पाकिस्तानने ढापलेल्या काश्मीरमध्ये एक लाल किल्ला आहे. त्याचा सुद्धा इतिहास मोठ्ठाय

भारताचा ऐतिहासिक लाल किल्ला हा दिल्लीमध्ये स्थित आहे हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे पण पाकिस्तानमध्येसुद्धा एक लाल किल्ला याबद्दल जास्त कोणाला माहिती नसेल किंवा काहींचा तर यावर विश्वासच बसणार नाही.

पाकिस्तानमधल्या एका प्राचीन इमारतीला रेड फोर्ट म्हणून ओळखलं जातं.

तसं पाहिलं तर हा किल्लासुद्धा एकेकाळी भारताचाच भाग होता पण फाळणी नंतर पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केलं आणि निम्म्या काश्मीरसह हा किल्ला पाकिस्तानच्या अधिपत्याखाली गेला. तर जाणून घेऊया या किल्ल्याचा इतिहास.

पाकिस्तानचा लाल किल्ला मुझफ्फराबाद मध्ये स्थित आहे त्यामुळे त्याला मुझ्झाफराबादचा किल्ला म्हणूनसुद्धा ओळखलं जातं.

याव्यतिरिक्त तिथले स्थानिक लोक या किल्ल्याला रुट्टा किल्ला किंवा किल्ला म्हणून ओळखतात. या किल्ल्याचा इतिहास असा सांगितला जातो की,

या किल्ल्याची बांधणी मुझ्झाफराबाद शहराचा संस्थापक सुलतान मुझ्झाफर खानने केली. या किल्ल्याचं बांधकाम १५५९ साली सुरू करण्यात आलं होतं पण त्यावर लागलीच मुघलांनी कब्जा केला आणि मग ज्या वेगाने किल्ला बांधणीचा कार्यक्रम सुरू झाला होता त्याच्या कैक संथ गतीने किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं.

१६४६ मध्ये हा किल्ला बनून तयार झाला. तेव्हाचे शासक महाराजा गुलाब सिंग आणि रमबीर सिंह यांनी या किल्ल्यात अनेक बदल केले. किल्ल्याची स्थापत्यकला हा तिथे कायम चर्चेचा विषय असतो. हा किल्ला तीन दिशांनी नीलम नदीने वेढलेला आहे.

किल्ल्याच्या उत्तर भागात पायऱ्यांनी एक छत बनवलेलं आहे. पायऱ्यांच्या मदतीने नदीच्या किनारी जाता येतं. पूर्व दिशेने किल्ल्याला भक्कम तटबंदी उभारलेली आहे.

ती तटबंदी यासाठी आहे की जेव्हा नदीला पूर येईल त्यातून वाचता येईल म्हणून या तटबंदीचं भरीव काम करण्यात आलेलं आहे.

या किल्ल्याच्या पुनर्निर्मितीचं काम हे १८४६ मध्ये डोग्रा राजवंशाचे वंशज महाराजा गुलाब सिंग यांनी केलं होतं. राजकीय आणि सैन्याचा विचार करून किल्ल्याचा विस्तार केला गेला. किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम हे महाराजा रणबीर सिंगच्या शासन काळात पूर्ण झालं.

डोग्रा मिलिटरीची नवी छावणी बनेपर्यंत या किल्ल्याचा १९२६ पर्यंत वापर करण्यात आला होता. त्यानंतर गरज सरो वैद्य मरो अशी गत झाली आणि आज घडीला हा किल्ला एखाद्या अवशेषांचा प्रतीक बनलेला आहे.

दिल्लीतला लाल किल्ला सगळ्यांनाच माहीत आहे पण पाकिस्तान मध्ये असलेला हा लाल किल्ला एकेकाळी लोकांचा आवडीचा स्पॉट होता पण त्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने आज त्या मुझ्झाफराबादच्या लाल किल्ल्यावर अशी वेळ आलेली आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.