पाकिस्तान आणि दारूचे किस्से भन्नाट आहेत…

पाकिस्तान आणी दारूचा इतिहास भन्नाट आहे. स्वतंत्र इस्लाम राष्ट्र पाहिजे म्हणून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. पण धर्माच्या आधारावर पाकिस्तानचा हट्ट धरणारे जिना तसे धार्मिक म्हणावेत असे मुळीच नव्हते. उलट गांधीजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांसमोरही सिग्रेट ओढायला जिना कमी करत नसत. दारूही प्यायचे. आणि आग्रह धार्मिक राष्ट्राचा.

अशी विसंगती पाकिस्तानच्या जन्मापासून आहे ती आजपर्यंत. 

पाकिस्तानची निर्मिती झाली तेंव्हापासून पाकिस्तानात दारूबंदी नव्हती. दारूबंदी आणली ती बऱ्यापैकी उदारमतवादी मानले गेलेले झुल्फिकार अली भुत्तो यांनी. बरं हे भुत्तो स्वतः पट्टीचे दारुडे. एकदा एका प्रचारसभेत त्यांनी सांगितलं होतं, हां मैं शराब पिता हूं. लेकीन आवाम का खून नहीं पिता. तर अशा या भुत्तोंनी आणलेली दारूबंदी म्हणजे एक सोंग होती आणि ती तशीच राहिली.

पाकिस्तानात सुरुवातीपासून धार्मिक संघटना दारूबंदीसाठी प्रयत्न करत होत्या. कधी मोर्चे काढ. कधी बिअर बारची नासधूस कर अशा घटना चालू होत्या. पण जनतेचा पाठिंबा काही दारूबंदी चळवळीला मिळाला नाही. अयुब खान यांच्या राजवटीत एक फझहूर रहमान मलिक नावाचे इस्लामिक अभ्यासक होते.

त्यांनी बिअर सारखं पेय ज्यात अल्कोहोल पाच टक्क्यापेक्षा कमी आहे ते मुस्लिमांनी प्यायला हरकत नाही असा मुद्दा मांडला होता. या गोष्टीला धार्मिक गटांनी खूप विरोध केला. लोकांच्या भावना भडकल्या. आणि फझहूर रहमान मलिक यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

जमाते इस्लामी सारख्या संघटनानी तर पाकिस्तानी सैन्यावर पण आरोप केले. १९७१ चं युध्द पाकिस्तान हरला होता. भारताविरुद्धचं युध्द पाकिस्तानी सैन्य केवळ बाई आणि बाटलीच्या नादामुळे हरले असा आरोप या संघटनेने केला.

भूत्तोनी त्याच वर्षी पाकिस्तानी सैन्याला मेसमध्ये दारू पुरवणे बंद केले. दारू विरोधात पाकिस्तानात अशा अनेक गोष्टी सुरु होत्या. पण दारूबंदी अमलात आली ती भुत्तो यांच्या काळात. ती सुद्धा जनमत आपल्या खूप विरोधात गेल्याचे भुत्तो यांना लक्षात आले होते. निवडणुकीत गैरप्रकार करून ते निवडून आले अशी लोकांची भावना होती.

तरुण त्यांच्या विरोधात रस्त्यावर यायला लागले होते. व्यापारी संतापले होते. या गोष्टीवरून लक्ष हटवायला भुत्तो यांना काहीतरी कारण पाहिजे होते. तसाही धार्मिक संघटनानी त्रास द्यायला सुरुवात केली होती.

मग भुत्तो यांनी सगळ्या उजव्या विचारांच्या संघटना बोलवून आपण दारूबंदी करत असल्याचे जाहीर केले. कुठल्याही मुस्लीम माणसाला दारू विकण्याची किंवा विकत घेण्याची परवानगी नाकारण्यात आली. पण हे शेवटी नियम राहिले. इतर मार्गाने दारू मिळतच होती. मिळत राहणार आहे. 

भूत्तोनी दारूबंदी करणे हेच मुळात विनोदी होते.  

याह्या खान व भुत्तो यांच्यासारखे नेते विधिनिषेधशून्य होते. गोविंद तळवलकर यांनी एका पाकिस्तानी पुस्तकाच्या परिचयात लिहिले आहे, याह्या खान आणी भुत्तो दोघेही मद्यपानाचा अतिरेक करत आणि ते विषयासक्तही होते. अमेरिकन राजप्रतिनिधींना याची कल्पना होती. त्यांनी परराष्ट्रखात्यास धाडलेल्या अहवालात हे अनेकदा नमूद केले होते.

भुत्तो यांच्यासंबंधात एका अहवालात अशी माहिती दिली होती की, ते लाहोरला येत तेव्हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम असे. इंटरकाँटिनेन्टल हॉटेलात ते उतरत. दिवसभर भुत्तो राजकीय भेटीगाठी घेत. त्यांच्याकडे अर्जविनंत्या करण्यासाठी ग्रामीण भागांतून लोक येत त्यांना तिष्ठत बसावे लागे. मग संध्याकाळ झाली की, अनेक गाणाऱ्या व नाचणाऱ्या बायका येत. भुत्तो मग सर्वांना मद्य देत. ग्रामीण भागातील लोक मद्य आणि नाचगाण्यात बेहोष होत आणि भरपूर आरडाओरडा करत. हे मध्यरात्र उलटली तरी चालू राही. यामुळे हॉटेलमधील इतर रहिवासी त्रासून जात.

एकदा एक लष्करी अधिकारी संतप्त झाला व हा आरडाओरडा थांबला नाही तर आपण भुत्तो यांना गोळीच घालू अशी ताकीद त्याने दिली. दुसऱ्या एका मुक्कामात भुत्तो इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलच्या भटारखान्यात गेले आणि टेबलावर उभे राहून त्यांनी जमलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना उद्देशून भाषण केले. तेकी, लवकरच या हॉटेलची मालकी बदलणार असून तुम्ही आतापासूनच कोणते काम हवे ते ठरवा. हे हॉटेल तुमच्या मालकीचे होणार आहे. हा निव्वळ भंपकपणा होता. हॉटेलच्या मॅनेजरने भुत्तो यांना मग सांगितले की, तुम्ही तुमच्या खोलीत काही करू शकता, पण आमच्या भटारखान्यात येऊन भाषणे देण्याचे तुम्हाला काम नाही.

पुन्हा असा प्रकार झाल्यास तुमच्यावर खटला भरला जाईल. इतकी भाषा झाल्यावर भुत्तो यांनी नमते घेतले. हॉटेलच्या मॅनेजरनेच ही माहिती अमेरिकन राज प्रतिनिधींना दिली.

काही वर्षापूर्वी इम्रान खान याच्या पक्षाच्या नेत्याच्या कारमध्ये दारूची बाटली सापडली आणि पाकिस्तानात एकच गदारोळ उडाला. तेंव्हा पाकिस्तानी टीव्ही channel ने सगळ्या नेत्यांना चर्चेला बोलवले. जाहीर चर्चा चालू होती. त्या नेत्याला दारूच्या बाटलीबद्दल प्रश्न विचारला गेला. तोपर्यंत तो नेता ती मधाची बाटली आहे असं सांगायचा. पण त्यादिवशी जाहीर चर्चेत त्याने मान्य केलं की होय ती दारूच होती.

पण मला सांगा इथे बसलेला कोणता नेता पीत नाही?

त्याच्या या प्रश्नावर सगळे शांत बसले. कारण नाही पीत म्हणालो तर सगळे हसतील. धर्मविरोधी होईल. आणी पितो म्हणालो तर करिअर संपेल. कुणीही एक शब्द बोललं नाही. तर दारूबंदीचे हे असे हाल असतात. त्याला धार्मिक कारण दिल्यावर तर त्याचा फज्जा उडतोच उडतो.

पाकिस्तानच्या बाबतीत आणखी एक निरीक्षण आहे. दारूबंदी झाल्यानंतर हेरोईनच्या नशेचं प्रमाण त्या देशात प्रचंड वाढलं. तरुण पिढी अक्षरशः हेरोईनच्या आधीन गेली. अर्थात हे सगळे धंदे सुद्धा स्वतः दारू पिऊन दारूबंदीसारखे निर्णय घेणाऱ्या नेत्यांच्याच मालकीचे असतात.

त्यांना फक्त समस्येवरून लक्ष हटवायचं असतं. समस्या नाही. नाहीतर दारूबंदी करण्यापेक्षा दारूचे उत्पादन बंद करणे हा सोपा निर्णय आहे. पण ते कुणी करत नाही. 

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. अनामिक says

    पाकिस्तान चा नकाशा छापताना अक्कल गहाण ठेवली काय ??
    POK ला स्पष्टपणे पाकचा भूभाग दाखवला आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.