भारताचे ५००० ट्रक मदतीसाठी तयार आहेत पण पाकिस्तान अडथळा ठरतोय

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तिथली परिस्थिती सुधारलेली नाही. वाढती महागाई, प्रचंड गरिबी आणि दहशतवाद यामुळं तिथली जनता हैराण आहे.

महागाई वाढण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली जीवनावश्यक गोष्टींची टंचाई.

या अडचणीच्या काळात अफगाणिस्तानची मदत करायला जगातले अनेक देश सरसावले. काही देशांनी अफगाणी नागरिकांना आपल्या देशात आश्रय दिला, तर चीन टर्कीसारख्या देशांनी धान्याचे ट्रक  पाठवायला सुरूवात केली.

अफगाणिस्तानची मदत करण्यात पहिल्यापासून अग्रेसर राहिलेल्या भारतानं यावेळीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अफगाणिस्तानामध्ये हिवाळ्यात धान्याचा आणखी तुटवडा पडू शकतो, हे लक्षात घेऊन भारतानं ५० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवण्याचं नियोजन केलं आहे.

आता पाकिस्तानचा काय पॉईंटाय?

भारत ही मदत ट्रकमधून म्हणजेच रस्ते मार्गानं पाठवणार आहे. अफगाणिस्तानमध्ये जाण्याचा सोपा मार्ग हा पाकिस्तानमधून जातो. त्यामुळं भारतानं हे मदतीचे ट्रक पाकिस्तानातून जाऊ द्यावेत अशी मागणी करत पाकिस्तानकडे विनंती अर्ज केला आहे.

ट्रकची संख्या आणि त्यामधला माल पाहता पाकिस्तानमधले रस्ते वाहतुकीसाठी योग्य आहेत की नाही, हे तपासावं लागणार असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पाकिस्ताननं रस्ते वाहतुकीसाठी परवानगी दिली नाही, तर सगळा गहू वाघा अटारी सीमेजवळ उतरवून पाकिस्तानी ट्रकमध्ये भरुन पाठवावा लागेल. यामुळं गोंधळ होण्याची शक्यता आहे.

भारतानं पाकिस्तानला परवानगीसाठी विनंती करून जवळपास एक महिना लोटलाय. तरीही पाकिस्तानकडून काही उत्तर आलेलं नाही. भारत धान्याची मदत करत असल्यानं पाकिस्ताननं उगाच विलंब करण्यात काहीच अर्थ नाही.

जगभरातले नागरिक तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानची मदत करण्याच्या विरोधात होते. तरीही भारत सरकारनं आपलं धोरण कायम राखत अफगाणी नागरिकांसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. तालिबाननं याआधीही भारताकडून मदत स्वीकारली आहे. त्यामुळं त्यांचाही अडसर नाही.

हा मदतीचा पूल जोडण्यात अडथळा उभा राहतोय, तो फक्त पाकिस्तानचा.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.