फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर पाकिस्तानात सुद्धा घुमतंय ऊस पट्ट्याचं राजकारण !

महाराष्ट्राचं राजकरण गोड साखरे भोवती फिरतंय. कृष्णा भीमा गोदा या नद्यांनी पिकवलेला ऊस आजही राज्याचा मुख्यमंत्री ठरवतो असं म्हणतात. कोल्हापूर सांगली भागात एकी बार राजकीय पद नको पण कारखान्याच संचालक पद द्या असं म्हणतात. चेअरमनचा दाब तर मंत्री खासदारच्या वर असतोय.

वसंतदादा पाटलांपासून ते पवारांपर्यंत कित्येक दिग्गज नेते दिल्लीला पोहचले पण त्यांचा जीव या साखरेच्या राजकारणात घुटमळत राहिला. महाराष्ट्रात कित्येक आंदोलने साखरेवर उभी राहिली. शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी असे पक्ष या आंदोलनाच्या जीवावर शेतकऱ्यांच्या मनात जागा निर्माण करू शकले.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती जरी नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांना चांगले दिवस या साखरेने आणि साखर कारखान्यांनी आणले. फक्त महाराष्ट्र नाही तर युपी, तामिळनाडू पंजाब, हरियाणा अशा अनेक राज्यात हे गन्ना किसान आपलं वजन राखून आहेत.

तर गड्यांनो जस भारताच्या राजकारणात उसाला महत्व आहे तस आपला धाकटा भांडखोर भाऊ पाकिस्तान, त्यांच्यात पण उसा वरून होणारे राडे फेमस आहेत.

लेटेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर परवा पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉर्डिनेशन कमिटीने आपला एक अहवाल इम्रान खान सरकारला सादर केला. या अहवालात भारतासोबत कापूस आणि साखरेचा व्यापार पुन्हा सुरू करण्याची सुचना करण्यात आली होती.

रमजानचा पवित्र महिना चालू होण्याच्या आधी साखरेचे वाढलेले दर पाडण्यासाठी इम्रान खान सरकारने भारताबरोबर ठप्प झालेला व्यापार परत सुरु करायची तयारी केलेली. तशा घोषणा देखील झाल्या. आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला वर काढण्यासाठी भारताची मदत घ्यावी लागेल हे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना पटलेलं.

पण आपल्याकडे जसे विरोधी पक्ष असतात तसे विरोधी पक्ष तिथं देखील आहेत. शेतकऱ्यांची आंदोलने तिथे देखील होतात. पेटून उठलेल्या देशभक्त लोकांनी इम्रान खानला भारताबरोबर व्यापार करतोय म्हटल्यावर तौबा तौबा म्हणत जोरदार टीका केली. त्याला पार आडवाच करून टाकला.

बिचाऱ्या इम्रान खानने यु टर्न घेत आज असा काही व्यापार सुरु करायचा आमचा इरादा नसल्याचं सांगितलं. कालच्या दिवसातला हा निर्मला सीतारामन यांच्या फेमस नजरचुकीने व्याजकपात निर्णयानंतरचा हा दुसरा यु टर्न.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानला गुडघ्यावर आणायची ताकद हि तिथल्या ऊस शेतकऱ्यांमध्ये आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले..

गेल्या काही वर्षांपूर्वी भारतात सुद्धा पाकिस्तानी साखरेमुळे असाच गहजब झाला होता. कधी साखर आयात करायची, कधी निर्यात करायची, शेतकऱ्याला सुद्धा दर मिळाला पाहिजे आणि गोर गरिबांना साखर स्वस्तात भेटली पाहिजे हि सगळी तारेवरची कसरत आहे आणि राज्यकर्त्यांना ती करावीच लागते.

पण पाकीस्तानी गणित जरा जास्तच वेगळं आहे.

पाकिस्तान मधल्या कारखान्यांवर राजकारणी आणि लष्करातले अधिकारी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या राज्य करतात. यात सर्वात मोठा खिलाडी आहे तो म्हणजे मियाँ नवाज शरीफ.

नवाज शरीफ राजकारणात येण्याच्या आधीपासून बापजाद्यांपासून साखर कारखानदार आहेत. त्यांचा शरीफ ग्रुप, रमजान शुगर मिल्स हे तिकडे दिग्गज समजला जातो. नवाज शरीफ आहेत पाकिस्तानी पंजाबचे. आपल्या पंजाब प्रमाणे इथले शेतकरी सधन आहेत. त्यांच्या शब्दाला राजकारणात वजन आहे. या शुगर लॉबीच्या जीवावर नवाज मियाँ पाकिस्तानवर राज्य करायचे.

मध्यंतरी पनामा केसच्या यादीत नाव आल्याच्या कारणावरून त्यांची पंतप्रधान पदावरून गच्छंती करण्यात आली. ते जेलमध्ये देखील गेले. सध्या ते जामीन मिळवून बाहेर पडलेत आणि आपल्या मल्ल्या, ललित मोदी, निरव मोदी प्रमाणे इंग्लंडचा सहारा घेतलाय. 

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदी आलेल्या इम्रान खानने नवाज शरीफ यांचे पंख कापण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यातच त्याने उकरून काढला अब्जावधी रुपयांचा साखर घोटाळा. या साखर घोटाळ्यात थेट नवाझ शरीफ यांच्या धाकट्या भावाला म्हणजेच पाकिस्तान मुस्लिम लीगचा अध्यक्ष शाहनवाज शरीफ यांना अटक केली. अल अरेबिया साखर कारखान्याचे चेअरमन असणारे शाहनवाज शरीफ आणि त्यांची दोन लेकरं तुरुंगात गेली.

shahbaz sharif

त्यांच्या प्रमाणेच आणखी तीन चार मोठं मोठे साखर सम्राट मनी लॉन्ड्रींगच्या केस मध्ये आत गेले. यात खुद्द इम्रान खानचे मित्र जहांगीर तरीन याचा सुद्धा समावेश होता.

पाकिस्तानात साखर लॉबीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी इम्रान खानने कंबर कसली आहे असं म्हटलं गेलं.

या कारवाईच्या पाठोपाठ नवाज शरीफ यांच्या पक्षातल्या चाळीस जणांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. त्यांचं म्हणणं आहे कि हा पक्ष भारताच्या इशाऱ्यावर काम करतो. तिथं  एक वाक्य फेमस आहे,

मोदी का जो यार है वो पाकिस्तान का गद्दार है

हा पाकिस्तानी टोमणा आहे मोदी ज्यांच्या वाढदिवसाला केक खाण्यासाठी गेले होते त्या नवाज शरीफ यांच्या साठी. त्यांचं दोघांचं जमतं असा इम्रान खान समर्थकांचा दावा आहे. इतकंच नाही तर शरीफ यांच्या साखर कारखान्यात रॉ एजंट ये जा करत असतात. इतकंच नाही तर भारतात सुद्धा या शरीफ बंधूंचे साखर कारखाने आहेत असं सांगितलं जातं.  आपल्या या बिजनेसला फायदा व्हावा म्हणून नवाज शरीफ नरेंद्र मोदींशी भेटत असतात असा आरोप केला जातो.

साखरेचं राजकारण, त्याची भारताशी आयात निर्यात हा तिथला प्रमुख मुद्दा होता.

पण काल जेव्हा इम्रान खानच्या सरकारनेच स्वतः भारताशी साखर व्यापार पुन्हा सुरु करण्याचे सूतोवाच केले तेव्हा मात्र नवाज समर्थक कार्यकर्ते पेटून उठले. मोदी का जो यार है वाले टोमणे इम्रान खानच्या वाट्याला आले. आधीच सरकार डळमळीत आहे, त्यात मोदी का यारचा शिक्का लागला तर  कट्टर पंथियांचा राग कुठे ओढवून घ्या असं म्हणत इम्रान भारताच्या साखरेचा मोह सोडला आणि व्यापाराचा निर्णय यु टर्न मारला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.