भारतातील टोमॅटोचे दर पडण्यामागचं एक मुख्य कारण पाकिस्तान आहे…

दोन दिवसांपासून नाशिकच्या आदित्य जाधव या तरुण शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या गाडीतून टोमॅटोने भरलेले कॅरेट संतापाने रस्त्यावर फेकून देत आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोला बाजारात १ ते ३ रुपये किलो एवढाचं दर मिळत आहे.

उठाव नसल्यानं मार्केटमधील टोमॅटोचे दर पूर्णपणे पडले आहेत. यातून शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च निघणं देखील अवघड झालयं. त्यामुळेच केलेली मेहनत अक्षरशः वाया जात आहे.

टोमॅटोचे हे दर पडण्यामागे काही कारण देखील सांगितली जात आहेत. यात नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादनाच्या तुलनेत देशांतर्गत मागणीत मोठी घट झालीय.

सोबतच कोरोना काळात हॉटेल बंद असल्यानं रस आणि प्युरी पेस्ट, केचप, सॉस, सूप निर्मितीवर पण बंधन आली.

मात्र टोमॅटोचे दर पडण्यामागे आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मागच्या ३ ते ४ वर्षांपासून बंद असलेली पाकिस्तानमधील निर्यात.

पाकिस्तान अटारी-वाघा बॉर्डरवरून भारतातून तब्बल १३८ वस्तूंची आयात करतो. यात साखर, कापूस, टोमॅटो, सुती धागा, केमिकल, प्लास्टिक, हातमागावरील धागा अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. मात्र ४ वर्षांपूर्वी झालेला पुलवामा हल्ला, उरी-बालाकोट सर्जिकल स्ट्राईक यामुळे दोन्ही देशांमधील बहुतांश व्यापार जवळपास ठप्प असल्यासारखाचं आहे.

आणि याच ठप्प व्यापाराचा परिणाम थेट भारतातील टोमॅटोवर झाला आहे.

कारण २०१६-१७ पर्यंत भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेशातून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटो निर्यात व्हायचा. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारतातून शेतकऱ्यांनी स्वतः पाकिस्तानमध्ये तरकारी न पाठवण्याचा निर्णय घेतला. भारताने देखील त्यानंतर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हरेट नेशनचा दर्जा काढून घेतला. पाकिस्तानकडून पण त्यानंतर आयात थांबवण्यात आली. यामुळे भारतातील टोमॅटो भारतातच राहिला.

हवामानाच्या कारणांमुळे पाकिस्तानमध्ये टोमॅटो आणि कांदा पिकांवर मर्यादा आहेत. त्यामुळे भारताला टोमॅटोसाठी पाकिस्तानच मोठं मार्केट उपलब्ध होते. पाकिस्तान संख्यांकी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ या वर्षापर्यंत पाकिस्तानमधील एकूण टोमॅटोच्या तुलनेत तब्बल ८६ टक्के टोमॅटो भारतातून आयात केला जायचा. तर उर्वरित १६ टक्के अफगानिस्तानमधून.

यामुळे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार,

२०१३-१४ ला भारताची पाकिस्तानला होणारी टोमॅटो निर्यात हि तब्बल ७३९ कोटी रुपयांची होती. तर २०१६-१७ पर्यंत हा आकडा ३६८ कोटी रुपयांच्या घरात होता. मात्र व्यापार थांबल्याच्या अवघ्या २ वर्षात म्हणजे २०१८-१९ पर्यंत हा आकडा अवघ्या १० हजार रुपयांच्या घरात आला होता.

याचा परिणाम म्हणजे भारतीय बाजारात मागणी पेक्षा पुरवठा वाढला. दर पडले. २०१८ साली भारतात टोमॅटो १८ ते २२ रुपये किलोने विकले गेले, त्यानंतर २०१९ मध्ये हा दर ८ ते १२ रुपयांवर आला आणि आता यावर्षी तर थेट दर ३ ते ५ रुपयांवर किंवा त्यापेक्षा देखील खाली आला आहे.

याच्या अगदी उलट परिणाम पाकिस्तानमध्ये झाला. पाकिस्तानमध्ये या ४ वर्षाच्या काळात टोमॅटोचे भाव टप्प्याटप्प्यानं तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले. मार्च २०१८ मध्ये ३०० रुपये किलो पर्यंत टोमॅटोचे दर पोहोचले होते. पुढे थोडे कमी झाले पण दर मात्र ते तीन आकड्यांमध्येच राहिले. फेब्रुवारी २०१९ मध्ये हा दर १८० रुपये किलो तर नोव्हेंबर २०१९ मध्ये ३२० रुपये किलोच्या घरात होता.

२०१७ नंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानमधून टोमॅटोची आयात सुरु केली. त्यामुळे कधी काळी जेवढा वाटा भारताचा होता तेवढा वाटा अफगाणिस्तानचा झाला. तब्बल ८६ टक्के टोमॅटोची आयात अफगानिस्तान मधून सुरु झाली. हि उलाढाल भारतीय चलनानुसार जवळपास १४८ कोटी रुपयांच्या आसपास होती.  

थोडक्यात काय तर बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावर होतं आहे. भारतात दर मिळत नाही, तर पाकिस्तानमध्ये दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाही. जाता-जाता २००३ सालची एक आठवण आवर्जून. त्यावर्षी देखील असेच काही कारणांनी पाकिस्तानमधील टोमॅटोचे दर वाढले होते. तेव्हा वैतागून जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानी जनतेला टोमॅटोचा वापर बंद करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली होती. 

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.