पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत इंदिरा गांधींना आपली मोठी बहिण मानायचे
तो दिवस होता ७ मार्च १९८३ चा. त्या दिवशी दिल्लीतल्या विज्ञान भवनात नामचे अर्थात अलिप्त राष्ट्रसंघाचे संमेलन भरले होते. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण अचानक एक व्यक्ती नाराज होवून या संमेलनातून बाहेर पडला.
हा व्यक्ती होता यासर अराफत…
पॅलेस्टाईनचा खमक्या नेता. पुढे त्यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक देवून गौरवण्यात आलं असा नेता. तो बाहेर जाणं म्हणजे यजमान असलेल्या भारतासाठी ही शरमेची बाब होती. यासिर अराफत एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट भारत सोडण्याची तयारी केली. त्यासाठी विमान देखील सज्ज करण्यात आलं.
हा प्रकार इंदिरा गांधींना समजला. नाराज होण्याचं कारण विचारल्यानंतर त्यांच्या अगोदर जॉर्डनच्या सत्ताधिशांना भाषणाचा सन्मान देण्यात आल्याने ते नाराज झाल्याचं सांगण्यात आलं. इंदिरां गांधींना लक्षात आलं की यासिर अराफत तडकाफडकी जाण्यामुळे पुढे जावून संबंध ताणले जावू शकतात.
त्यांनी तात्काळ या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी फिडेल कॅस्ट्रोंना पाचारण केलं.
त्यांनी मध्यस्थी करण्यासाठी फिडेल कॅस्ट्रोंना पाचारण केलं. अराफत यांची समजूत काढून त्यांना परत बोलवण्याची ही जबाबदारी आत्ता कॅस्ट्रोंवर आली होती.
कॅस्ट्रोंनी यासर अराफत यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं,
इंदिरा गांधी आणि तुमचे संबंध खूप चांगले आहेत अस ऐकलं आहे. हे खर आहे का…?
यावर अराफत वेळ न घालवता म्हणाले,
हो मग त्या मला मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत..
अराफत यांचे हे उत्तर ऐकताच कॅस्ट्रो म्हणाले,
मग तूम्ही लहान भावाप्रमाणे वागा, मोठ्या बहिणीला दूखावू नका. पून्हा संमेलनात चला..
कॅस्ट्रोचे हे बोल ऐकून अराफत यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी नाराजी बाजूला ठेवून इंदिरा गांधींच्यासाठी संमेलनात पून्हा येण्याची तयारी दर्शवली.
यासिर अराफत आणि इंदिरा गांधी याचे नाते अगदी भावा बहिणीप्रमाणे होते. यासिर हे प्रचंड संशय घेणारे व्यक्ती. हा संशय असायचा तो प्रामुख्याने जिवाचा. अगदी एखाद्या देशाचा दौरा असेल तर तो गुप्तपणे आखला जाई. गाड्यांचे वेगवेगळे ताफे ठेवले जातं. एक ताफा एकीकडे जात तर दूसरा ताफा दूसरीकडे. कोणत्या ताफ्यात यासिर अराफत आहेत हे कोणालाच माहित पडत नसतं असा हा कारभार.
अगदी यासर अराफत यांची भाषणशैली पाहिली तरी ते नेहमी चौकस असल्याचं दिसतं. आपल्यावर कुठून गोळीबार होवू शकतो याचा अंदाज घेतच असावेत अस वाटे.
मात्र भारताबाबत त्यांच मत विश्वासाचं होतं. इंदिरा गांधी आणि त्यांचे संबंध हे राजकारणापलीकडचे होते. जेव्हा कधी त्यांचा भारताचा दौरा आखला जायचा तेव्हा स्वत: व्यक्तिश: फोन करून अराफत याची कल्पना इंदिरा गांधींना देत. त्यानंतर इंदिरा गांधी आपले नियोजित दौरे बाजूला सारून त्यांना घेण्यासाठी विमानतळावर जात.
अराफत इंदिरा गांधींना माय सिस्टर म्हणायचे.
फक्त इंदिरा गांधींच नव्हे तर संपूर्ण गांधी कुटूंबासोबत अराफत जोडले गेलेल होते. राजीव गांधींच्या सोबत देखील त्यांचा जिव्हाळा होता. याचा पुरावा म्हणजे अराफत यांनी राजीव गांधींना लिहलेले एक पत्र. या पत्रात अराफत लिहतात,
तुमच्या निवडणूक प्रचारात मला सहभागी होण्याची संधी मिळाली तर मला खूप आनंद होईल.
परंतु नंतर त्यांनाच जाणीव झाली की एखाद्या देशाच्या देशांतर्गत निवडणूकांमध्ये सहभागी होणं योग्य नाही. अगदी असही सांगितलं जात की राजीव गांधीवर आत्मघाती हल्ला होणार आहे याची कल्पना अराफत यांना होती. तसा इशाराही त्यांनी दिला होता.
११ नोव्हेंबर २००४ रोजी अराफत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर इस्त्रायलवर विषप्रयोग केल्याचा आरोप लावण्यात आला. सुरवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याची बातमी व नंतर विषप्रयोग झाल्याची चर्चा यामुळे बरेच वाद झाले.
अखेर त्याचे शव बाहेर काढून स्विझर्लंडला पाठवण्यात आले. यामध्ये त्यांच्या शरिरात पोलोनियम २१० हे धोकादायक विषय आढळले. पण विषप्रयोग नेमका कोणी केला याची माहिती मिळाली नाही.
हे ही वाच भिडू