अमित शहांनी सुरू केलेल्या प्रोजेक्टला पाकिस्तानचा खोडा

याच आठवड्यात भारतानं अफगाणिस्तानसाठी पाठवलेल्या मदतीचा पाकिस्तानमुळं खोळंबा झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं. त्यात आता भारताच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये पाकिस्ताननं खोडा घातला आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात श्रीनगर ते शारजा विमानसेवेचं उद्घाटन केलं होतं. गो फर्स्ट या कंपनीनं ही विमानसेवा सुरू केली होती. यामुळं या दोन शहरांमधलं अंतर ३ तास ४० मिनिटांत पार करणं शक्य झालं होतं.

हा प्रवास पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून होत असल्यानं अंतर कमी वेळेत कापणं शक्य होतं. आता मात्र पाकिस्ताननं भारतातून निघणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातली आहे.

आठवड्यातून चार दिवस उडणाऱ्या या फ्लाईटचं उदघाटन अमित शहा यांनी केलं होतं. पाकिस्ताननंही उड्डाणांना हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार उड्डाणंही सुरू झाली आता मात्र पाकिस्ताननं परवानगी रद्द केली. त्यामुळं फ्लाईट्स दुसऱ्या रस्त्यानं न्याव्या लागत असून, त्यासाठी ४० ते ५० मिनिटांचा जास्त वेळ लागत आहे.

लांबचा रस्ता हा गुजरात-राजस्थान मार्गे जातो. हा लांबचा मार्ग फक्त वेळच नाही, तर इंधनाच्या बाबतीतही महाग पडतो. असंच सुरू राहिलं तर कंपनीला हे परवडणारं नसून, याचा भार तिकिटांच्या दरावर पडू शकतो. त्यामुळं जवळपास अकरा वर्षांनी सुरू झालेला हा विमानप्रवास बंद पडण्याची शक्यता आहे.

यावरून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. मुफ्ती यांनी, ‘भारत सरकारनं पाकिस्तानच्या हद्दीतून परवानगी न घेता विमानसेवा सुरू करणं हे कोड्यात टाकणं आहे. कोणतंही ग्राऊंडवर्क न करता केलेला हा फक्त एक पीआर स्टंट आहे,’ अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

जम्मू काश्मीरचे आणखी एक माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी, ‘ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून, पाकिस्ताननं २००९-२०१० मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसच्या श्रीनगर ते दुबई फ्लाईटच्या वेळीही असंच केलं होतं. मला असं वाटत होतं की, गो फर्स्टला पाकिस्तानच्या हद्दीतून परवानगी मिळणं हे दोन्ही देशांतला ताण निवळल्याचं लक्षण आहे. दुर्दैवानं तसं झालं नाहीये.’

भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला परवानगीसाठी विचारलं आहे, मात्र त्यांच्याकडून काही उत्तर आलेलं नाही. त्यामुळं पुन्हा एकदा श्रीनगर ते अमिराती फ्लाईट्सवर टांगती तलवार आली आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.