पाकिस्तान रशियाची नवी फ्रेंडशिप भारताला टेन्शनचं कारण ठरतेय..
१९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध ऐन भरात होते. बांगलादेशला स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा केलेल्या भारतीय आर्मीने पाकिस्तानच कंबरडं मोडून ठेवलं होतं. युद्धात आपली हार समोर दिसू लागल्यावर पाकिस्तानने नेहमी प्रमाणे अमेरिकेच्या दारात गाऱ्हाणं घातलं. त्यांच्या हाकेला ओ देऊन तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी अमेरीकेच सातवे आरमार पाकिस्तानी नौदलाच्या मदतीसाठी पाठवणार असल्याची घोषणा केली.
आण्विक मिसाईलने सुसज्ज असणारं सातव आरमार बंगालच्या उपसागराजवळ येऊन देखील ठेपल. जगभरात खळबळ उडाली. पाकिस्तानला वाटलं आता आपला पराभव टळला, अमेरिका भारताला हरवणार, बांगलादेश तुटला जाणार नाही.
पण तस घडलं नाही. भारतावर हल्ला करायचं राहिलं लांब, सातव आरमार बंगालच्या उपसागरात पुढे सरकलंच नाही. याला कारण ठरलं रशिया. त्यांच्या युद्धनौका आणि पाणबुडया तिथे आधीच येऊन थांबल्या होत्या. भारताच्या मैत्रीखातर रशियाने तिसऱ्या महायुद्धाचा धोका पत्करून आपली नौसेना बंगालच्या उपसागरात उभी केली होती.
इंदिरा गांधींनी घट्ट केलेल्या भारत रशिया फ्रेन्डशिपचा इतिहास खूप मोठा आहे. गेली अनेक वर्ष आपल्याला मिग विमानापासून ते सुखोई विमानापर्यंत प्रत्येक गोष्टीत रशियाने मदत केली आहे. संयुक्त राष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक संकटात रशिया भारताच्या पाठीशी उभा राहिलाय.
पण तरी आता एका नव्या घटनेमुळे भारताला आपल्या या दोस्तांवर शंका येऊ लागली आहे.
झालंय असं की नुकताच रशियाचे परराष्ट्राचे मंत्री सर्गेई लावरोव यांनी पाकिस्तानचा दौरा केला. तब्बल ९ वर्षानंतर रशियाने केलेल्या या दौऱ्यामूळ अनेक चर्चांना उधाण तर आलचं पण यामुळं भारताची डोकेदुखी सुद्धा वाढलीये. अर्थातच या भेटीमुळे पाकिस्तान – रशियाची मैत्री घट्ट होण्याचे संकेत मिळत आहे.
यामागचं कारणही तसच काहीस आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार रशिया पाकिस्तानमध्ये आठ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. एवढचं नव्ह तर खुद्द लावरोव यांनी सांगितल कि, रशिया पाकिस्तानला हर प्रकारे मदत करणार आहे , ज्यात गॅस पाइपलाइन, कॉरिडोर यासोबतच संरक्षण क्षेत्रातही रशिया पाकला मदतीचा हात देणार आहे.
लावोराव म्हणाले कि, मी राष्ट्रपती पुतीन यांचा खास निरोप घेऊन आलो असून आम्ही पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत.
तसेच, पाकिस्तानला विशेष शस्त्रांचा पुरवठा करण्यासह दहशतवादविरोधात लढण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी देखील आम्ही तयार असल्याच त्यांनी म्हंटल.’ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यासोबत झालेल्या या चर्चेत दोन्ही देशांमध्ये एकत्रितपणे युद्ध सराव करण्यावरही शिक्कामोर्तब झाला असून रशिया पाकिस्तानला काही शस्त्रेदेखील देणार आहे.
दरम्यान, रशियाच्या या घोषणेनंतर भारताच्या अडचणींत वाढ होणार आणि त्याचा परिणाम भारत – रशियाच्या अनेक वर्षांपासून असलेल्या संबंधांवर देखील होणार असल्याच म्हंटल जात आहे.
वास्तविक, गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान रशियाकडून एसयु -३५ लढाऊ विमान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु रशिया आणि भारत यांच्यातील घट्ट मैत्री नेहमीच या प्रयत्नाच्या आड आली. मात्र, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत आणि त्यानंतर लगेच पाकिस्तान दौरा आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांच्या वतीने भारताशी संबंध सुधारण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्षात पाकिस्तानचा रशियाकडून एसयू -३५ विमान खरेदी करण्यासाठी रस्ता साफ करण्याचा एक भाग आहे.
हे पहिल्यांदाच नाही घडलं, गेल्या तीन वर्षांत पाकिस्तान लष्कराने रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करण्यासाठी अनेक चर्चा सुरू केल्या. या संभाषणाआधी, प्रत्येक वेळी पाकिस्तानने खोटा देखावा करत आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्धी भारताला शांततेची ऑफर दिली.
आधीही पाकने केलेय प्रयत्न
याआधी रशियाच्या लष्करी अधिकार्यांशी अत्याधुनिक शस्त्रे खरेदीबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे हवाई दलाचे माजी प्रमुख एअर मार्शल सुहेल अमन यांनी जुलै २०१६ मध्ये मॉस्कोला भेट दिली होती. त्याच वेळी, ऑगस्ट २०१८ मध्येही अनेक रशियन पायलट पाकिस्तानमध्ये एसयू -३५ अभ्यास म्हणून उड्डाण करत होते. त्यावेळी देखील ही अत्याधुनिक लढाऊ विमान खरेदीसाठी पाकिस्तान हवाई दल आणि रशियन संरक्षण उद्योग यांच्यात चर्चा सुरु असल्याचे संकेत मिळत होते, मात्र, रशियन अधिकाऱ्यांनी या चर्चांचे खंडन केले होते.
भारत – रशिया संबंध
भारत रशियाच्या या कृत्यावर नाराज असला तरी भारत आणि रशियाचे संबंध जगजाहीर आहेत. रशियाचे आपल्या शीत युद्धाचा सहयोगी भारताशी मोठे संरक्षण सौदे आहेत आणि दोन्ही देशांमधील राजकीय आणि लष्करी संबंध अजूनही खूप मजबूत आहेत. भारत सुमारे ६० टक्के संरक्षण उपकरणांसाठी रशियावर अवलंबून आहे. त्यामध्ये बहुचर्चित एस -४०० क्षेपणास्त्र प्रणालीचादेखील समावेश आहे, जी रशियाने अद्याप भारताला हस्तांतरित केली नाही.
गेल्या दोन दशकात जागतिक शस्त्रास्त्र बाजारात खरेदीदार म्हणून भारताने वर्चस्व मिळवले आहे. दोन्ही देशांमधील व्यापार सध्या सुमारे आठ अब्ज डॉलर्स इतका आहे. २०२५ मध्ये ते वाढवून ३० अब्ज डॉलर्स करण्यावर भर देण्यात आला आहे. अलीकडच्या काळात जागतिक राजकारणामध्ये भारत एक महत्त्वपूर्ण शक्ती म्हणून उदयास आला आहे याकडे रशिया दुर्लक्ष करू शकत नाही.
भारत – अमेरिकेच्या वाढत्या संबंधामुळेही रशिया नाखूष
अलिकडच्या वर्षांत अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम भारत-रशियाच्या संबंधांवर झाला आहे. अमेरिकेबरोबर भारताच्या वाढत असलेल्या मैत्रीमुळे रशिया खूश नाही. दुसरीकडे, रशियाला चीनच्या हितसंबंधांच्या असलेल्या काळजीमुळे भारत समाधानी नाही. रशिया हा भारताचा जुना मित्र आहे, परंतु जागतिक राजकारणात वेगाने बदलणार्या हालचालींमुळे नात्यात काही अडथळे दिसायला लागली आहेत.
हे ही वाच भिडू