शेकडो पाकिस्तानी श्रीलंकन माणसाला मारत होते पण एकटा वाघ वाचवण्यासाठी उभा राहिला.

मॉब लीचींग हा प्रकार समाजाला कीड लागणारा आहेच मग तो कोणत्याही देशात का होईना…आपण बोलतोय ते अलीकडेच पाकिस्तान मध्ये झालेला प्रकार.

सियालकोटमधल्या कारखान्यात हा प्रकार झाला असून, तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या जमावाने त्यांच्यातील एका श्रीलंकन व्यक्तीची हत्या केल्यानंतर या जमावाने त्या श्रीलंकन व्यक्तीचा मृतदेह जाळला…या भयंकर प्रकारात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, श्रीलंकन ​​नागरिकाच्या लिंचिंगमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा टीम तयार केल्या आहेत. आणि या टीमने कामाला सुरुवात केली असून लवकरात लवकर याचा तपास देखील पूर्णत्वास जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. 

पण याच संबंधी आणखी एक बातमी म्हणजे, या संतप्त जमावापासून श्रीलंकन ​​नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पाकिस्तान सरकार शौर्य पदक देणार आहे.

झालेल्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रोडक्शन मॅनेजर मलिक अदनान नावाचा एक व्यक्ती संतप्त लोकांच्या गटाशी सामना करताना दिसत आहे.  इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी सियालकोटमध्ये फॅक्टरी मॅनेजर आणि एका श्रीलंकन ​​नागरिकाला जीव धोक्यात घालून संतापलेल्या जमावापासून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला शौर्य पदक जाहीर केले आहे.

 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसत आहे कि,  श्रीलंकन ​​नागरिक प्रियंता कुमारा दियावदना यांना प्रॉडक्शन मॅनेजर मलिक अदनान यांनी जमावापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत.

त्यानंतर मात्र जमावाने अदनानलाच विरोध करत त्या श्रीलंकन ​​नागरिकाला रस्त्यावर ओढले आणि बेदम मारहाण केली. त्या श्रीलंकन नागरिकावर ईशनिंदेचा आरोप करत त्याला ठार मारले आणि त्याचा मृतदेह जाळला.  

या भयंकर घटनेचे पडसाद सगळीकडेच उमटले.  माजी पंतप्रधान आणि पीपीपीचे केंद्रीय नेते, सय्यद युसुफ रझा गिलानी सय्यद युसुफ रझा गिलानी यांनी श्रीलंकन कामगार दियावदानगे प्रियंथा कुमाराच्या हत्येप्रकरणी पाकिस्तान सरकारला न्याय देण्याची मागणी केली आहे. 

गिलानी यांनी घडलेल्या या भीषण घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना कडक शिक्षा देण्याची विनंती केली, जेणेकरून मृतांच्या वारसांना न्याय मिळेल आणि श्रीलंकेच्या जनतेला पाकिस्तानची न्याय व्यवस्थेवर विश्वास बसेल.

त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेची गंभीर दखल घेत जनतेला आश्वासन दिले आहे कि, दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल. 

खान यांनी ट्विट केले की, ‘लोकांच्या वतीने मी मलिक अदनानच्या नैतिक धैर्याला आणि शौर्याला सलाम करू इच्छितो. ज्यांनी सियालकोटमध्ये भडकलेल्या जमावापासून जीव धोक्यात घालून प्रियंथा कुमाराला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला त्यांना तमगा-ए-शुजात देऊन सन्मानित करू असेही इम्रान खान यांनी जाहीर केले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना फोनवरून  सियालकोट घटनेबाबत चर्चा केली, खान यांनी राष्ट्रपती राजपक्षे यांना आश्वासन दिले आहे की, पाकिस्तानमधील एका कारखान्यात काम करणाऱ्या श्रीलंकन व्यावसायिक प्रियंता कुमारा दियावदानाच्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना न्याय मिळवून दिला जाईल.

राष्ट्रपती कार्यालयाने पंतप्रधानांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि विश्वासाशी कधीही तडजोड केली जाणार नाही.

या घटनेशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि माहिती पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मिळवली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, ११३  संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केलेय कि, गुन्हेगारांना दया दाखवली जाणार नाही आणि त्यांना कायद्यानेही माफी दिली जाणार नाही. गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा दिली जाईल, असा विश्वास श्रीलंकेतील सरकार आणि जनतेला आम्ही देतोय तसेच पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असंही त्यांनी जाहीर केलं.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.