प्रामाणिक पाकिस्तानी पत्रकार, याच्यामुळे १९७१ चं युद्ध आपण जिंकू शकलो.
१५ ऑगस्ट १९४७साली भारत स्वतंत्र झाला. पण आपल्याला आपला देश तुकड्यात मिळाला. इंग्रजांनी जाता जाता धार्मिक तत्वावर भारताची फाळणी केली . भारताच्या पश्चिमेला पंजाब, सिंध,बलुचिस्तान आणि पूर्वेला बंगालचा काही भाग असा मुस्लीम बहुल प्रदेश पाकिस्तान म्हणून घोषित केला.
पाकिस्तानच्या मुख्यभूमीपासून पूर्व पाकिस्तान म्हणजेच पूर्व बंगाल हजारो किलोमीटर दूर होता. दोन्ही प्रांताच्यामध्ये भारत देशाची मुख्य भूमी होती. अगदी सुरवातीपासून पाकिस्तानच्या या दोन्ही प्रांतांचे खटके उडत होते.
स्वातंत्र्य मिळाल्यावर मोहम्मद अली जिना यांनी उर्दू ही पाकिस्तानची एकमेव अधिकृत राष्ट्रभाषा म्हणून घोषित केली. पूर्व पाकिस्तानमध्ये मुस्लीम मेजोरीटी होती पण तिथे उर्दू भाषा बोलली जात नव्हती. बंगालच्या लोकांना आधीपासून आपल्या भाषेचा संस्कृतीचा अभिमान होता. त्यांना उर्दूसक्ती पटत नव्हती. बंगाली अस्मितेवर पाकिस्तानच्या पंजाबी मुस्लीम अस्मितेचा वाढता दबाव याच्याविरुद्ध असंतोष निर्माण होऊ लागला.
पूर्व पाकिस्तानची लोक संख्या पश्चिम पाकिस्तानपेक्षा जास्त असूनही त्यांना तेवढे राजकीय अधिकार दिले जात नव्हते.
बंगाली भाषिक पंतप्रधानाला पाकिस्तानमध्ये कार्यकालही पूर्ण करू दिला जात नव्हता. १९७० मध्ये बंगाल मध्ये उद्भवलेल्या चक्रीवादळामध्ये झालेल्या अपरिमित मनुष्य आणि वित्तहानी कडे मुख्य पाकिस्तानी भूमीने दुर्लक्ष केले. याचा राग तिथल्या जनतेमध्ये होता. त्यांनी त्यावर्षीच्या निवडणुकीत आपल्या नेत्यालाच पूर्ण देशाचा पन्तप्रधान बनवायचा याचा चंग बांधला.
आणि घडलं ही तसचं. बंगालच्या शेख मुज्बीर रेहमानच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पार्टीने सर्वात जास्त बहुमत मिळवले. पण मुख्य पाकिस्तानमध्ये त्यांना पंतप्रधान बनवण्यावर विरोध झाला. तेव्हा मात्र बंगालच्या जनतेच्या असंतोषाचा विस्फोट झाला. देशभर चळवळी सत्याग्रह सुरु झाले. पाकिस्तानी सरकारने ही चळवळ लष्करी ताकदीवर दडपायचा प्रयत्न केला. बंगाली तरुणांनी पाकिस्तानपासून बांगलादेशला आझादीची मागणी केली.
२५मार्च १९७१ रोजी पाकिस्तान आर्मीने जमात ए इस्लामी या संघटनेला हाताशी धरून “ऑपरेशन सर्चलाईट” सुरु केलं. ऑपरेशन कसलं हा तर नरसंहार होता.
पाकिस्तानी जनरल टिक्का खान ज्याला बंगालचा खाटिक म्हणण्यात येत होतं त्यान मिल्ट्री ला खुली सूट दिली. ढाका विद्यापीठामध्ये विद्यार्थी आझादीची मागणी करत आहेत अशी शंका आल्याने मिल्ट्रीने वसतिगृहात शिरून ३४ मुलांना ठार केले. ढाक्यामधलंच सुप्रसिद्ध मुघलकालीन “रामना काली” मंदिर पाडण्यात आलं. सेक्युलर विचारवंतांना भारतवादी ठरवून त्यांनाही ठार करण्यात आले होते. स्थानिक वर्तमानपत्रे यांच्यावर बंदी आणून विरोधी विचारांच्या पत्रकारांनाही संपण्यात आले होते.
एका महिन्यात बंगालची परिस्थिती बंदुकीच्या जोरावर काबूत आणायची असा पाकिस्तानी सरकारचा होरा होता.
याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशी तरुणानी मुक्तिवाहिनी या संघटनेची स्थापना केली होती. अनेक ठिकाणी मुक्तिवाहिनी पाक आर्मीशी भिडू लागली. यामुळे चवताळलेल्या पाक सैन्याने सर्वसामान्य जनतेवरही अत्याचार सुरु केले. एका रिपोर्ट नुसार साधारण तीसलाख बांगलादेशीनां आर्मीने ठार केले. दोन ते तीन लाख महिलांवर बलात्कार झाले. एका ठरवून केलेल्या सिस्टमॅटिक प्लॅन नुसार हे रेप करण्यात आले.
आर्मीच्या या आक्रमक पवित्र्याला घाबरून सीमाभागातून बांगलादेशी शेतकरी आपापले कुटुंब घेऊन भारताच्या आश्रयाला येऊ लागले. पुढे पुढे लाखोंच्या संख्येने हे बंगाली अश्रित आसाम, पश्चिम बंगाल या भागात घुसत होते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येला आपल्या देशात सांभाळणे शक्य नव्हते.
भारताच्या खमक्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशाच्या नरसंहारावर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये आवाज उठवला. पण तिथे कोणी या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांचा भारतावर विशेषतः इंदिरा गांधीवर वैयक्तिक राग होता. पाकिस्तानला पक्षपाती अशी त्यांची भूमिका होती. नरसंहाराचे पुरावे जागतिक मिडियापर्यंत पोहचणे आवश्यक होते. पण ऑपरेशन सर्चलाईट सुरु असताना बांगलादेशमध्ये जाऊन हे पुरावे गोळा करणे निव्वळ अशक्य होते.
अशात ७ जून १९७१ रोजी लंडन येथून प्रसिद्ध होणाऱ्या संडे टाईम्स मध्ये एक आर्टिकल छापून आले. त्याचे टायटल होते, “जिनोसाईड” म्हणजेच नरसंहार.
पाकिस्तान बांगलादेशमध्ये करत असलेल्या नरसंहाराचे पुराव्यासकट वर्णन या लेखात होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन पानी आर्टिकलचा लेखक होता एक पाकिस्तानी पत्रकार. अँन्थोनी मास्कार्हेन्हस. अँन्थोनी कडे हे पुरावे कसे आले आणि एवढ करून तो जिवंत कसा राहिला हा मुख्य प्रश्न पाकिस्तानी आर्मीपुढे राहिला.
झालं असं होत, अँन्थोनी हा कराची मधल्या मॉर्निंग न्यूज या नियतकालकाचा उपसंपादक होता.
पाकिस्तानी सरकार पूर्व पाकिस्तानमध्ये आर्मी कोणताही अत्याचार करत नसून उलट भारतीय गुप्तचर संघटना बंगालमध्ये अस्थिरता निर्माण करत आहे हे सिद्ध करण्याच्या खटपटीत होती. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुख्यभूमीवरून दहा पत्रकारांची टीम बंगालमध्ये पाठवण्याची तयारी सुरु केली. या पत्रकारांनी परत आल्यावर काय लिहायचे हे सुद्धा आधीच ठरवले होते. याप्रमाणे ९ पत्रकारांनी बंगालमध्ये सगळे आलबेल आहे अशी खोटी न्यूज आपल्या पेपरमध्ये छापली. फक्त एक पत्रकार सोडून.
अँन्थोनीने परत आल्यावर बंगालमधला नरसंहार बघून हादरून गेला होता. ही सगळी परिस्थिती जगासमोर त्याला आणायची होती पण पाकिस्तान मध्ये हे शक्य नव्हते. आधी तर त्याला या विषयावर बोलण्याचेही धाडस होत नव्हते पण त्याच्या शूर आईने त्याला धीर दिला. तिच्या प्रोत्साहनामुळेच शेवटी अँन्थोनीने एक लेख लिहून काढला.
आजारी पडल्याचा बहाणा काढून तो लंडनला गेला. तिथे संडे टाइम्समध्ये हा लेख दाखवला. ते छापण्यास तयारही होते.
पण हा लेख छापून येण्यापूर्वी त्याला आपल्या घरच्यांची सुरक्षिततेचीही काळजी होती. कारण पाकिस्तानी आर्मीला शंका जरी आली तरी त्याच्या कुटुंबीयापैकी कोणलाही जिवंत सोडणारी नव्हती. अखेर चलाखीने कारण काढून त्याने सगळ्यांना इंग्लंडमध्ये बोलावून घेतले. आपल घरदार सगळी मालमत्ता पाकिस्तान मध्येच सोडून जीव मुठीत धरून फक्त दोन सुटकेस घेऊन अँन्थोनीचे कुटुंबीय लंडनला पोहचले.
ते सगळे आल्यावरच आर्टिकल छापण्याची परवानगी अँन्थोनीने संडे टाईम्सला दिली,
हा लेख वाचल्यावर सगळ्या जगात खळबळ उडाली. भारताच्या बाजूने हा सढळ पुरावा होता. बांगलादेशी मुक्तिसंग्रामाबद्दल जगभरात सहानुभूती मिळण्यासाठी अँन्थोनीचा लेख उपयोगी पडला.
स्वतः इंदिरा गांधी यांनी आपल्या एका मुलाखती मध्ये याच पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रामाणिकपणामुळे आपल्याला लाखो बांगलादेशींचे प्राण वाचवण्यास मदत झाली आणि युद्धात आपली बाजू सगळ्या जगापर्यंत मांडता आली असा उल्लेख केला.
३ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरु झाले. पूर्व पश्चिम या दोन्ही फ्रंटवर झालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली. १६ डिसेंबर दिवशी ९३हजार पाक सैन्याने हात बांधून शरणागती स्वीकारली. इंदिरा गांधीनी पाकिस्तानला धडा शिकवला होता.
हे ही वाच भिडू.
- ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !
- टायगर हिलवरचं पाकिस्तानी बंकर उडवायला भारताच्या मदतीला इस्त्रायल धावून आला.
- पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना स्मशानभूमीत बदलवणारा वीर अब्दुल हमीद !