एका माजी पाकिस्तानी सैनिकाला भारताने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय.

भारत आणि पाकिस्तान…. एकतर वॉर नाहीतर क्रिकेट वॉर..

पण आजची गोष्ट एक अवलीयाची आहे. पाकिस्तानी अवलिया सैनिक. ज्याला भारताचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

ही गोष्ट आहे १९७१ सालातली. जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होत. जीनांच पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान (बांग्लादेश) साठी कब्रस्तान बनलं होत. जीनांनी सांगितलं होतं की पूर्व पाकिस्तानला सुद्धा पाकिस्तानी नागरिकांसारखा सन्मान मिळेल. पण तसं घडलंच नाही. पूर्व पाकिस्तानच्या लोकांना फक्त मार्शल लॉ च मिळाला होता. त्यांना कोणतेही अधिकार नव्हते. त्या लोकांवर पाकिस्तानी सैन्य अनन्वित अत्याचार करत होत. त्यावेळी पूर्व पाकिस्तानच्या तरूणांना जबरदस्तीने सैन्यात भरती व्हावं लागे.

असाच एक २० वर्षीय तरुण १९६९ मध्ये सैन्यात भरती झाला होता. जो सियालकोटच्या सेक्टरमध्ये तैनात होता. हा तरुण सैन्यात तर भरती झाला होता, पण त्याच्यावर अत्याचार होतच होते. पूर्व पाकिस्तानी सैन्याला वेगळंच प्रशिक्षण दिलं जायचं. त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्य करडी नजर ठेवून असायचं. पूर्व पाकिस्तानी सैनिकांची भाषा बंगाली होती पण त्यांना जबरदस्ती उर्दू बोलायला लावलं जायचं. त्यांना शिव्या देणं, मारण या गोष्टी रोजच्याच बनल्या होत्या.

या तरुणाला हे अत्याचार सहन होईनात. म्हणून त्याने पळून जाण्याची योजना आखली. तो सैनिक जम्मू ला जाणाऱ्या शकरगाह मार्गे निघाला. कारण इथं पाकिस्तानी सैन्याची गस्त कमी होती. अशातच हा सैनिक भारतीय सैन्यात येऊन पोहोचला. आपला सैनिक सीमा ओलांडतोय म्हंटल्यावर पाकिस्तानी सैनिकांनी फायरिंग सुरू केलं. त्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने पण फायरिंग सुरू केलं.

या फायरिंग दरम्यान हा तरुण भारतीय हद्दीतल्या एक मोठ्या खडड्यात पडला. आणि भारतीय सैन्याने या वीस वर्षाच्या उमद्या सैनिकाला पकडल.

खरं तर त्यानं स्वतःहूनच आत्मसमर्पण केलेलं असत. जेव्हा भारतीय जवान या तरुणाची झडती घेतात तेव्हा त्यांना त्या तरुणाच्या खिशात एक वीस रुपयांची नोट सापडते. त्याच्या बुटात पाकिस्तानी सैन्यासंबंधित काही नकाशे सापडतात. भारतीय सैन्य त्याला पाकिस्तानी जासुस करार देते आणि त्याची चौकशी सुरू होते.

भारतीय सैन्याने विचारलेल्या प्रश्नावर त्याच एकच उत्तर ठरलेलं असत ते म्हणजे,

माझं नाव काजी सज्जाद अली जहीर आहे. पाकिस्तान बांग्लादेशावर अत्याचार करतय. मला ते सहन होत नाही म्हणून मी पळून आलोय. आणि मला भारतीय सैन्याला मदत करायची आहे.

याचसोबत तो बऱ्याच खुफिया बातम्या भारतीय सैन्याला देतो. आणि या बातम्या खऱ्याच असतात. खूप महिने या तरुणाला दिल्लीतील एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं. ज्यावेळी इंदिरा गांधी ठरवतात की, आता बांग्लादेश अस्तित्वात आला पाहिजे, तेव्हाच्या युद्धात या तरुणाची मदत होते.

पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा बांग्लादेश. इथं मुक्तीवाहिनी संघटना स्वातंत्र्यासाठी लढत असते. त्या मुक्तीवाहिनीच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी या तरुणाला पाठवण्यात येत. हा सज्जाद नावाचा तरुण मुक्तीवाहिनीच्या सैनिकांना फक्त प्रशिक्षणच देत नाही, तर भारतीय सैन्य आणि मुक्तीवाहिनीच्या सैनिकांमधील दुवा बनतो. आणि १९७१ चा निकाल आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पाकिस्तान भारताबरोबरच युद्ध हरतो.

पुढं सज्जाद नावाच्या या तरुणाचं काय होत ?

युद्ध संपत आणि हा तरुण आपल्या घराकडे, आपल्या देशाकडे म्हणजेच बांग्लादेशात परततो. आणि आज तीस एक वर्षांनी या व्यक्तीला भारताचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळतो.

आज संपूर्ण जग त्या बांग्लादेश मुक्ती संग्रामातल्या तरुणाला रिटायर्ड लेफ्टिनेंट कर्नल काजी सज्जाद अली जहीर म्हणून ओळखत.

Leave A Reply

Your email address will not be published.