वर्ल्डकप फायनलपर्यंत जाऊनही पाकिस्तानी खेळाडूंना आपल्याच देशात तोंड लपवून घुसावं लागलेलं

सध्या पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंचा चांगलाच उदोउदो करतायत. साहजिकच आहे म्हणा, इतक्या वर्षांनी भारताला हरवलंय म्हणल्यावर ते जल्लोष तर करणारच. आता आपल्या खेळाडूंच्या नावावर कितीही उड्या मारत असले, तरी याच चाहत्यांमुळं पाकिस्तानच्या टीमला तोंडं लपवून देशात घुसावं लागलं होतं.

हा खरंच. तेही कधी- जेव्हा पाकिस्तान वर्ल्डकप फायनलपर्यंत पोहोचला होता.

थेट जाऊया १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये

आता ९९ चा वर्ल्डकप म्हणल्यावर कट्टर चाहत्यांना दोनच गोष्टी आठवणार झुलू क्लूझनर आणि भारत पाकिस्तान मॅच. पाकिस्ताननं भारताविरुद्धची मॅच सोडली, तर चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या सुवर्णकाळाची ती सुरुवात होती. पाकिस्तान फायनलमध्ये त्यांना धक्का देणार असं सगळ्यांना वाटत होतं. पण,

जे सगळ्यांना वाटतं ते पाकिस्तान कधीच करत नाय.

फायनलला काय झालं?

पाकिस्ताननं टॉस जिंकून थाटात बॅटिंग घेतली आणि प्रेक्षकांना पाहायला मिळाली घसरगुंडी. ऑस्ट्रेलियाच्या तगड्या बॉलिंगनं पाकिस्तानचा बल्ल्या केला. ३९ ओव्हर्समध्ये १३२ रन्सवर पाकिस्तान ऑलआऊट. सईद अन्वर, अब्दुल रझ्झाक, इंजमाम सगळे वाघ ढेपाळले. आता ऑस्ट्रेलिया म्हणजे दैत्यसेना, त्यांनी हाणामारी केली आणि २० ओव्हर्समध्येच वर्ल्डकप मारला.

आता खेळ म्हणल्यावर हारजीत चालायचीच. एवढं कशाला चिडायचं? पण पाकिस्तान चाहते चिडायचं मुख्य कारण फायनलमधली हार नव्हतं.

सुपर लीगमध्ये भारत पाकिस्तान आमनेसामने आले. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये कारगिल युद्ध सुरू होतं. त्यामुळं या मॅचला पण युद्धाचं रूप आलं होतं. व्यंकटेश प्रसादनं पाकिस्तानची हवा टाईट केली आणि भारतानं पद्धतशीर मॅच मारली. त्या मॅचचा निकाल ऐकून भारतीय जवानांनी कारगिलच्या युद्धभूमीवर जल्लोष केला होता.

आता युद्ध सुरू असताना इतकं बेक्कार हारावं लागलंय म्हणल्यावर पाकिस्तानी चाहते आणखीनच पेटले.

या आगीत तेल ओतलं ते पार्टी आणि फिक्सिंगनं

फायनलमध्ये झालेली पाकिस्तानची घसरगुंडी आणि बांगलादेश विरुद्धचा पराभव बघून पाकिस्तानच्याच गुप्तचर यंत्रणांनी तपासाची चाकं फिरवली. त्यात हे समोर आलं की, फायनलच्या आदल्या रात्री पाकिस्तानचे खेळाडू उशिरापर्यंत पार्टी करत होते. अव्यावसायिक वागणं आणि विकेट फेकल्यामुळं त्यांची चौकशीही करण्यात आली.

एजाज अहमद हा अनुभवी पाकिस्तानी बॅटर उशिरापर्यंत कसिनोत असल्याचं समोर आलं. फायनलमध्ये त्याला फक्त २२ रन्सच करता आले. विशेष म्हणजे बाकी कुठलाच पाकिस्तानी बॅटर एजाजपेक्षा जास्त रन्स करू शकला नाही.

टीममधल्याच खेळाडूंनी आपल्या सहकाऱ्यांवर फिक्सिंगचे आरोप केले. त्यामुळं पाकिस्तानी फॅन्स चांगलेच चिडले.

त्यांचं म्हणणं होतं, एकतर हे युद्ध सुरू असताना भारताकडून हारतात, वर पार्ट्या झोडतात आणि फायनलमध्ये पण माती खातात.

आता जेव्हा मायदेशी जायची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना तोंड लपवावं लागलं. काही खेळाडू दुबईत थांबले. चाहत्यांनी इंझमामच्या घरावर दगड आणि अंडी फेकली. वसीम अक्रमची पोस्टर जाळली. पार राडा झाला.

बारक्या पोराला पण माहीत होतं, तोंडं फायनल हरल्यामुळं नाही तर भारताकडून हरल्यामुळं लपवावी लागली होती.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.