पाकिस्तानातली पब्लिक कोरोनाची लस घ्यायला तयार नाहीत, कारण ठरतोय ‘ओसामा बिन लादेन ‘

गेले वर्षभर जगाला कोरोनाच्या संकटाने धारेवर धरलंय. सगळे उद्योगधंदे लॉकडाऊन झाले, घराच्या बाहेर पडायचं बंद झालं. पहिली लाट दुसरी लाट यात कित्येक लाख लोक मृत्युमुखी पडले. या कोरोना संकटावर एकच उपाय होता तो म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस. लस येणार येणार म्हणून जग डोळे लावून बसलं होतं. हां हां म्हणता म्हणता वेगवेगळया कंपन्यांची लस येऊन पोहचली.

भारतात तर या लसीवरून रोज मारामारी सुरु आहे. १८ ते ४४ वयोगट, आधार कार्ड, ऑनलाईन रजिस्ट्रेशन यातून लस मिळाली तर नवस पावला असं लोक म्हणत आहेत. आपण काहीही करून कोरोनाची लस मिळावी म्हणून धडपडत आहोत.  सगळ्या जगात थोडीफार अशीच परिस्थिती आहे.

हे सगळं चाललं असताना आपले सख्खे शेजारी पाकिस्तानवाले मात्र अजून पण कोरोना लस घ्यायची कि नाही या द्विधा मनस्थितीत आहेत. इम्रान खानने सेटिंग लावून चीन मधून लस आणली तरी लोक लस घ्यायला घरातून बाहेर पडत नाही आहेत.

कारण आहे ओसामा बिन लादेन. आता तुमच्या चक्कीत जाळ झाला असेल कि लादेन ठार होऊन इतकी वर्षे उलटली अजून त्याच्यामुळे लोक लस घ्यायला घाबरतात हे कस काय शक्य आहे ?

भिडू तुम्हाला सगळं सांगतो. याची सुरवात होते पोलिओ लसीकरणापासून 

पाकिस्तान आणि  पोलिओचं एक वेगळचं बॉण्डिंग तयार झालय.  पाक हरप्रकारे प्रयत्न करत पण पोलिओ  जाण्याच काय नाव घेत नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हि दोन देश सोडली तर  जगभरातील सगळी देश पोलिओ मुक्त  झालीत. ‘एक भी बच्चा छुटा, सुरक्षा चक्र तुटा’ या अभियाना अंतर्गत भारतही २०१४ मध्ये पोलिओ मुक्त देश बनलाय.  पण पाकची परिस्थती दिवसेंदिवस बिघत चाललीये.

एका आकडेवारीनुसार २०१७ मध्ये पाकिस्तानातं ८ नवे रुग्ण समोर आले होते, त्यानंतर २०१८ मध्ये १२, २०१९ मध्ये १४७, २०२० मध्ये ८४ तर यावर्षी एका रुग्णाची नोंद झालीये. पण अशी शक्यता आहे कि, जर हे पूर्णपणे संपवलं नाही तर हा आलेख लाखांवर जाऊ शकतो. हि आकडेवारी पाहता पाकिस्तानात पोलिओ अभियान फेल होताना पाहायला मिळतंय. त्यामागचं मोठं  कारण म्हणजे पोलिओ देण्यासाठी जाणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि टीमवर होणारे हल्ले. 

पोलीस अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या 

कालच ९ जूनला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एक भयंकर घटना घडली. पोलिओ वॅक्सीनेशन टीमला सुरक्षा देणारे दोन पोलीस अधिकारी आपली ड्युटी संपवून घरी जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवर असलेल्या  दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी या अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.  जानेवारीत सुद्धा अशीच घटना घडली होती. त्यावेळी अज्ञातांनी एका व्हॅनवर हल्ला केला होता, ज्यात पोलिओ व्हॅक्सिनेशन टीमसोबत पोलीस अधिकारी होते. यातल्या एका अधिकाऱ्याची  हत्या करण्यात आली होती.  

पाकिस्तानात या घटना काय नवीन नाहीत, २०१२ नंतर अश्या प्रकारच्या हल्ल्यात जवळपास १०५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. ज्यात अधिकाऱ्यांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे.   कारण काय तर घरोघरी जाणून केलेलं पोलिओ अभियान.

 पोलिओ अभियान 

खरं तर पोलिओचा इतिहास हा २०,००० वर्ष जुना आहे. पण १९५३ मध्ये अमेरिकन वैज्ञानिक जोनास साल्क यांनी यावर उपचार शोधून काढला होता. जो पश्चिमी विकसित देशात यशस्वी ठरला. त्यांनतर १९७० च्या दशकात जागतिक पातळीवर पोलिओ व्हॅक्सिनेशनच काम सुरु झालं. १९२८ जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल पोलियो इरेडिकेशन इनिशिएटिव्हची स्थापना केली. आणि पोलिओ उन्मूलन अभियान चालवलं गेलं. जे  सर्वात विस्तृत आणि यशस्वी मोहिमांपैकी एक आहे.

या मोहिमेअंतर्गत अनेक  देश पोलिओ मुक्त बनले पण पाकिस्तानाची परिस्थिती जैसे थे. पाकमध्ये १९९४ पासून पोलिओ लसीकरण  सुरु आहे, पण तरीही पाक नवीन प्रकरणांचा शून्याचा  आकडा गाठू शकलेलं नाही.

पाकमध्ये पोलिओ मोहीम फेल होण्यामागची  अनेक कारणं आहेत. पाहिलं म्हणजे पोलिओचा दुष्प्रचार. इथल्या  लोकांना वाटत कि पोलिओ पश्चिमी देशांचं हत्यार आहे. याच्या मदतीनं  अमेरिका जासूसी करत. एक अशीही धारणा आहे कि, पोलिओचा टीका घेतला तर बाळ नपुंसक होईल. आणि दुसरी अफवा म्हणजे या लसीत डुकराचं मांस आणि अल्कोहोल असत. आणि दोन्हीही गोष्टी इस्लाममध्ये ‘हराम’ मानली जातात. लोकांना वाटत कि,  पोलिओचा डोस घेतल्यानं त्यांचा धर्म  भ्रष्ट होऊ शकतो. 

दुसरं कारण म्हणजे भ्रष्ट आरोग्य व्यवस्था. पोलिओ अभियानासाठी पुरेसे पैसे मिळतात पण याशिवाय आवश्यकता असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. तर दुसरीकडे कर्मचारी असले तरी ट्रेनिंगची कमतरता आहे. तसेच  ड्युटीकडे दुर्लक्ष आणि व्हॅक्सिनची स्मगलिंग सुद्धा सामान्य आहे.

आणि तिसरी गोष्ट म्हणजे पोलिओ डोस पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी. पाकिस्तानात बरेच भाग असे आहेत जिथे कट्टरपंथी संघटनांचा कब्जा आहे, तालिबानचा प्रभाव आहे. अनेक ठिकाणी पोलिओ डोसच्याविरूद्ध फतवा जारी करण्यात आलाय.  या ठिकाणी पोलिओ डोस देणं कोणत्या वॉर झोनमध्ये काम करण्यापेक्षा कमी डेंजर नाही. तिथं जायचं म्हंटल कि, पुरेशी  सुरक्षा व्यवस्था असावीच लागते. 

आणखी  एक महत्वाचं काम म्हणजे अस्वच्छता आणि कुपोषण. उघड्यावर शौच आणि  अस्वच्छता पाकिस्तानात साधी गोष्ट आहे. त्यामुळे इथं पोलिओ पसरायला सोपा मार्ग आहे. इथला कुपोषणाचा प्रश्नही मोठा मुद्दा आहे.  हेल्थ केअरच्या म्हणण्यानुसार अपुऱ्या पोषणामुळे पोलिओ लसीचा प्रभाव कमी होतो.

 ओसामा कनेक्शन 

पाकमधल्या या परिस्थितीच आणखी एक कारण म्हणजे ओसामा बिन लादेन. अमेरिकेत २००१ साली  हल्ला झाला,  तेव्हा अल कायदा या दहशतवादी संघटनेच नाव समोर आलं. याचा मुखिया होता ओसामा. जो अमेरिकेचा मोठा शत्रू बनला. याच्या शोधात अमेरिकेन अफगाणिस्तानवर हल्ला केला. दहा वर्ष या ओसामाचा काहीच ठावठिकाणा नव्हता. 

पण अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने प्रयत्न सुरूच ठेवले. २०१० साली सीआयएला समजलं कि, लादेन पाकिस्तानच्या एबूटाबादमध्ये लपून बसलाय. मात्र,  दुसऱ्या देशात घुसून ऑपरेशन चालवण्यासाठी  सीआयएला ठोस पुरावे पाहिजे होते. यासाठी सीआयएने लॉंच केले फेक व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम.  ‘हॅपिटायटस बी’ची लस फुकट देण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी शकील  आफ्रिदी या पाकिस्तानी डॉक्टराची निवड करण्यात आली. आणि व्हॅक्सिनेशनच्या काही महिन्यानंतरच एबूटाबादमध्ये   सर्जिकल स्ट्राईक झालं आणि  ओसामा बिन लादेन मारला गेला.

यामुळे अमेरिकेच ऑपरेशन तर यशस्वी झालं. पण पोलिओ लसीबाबत जी अफवा होती कि, अमेरिका त्याच्या मदतीनं जासूसी करतय. ते लोकांच्या डोक्यात फिक्स झालं. कट्टरपंथी नेत्यांनी लसीचा खुलेआम विरोध केला.  अनेक ठिकाणी यावर बॅन आणलं गेलं, तर तालिबान्यांनी त्यावर फतवा पण जारी केला.  ज्यामुळे आजही पोलिओ अभियानातल्या  आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची हत्या होतेय. 

लादेनच्या हत्येनंतर जेव्हा कधी आरोग्य  कर्मचारी डोस देण्यासाठी गेले एकतर  त्यांना तिथून हाकललं जात किंवा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केले जातात. त्यातल्यात्यात पोलिओ लसीच्या विरोधाची आणखी एक गोष्ट म्हणजे, पाकिस्तानात पोलिओ लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांत महिलांची संख्या जास्त आहे. लोकांना वाटतं महिलांना हे काम देऊन इस्लामला भ्रष्ट करण्याचा कट रचला जातोय.

दरम्यान, या सगळ्यांचाच  परिणाम सध्याच्या कोरोना लसीवर सुद्धा  होतोय. कोरोनाच्या लसीकरण अभियानाच उद्दिष्ट सुद्धा तेच आहे जे पोलिओ अभियानाचा होत. आज देखील सरकारची माणसं लोकांना लस घ्या म्हणून मागे लागत आहेत. पण जस लादेनच्या बाबतीत झालं तस आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून लोक घाबरलेत. तसही कोरोना हा रोग नाही ती पाश्चात्य लोकांची चाल आहे हे आपल्या इकडं पण अफवा पसरतात मग पाकिस्तान तर आपल्या पेक्षा अडाणी देश. लस द्यायच्या नावाखाली आपल्याला जेल मध्ये टाकतील म्हणून घाबरून कोरोना लसीपासून लांब राहत आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.