागडे कुटुंबाने अनेक पिढ्यां जपली.
संदर्भ- महाराष्ट्राचे शिल्पकार बॅ.राजाभाऊ खोब्रागडे लेखक व्ही.डी.मेश्राम
हे ही वाच भिडू.
- या माणसाने दिलेला जय भीमचा नारा दलित उद्धाराचा जीवनमंत्र बनला
- मायावतींच्याही आधी देशभरात दलित राजकारणाचं नेतृत्व शांताबाईंनी गाजवलं होतं
- काठ्यांचा वर्षाव झाला तरीही ते मागे हटले नाहीत. पर्वतीचे मंदिर दलितांना खुलं केलंच..
- माणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते.