फोनवर बोलण्यासाठी पाकिस्तान तडफडतोय पण बायडन भाऊ काडीची पण किंमत देईनात.

आपला सख्खा शेजारी असणारा पाकिस्तान. ज्याला भारताविरुद्ध कुरघोड्या करण्याशिवाय आणि इतर देशांवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरं काही माहीतचं नसतं. स्वत:च्या देशातल्या मुद्दयांवर लक्ष देण्याऐवजी बाकीच्या देशांच्या अंतर्गत मुद्दयावर फुकटचे सल्ले देणं हा त्याचा आवडता छंद.

बरं एवढं सगळं करून काही उपयोग सुद्धा होत नाही, एक चीन सोडला तर दुसरा कोणताही देश लवकर भाव पण देत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमचं तोंडावर आपटतं असतो.

आतासुद्धा असाच काहीसा प्रकार घडला. म्हणजे कसं ना एखादं पोरगं लव्ह अॅट फस्ट साइड झाल्यावर कसं त्या पोरीच्या मागं पुढे फिरत असतो, तिने एकदा बोलावं म्हणून 1000 प्रयत्न करत असतं, पण पोरगी त्याला थोडासुद्धा भाव देत नाही. अशीचं पाकिस्तानची अवस्था

म्हणजे महाशक्ती असलेल्या अमेरिकेशी गट्टी करावी आणि काहीतरी सेटिंग लावावी म्हणून पाकिस्तान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी बोलण्याचा अफाट प्रयत्न करतयं पण सक्त अमेरिका त्याला हुंगत सुद्धा नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी एकदा तरी फोनवर बोलणं व्हावं, म्हणून पाकिस्तानचे अधिकारी अमेरिका वाल्यांची मनधरणी करण्याचे सतत प्रयत्न करतयं, पण सारखं सारखं फेल होतयं. आणि पाकिस्तानच्या याचं अयशस्वी प्रयत्नांमुळे देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झालायं.

हे भिडू नाही आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतायेत. या वर्षी जानेवारीमध्ये बायडन यांचा शपथविधी झाला. आता राजनैतिक परंपरेप्रमाणं कोणत्याही देशाच्या नवीन राष्ट्राध्यक्षांसोबत बोलणी केली जाते. असाच प्रयत्न पाक सुद्धा करतयं. पण जवळपास वर्ष होतं आलं पाकचा बायडन यांच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट होईना.

अमेरिकेसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी राजनैतिक पातळीवर सगळे प्रयत्न केले, पण ते प्रयत्न निष्फळ ठरले. अहवालात म्हटल्याप्रमाणं अमेरिकेला कथितरित्या संदेश देण्यात आलाय की, इम्रान खान फोन कॉल करण्यास तयार आहेत, परंतु अमेरिकन अधिकार्‍यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या आस्थापनांना देशाच्या परराष्ट्र कार्यालयाकडून सांगण्यात आले की पाकिस्तान अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन, संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन, उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मन, गुप्तचर अधिकारी आणि इतर अमेरिकन अधिकार्‍यांच्या संपर्कात आहे. पण बायडन भाऊ काही मनावर घेईना.

त्यामूळं परराष्ट्र कार्यालयाचं मत होतं की, फोन कॉलच्या मागं लागणं थांबवावं, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आणि बायडन- इम्रान खान यांच्यात चांगले संबंध तयार करण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरूच राहिले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार बायडन यांच्याशी बोलण्यासाठी इम्रान खान यांच्याकडून शेवटचा प्रयत्न या वर्षी मार्चमध्ये झाला होता. पण भिडू खरं तर अजूनही पाक त्यांच्या मागावर आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकन काँग्रेसच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने इम्रान खान यांची भेट घेतली होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने पंतप्रधानांना सक्त ताकीद दिली होती की, बैठकीत फोन कॉल्सच्या मुद्द्याचा अजिबात उल्लेख करायचा नाही. नाहीतर फुकटची इज्जत घालवालं.

अहवालात असही म्हटलयं की, परराष्ट्र कार्यालय हे सततचे प्रयत्न करून वैतागलयं त्यामुळे त्यांना हा मुद्द्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. पण अजूनही, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत एकदा फोनवर बोलण्यासाठी पाकिस्तानचा तरफडा सुरूच आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.