छोटा असला म्हणून काय झालं, हा देश लसीकरणात वस्ताद ठरलाय

पलाऊ. नाव वाचल्यावरच जरा निवांत वाटतं नाय का? पॅसिफिक ओशनमधल्या बेटांचा हा देश. गुगलवर या देशाचे फोटो बघितल्यावर शप्पथ असं वाटलं तिकीट काढून पहिलं इकडंच जावं. कारण निळाशार समुद्र, हिरवेगार डोंगर हे लई दिवस झाले फक्त फोटोतच बघणं चाललंय. सध्या काय जायचा प्लॅन होणार नाय हे माहित असून पण पलाऊ देशाबद्दल वाचत बसलो. तेव्हा कळलं देश एवढासाय, पण इकडं लसीकरण मात्र लई झालंय.

आपल्या भारतानं नुकताच शंभर कोटी डोस देण्याचा टप्पा पार केला. त्याचं फुल सेलिब्रेशन केलं, गाणी-बिणी गायली, पोस्टर लावली. पलाऊमध्ये तसा विषय बहुतेक झालेला नसणार. याचं कारण म्हणजे त्यांच्याकडं जेवढी लोकं आहेत त्यापेक्षा जास्त आपल्याकडं फेक अकाऊंट्स असतील.

आता हा देश लसीकरणात वस्ताद का ठरलाय हे सांगतो. लस घेऊ शकतात अशा ९९ टक्के लोकांना दोन्ही डोस देत या देशानं सुरक्षित केलंय. त्यांची लोकसंख्या आहे साधारण १८ हजार. त्यातल्या १२ वर्षं वयाच्या पुढच्या १६ हजार १५२ लोकांना कोविड लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज (आयआरएफसी) या मानवतावादी संस्थेच्या पॅसिफिक कार्यालयाच्या प्रमुख केटी ग्रीनवुड सांगतात, “पलाऊ, फिजी आणि कुक बेटांसह अनेक पॅसिफिक देशांनी लसीकरणात उच्च दर गाठण्याचं यश साजरं करणं महत्वाचं आहे.” 

पॅसिफिक राष्ट्र सध्या दरडोई लसीकरण दरात जगात भारी ठरली आहेत. साधारण १७ हजार लोकसंख्या असलेल्या कुक बेटांवर ९६ टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे, तर ८ लाख ९६ हजार लोकसंख्या असणाऱ्या फिजी बेटांवर ९६ टक्के लोकांना लसीचा एक डोस देण्यात आलाय.

आता तुम्ही म्हणाल एवढ्या लोकांचं लसीकरण झालंय, तर विमानात बसा आणि इकडं चला, पण भिडू लोक एक टेन्शनचा विषय आहे. न्यूझीलंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड ॲटमॉस्फेरिक रिसर्चनुसार, येत्या नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान दक्षिण-पश्चिम पॅसिफिक समुद्रात अंदाजे १२ चक्रीवादळं धडकू शकतात. यात घरं आणि पायाभूत सुविधांचं मजबूत नुकसान होण्याचा धोका आहे. त्याआधीच लसीकरण पूर्ण करत या देशांनी पद्धतशीर विषय केलाय.

या सगळ्यात आम्हाला एक प्रश्न पडला, भारत, चीनसारख्या लय लोकसंख्येच्या देशांनी लसीकरणात आघाडी घेतलीये. पलाऊ, फिजीसारखे छोटे देश पण लसीकरणाच्या बाबतीत फॉर्मात आहेत. म्हणल्यावर सगळेच देश सनाट असतील की.

तसा विषय नाहीये. सध्या क्रिकेटच्या मैदानावर दिसणाऱ्या पापुआ न्यू गिनी देशात लोकसंख्येपैकी एक टक्क्यांहून कमी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. पॅसिफिक ओशनमधल्याच सोलोमन बेटं (६ लाख ५० हजार लोकसंख्या), किरिबाती (१ लाख १९ हजार लोकसंख्या) या देशांमध्ये १० टक्के लसीकरणही पूर्ण झालेलं नाही.

एकीकडे काही देश लसीकरणाचे विक्रम रचत आहेत आणि दुसरीकडे किमान १० टक्के लोकसंख्येला लस देण्यात काही देशांना अपयश येतंय. त्यामुळे नवीन लशींच्या निर्मितीला आणि उपलब्ध लशींच्या समान वाटपाला येणाऱ्या काळात आणखी महत्त्व येणाराय हे फिक्स.

भिडू लोक आताच आपापलं लसीकरण पूर्ण करा, चक्रीवादळं येऊन गेल्यावर जरा पलाऊला चक्कर टाकून येऊ!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.