पन्नालाल गाढव सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बरोबर कशी काय द्यायचा ?

गावची जत्रा म्हटलं की दुसरी दिवाळीच असायची.नवीन कपडे घालायला मिळायची. घरातली म्हतारी माणसं खर्चायला पैसं द्यायची.जेवणाचा स्पेशल बेत असायचा. सासुरवाशिणी लेकरांना घेऊन दोन दिवस आधीच आलेल्या असायच्या.सगळ्यांचे लाड पुरवले जायचे.पै पाहुणे यायचे.गावात सगळीकडं नवीन चेहरे दिसायचे.

यातच भर असायची जत्रेत स्टॉल लावायला आलेले फेरी वाले. कोणी खेळणी विकतंय, कोण फुगे तर कोण पेढे. पोरीबाळी बांगड्या क्लिपा मिळणाऱ्या स्टॉल वर गर्दी करायच्या. देवाला लागणारा नारळ गुलाल भेडंबत्तासूच्या स्टॉल देवळाच्या दारापाशी असायचा. खेळण्यासाठी रडणाऱ्या पोरांना परत येताना घेऊन देतो म्हणून आश्वासन दिलेलं असायचं. देवळाच्या पाठीमागच्या मैदानात २ रुपयात आकाशाची सैर करून आणणारा पाळणा, काळजाचा ठोका चुकवणारा मौत का कुआ, कोलबसच जहाज..काय नि काय!!

ह्याच मंडळीत नंतर नंतर एका नवीन पावण्याचं आगमन झालं. पन्नालाल गाढव.!

कुठल्या गावावरुन आलं होतं काय माहीत पण लगेच हे गाढव फेमस झालं. जत्रेत सगळ्यात आधी ह्या गाढवाच्या दर्शनाला ओळ लागायला लागली, गाढव होतच तेवढं टॅलेंडेड. ‘सबसे होशियार गधा’ म्हणून त्याची जाहिरातच होती.

तिकीट काढून आत गेलं की मंडपात एक रिंगण असायचं त्यात माईक घेऊन एक मामु उभा असायचा. पुरुष एक साईडला आणि बाया एका साईडला असं त्याच्या आदेशाला प्रमानं सेपरेशन व्हायचं. पुरेसं संख्याबळ गोळा झालं की शो च्या हिरोची एन्ट्री व्हायची. पन्नालाल गाढव आत आला की आधी आपल्या ऑडियन्सला फिरून बघून घ्यायचा. तीन चार फेऱ्यामध्ये त्याला पब्लिकच भूत,भविष्य,वर्तमान सगळं माहिती व्हायचं.

दिमाखात राऊंड मारणाऱ्या पन्नालालला मामु एकेक प्रश्न विचारायला चालू करायचा.

प्रश्न हिंदीत असायचे.गाढव हिंदीभाषिक होतं बहुतेक. मामु प्रेक्षकांसाठी मराठीत प्रश्न रिपीट करायचा. सुरवातीचे प्रश्न निरुपद्रवी असायचे.”पुरे पब्लिक मे लाल शर्ट किसन पेहना है” किंवा “पब्लिक मे टकलू कोण है” आशा टाईपचे .गाढव ते बरोबर ओळखायचं, आणि त्या व्यक्ती पुढं जाऊन उभं राहायचं. ते काय हो आम्हाला पण ओळखायचं. असल्या प्रश्नासाठी का आम्ही ५ रुपये दिलेले?

हळूहळू जादू दिसायला सुरवात व्हायची.

“स्कुल मे सबसे ज्यादा होशियार बच्चा” ह्या प्रश्नाला ज्याच्या पुढं गाढव जाऊन उभा राहायचं त्याची कॉलर ताठ व्हायची.”शादी मे सबसे ज्यादा कोण खाता है” आयला म्हणजे हे गाढव लग्न पण अटेंड करतंय वाटत. आमच्या कल्पनेत वेगळीच प्रश्न थैमान घालायची.

मग मामु काढायचा ठेवणीतले प्रश्न.”जत्रेत अंघोळ न करता कोण आलं आहे”. पुढच्या वर्षी पासन आधी पोरं दोन दोनदा न्हाहून मग पन्नालाल च्या शो ला जाऊ लागली. मामु चावट प्रश्न पण विचारायचं. “सबसे ज्यादा अपनी बीबी की सूनने वाला पती?” प्रत्येक सासुच मत असायचा माझाच मुलगा आपल्या बायकोच्या हातच बाहुल आहे. गाढव थांबायचं एकाच्याच पाशी.

“सबसे सुंदर बीबी किसकी है. कोण है वो सबसे ज्यादा लकी आदमी?” गाढव ज्याच्या पुढे थांबेल त्याला पुढचा प्रश्न “क्या आपकी बीबी साथ आयी है?” आली असेल तर पन्नालाल तिला पण शोधायच्या कामगिरी वर निघायचा.

सगळ्यांच्या माना बायकांच्या सेक्शन कडे फिरायच्या. असला चान्स कोण सोडतोय ?

“कोणाची बायको नवऱ्याबरोबर भांडते” किंवा “कोणाची बायको नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरते?” अशा प्रश्नाच्या वेळी बायका हळूच दोन पावलं मग सरकायच्या. गाढव जवळ जाऊन उभा राहील तर शेजारणी कडं बोट दाखवायच्या. गाढव पण बेन हुशार होतं.बरोबर चोराला कान लावायचं. बाईच्या नवऱ्याला रोज खिसे चेक करायचा सल्ला मामु द्यायचा. पन्नालाल ला मोठया मोठ्या गुन्ह्याचे केस द्यायला पाहिजे होते अशा चर्चा झालेलं आठवतंय.

काही मजेशीर प्रश्न असायचे.” कोणाला लग्नाची घाई झालेली आहे?” मग एखाद्या लग्नाळू पुढं गाढव उभा राहायचं.ते लाजून चुर व्हायचं. “इथं कोण मुलगा लाईन मारायला आला आहे?” ह्या वर दरवर्षी आमच्या गल्लीतलं मंग्या गावायचं.पन्नालालचा तो पर्मनंट गिऱ्हाईक. पुढं खूप वर्षांनी मंग्या सासुरवाडीच्या उरसाला गेलं होतं तेव्हा पन्नालाल न त्याला तिथं पण ओळखलं. मग मात्र मंग्या पेटलं आणि मामु बरोबर तिथंच वांद काढलं.

Screen Shot 2018 08 09 at 11.04.55 PM
Pic – 101karan khosla

 

पन्नालाल एकदा एका न्यूज चॅनल वर निवडणुकीतल्या उमेदवारांच भवितव्य ओळखताना दिसला. ते बघून उर भरून आला. फुटबॉल वर्ल्ड कपच भविष्य ओळखणाऱ्या पॉल ओक्टॉप्सला फाईट देणारा इंडियन गडी हाय म्हटलं. आणि त्यो पॉल बाबा च फायनल ला  गंडलेला तस पन्नालाल न एकदा पण मामुचा पोपट केला नाही.

अजूनपन हे गाढव जत्रेत येतं म्हणतात. त्याच्या करामती कडं विस्फारलेल्या नजरेनं पाहणारी टाळकी गोळा होत असतील का माहीत नाही. युट्युब आणि व्हाट्सअप्प च्या काळात ही शक्यता कमीच वाटते. पण पन्नालाल हे सगळं कस ओळखायचा तर तुमच्या इतकचं आम्हाला देखील त्याचं कोडं. आम्ही ते शोधायचा प्रयत्न केला पण हाती फक्त गाढवपणा आला. पण एक गोष्ट सापडली ती म्हणजे आपला नॉस्टॅलजिकपणा. तो काळ आणि त्या जत्रा जगवणारा एक प्राणी. तो हि गाढव. पण त्याला गाढव म्हणण्याचा गाढवपणा कोणी करणार नाही हे ही तितकच खरं.

असो जगातल्या सगळ्यात जास्त आदर मिळवलेल्या ह्या गाढवाबद्दलच्या तुमच्या काही आठवणी असतील तर जरूर कळवा.

*ह्या लेखा मध्ये कोणाही प्राण्याच्या अथवा त्याच्या नातेवाईकाच्या भावना दुखवायचा हेतू नाही. तरीही कोणाच्या दुखावल्या गेल्या असतील तर भिडू क्षमस्व आहे.

1 Comment
  1. विश्वजित दिगंबर पवार says

    हो पन्नालाल पाहीला आषाढि यात्रा पंढरपूर

Leave A Reply

Your email address will not be published.