पॅनासॉनिक कंपनी काय एका दिवसात उभी राहिलेली नाही, त्याला १०० वर्षांचा इतिहास आहे

टीव्ही मार्केटमध्ये किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर पॅनासॉनिक काय चीज आहे आहे हे सांगण्याची गरज नाही. एकेकाळची इलेक्टरीकल क्षेत्रातली सगळ्यात मोठी आणि बाप कंपनी. अजूनही इलेक्ट्रॉनिक मधली सगळ्यात जास्त उलाढाल करणारी कंपनी. ही कंपनी आज जितकी मोठी आहे त्याहून जास्त मोठी या कंपनीच्या निर्मितीची गोष्ट आहे.

कोनोसुके मात्सुशिताने पॅनासॉनिक कंपनी उभी केली पण हे इतकं सहजासहजी झालं नाही.

1894 साली जपानच्या वाकायाम प्रांतात कोनोसुके मात्सुशिताचा जन्म झाला. वडील गावातले सगळ्यात मोठे जमीनदार होते. घरची परिस्थिती इतकी श्रीमंत असल्याने मोठ्या लाडात कोनोसुके मात्सुशिताचं बालपण गेलं. कोनोसुके मात्सुशिताच्या आईवडिलांनी कल्पना केली होती की आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ त्यावेळी तो फक्त 5 वर्षाचा होता.

पण 1899 साली अचानक सगळं वातावरण बदललं आणि एका चुकीच्या निर्णयामुळे कोनोसुके मात्सुशिताच्या आईवडिलांना आपलं सगळं वैभव विकाव लागलं आणि त्यांचे पार खाण्यापिण्याचे वांदे झाले.

गावातले जमीनदार असणारे लोकं अचानक गरीब झाले. जगण्याचेच प्रश्न निर्माण झाल्याने 9 वर्षाच्या कोनोसुके मात्सुशिताची शाळा सुटली.

अभ्यास सोडून उदरनिर्वाह करण्यासाठी तो काम करू लागला आणि पोट भरू लागला. काम केल्याशिवाय पर्यायचं नव्हता कारण जर काम केलं नाही तर त्या दिवशी जेवायचं काय इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. दुकानात काम करताना कोनोसुके मात्सुशिताला दुकानाच्या मालकाच्या घरचंही काम करावं लागतं असे. इतकी मेहनत करून दुकानाला फायदा झाला नाही म्हणून दुकानाच्या मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकलं.

आता पुन्हा मोठा पेच निर्माण झाला की पुढं काय करायचं.

एका ओसाका इलेक्टरीक कंपनीत कोनोसुके मात्सुशिताला काम मिळालं. जिथं तो पोट भरण्यासाठी गेला होता ती कंपनी त्याचं नशीब बदलेल अशी साधी कल्पनाही त्याने केलेली नव्हती. याच कंपनीने कोनोसुके मात्सुशिताला पुढे जाण्यासाठी अनेक संधी दिल्या. वयवर्ष 22 असताना कोनोसुके मात्सुशिता कंपनीचा इलेक्टरीकल इन्स्पेक्टर बनला.

कंपनीत काम करत असतानाच कोनोसुके मात्सुशिता स्वतःचे नवीन प्रयोग करून पाहत होता.

यातूनच त्याला इलेक्टरीकल सॉकेट गवसलं पण कंपनीच्या मालकाने ते चालणार नाही म्हणून रिजेक्ट केलं. पण आपल्या आयडियावर काम करण्यासाठी कोनोसुके मात्सुशिताने त्या कंपनीतील जॉब सोडला. घराच्या बेसमेंटमध्ये त्याने आपलं काम सुरू केलं. पुढे दारोदार जाऊन कोनोसुके मात्सुशिताने ते सॉकेट विकायला सुरवात केली. पण हे सॉकेट मार्केटमध्ये चाललंचं नाही.

पुन्हा एकदा घरातल्या वस्तू विकण्याची वेळ त्याच्यावर आली पण आपलं प्रॉडक्ट दर्जेदार आहे यावर कोनोसुके मात्सुशिताचा विश्वास होता. अचानक एके दिवशी थेट हजार सॉकेट बनवण्याची ऑर्डर त्याला मिळाली. हळूहळू हे सॉकेट थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मागवण्यात येऊ लागले यातून एक छोटी कंपनी सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतला.

13 मार्च 1918 रोजी सॉकेट बनवणारी पॅनासॉनिक कंपनी सुरू झाली.

104 वर्षे अगोदर पॅनासॉनिक कंपनी उभी करणारे कोनोसुके मात्सुशिता वयाच्या 94 व्या वर्षी म्हणजे 1989 साली निधन पावले. त्यावेळी कोनोसुके मात्सुशिता हे वारले तेव्हा कंपनीचा रिव्हेन्यू हा 42 बिलियन यूएस डॉलर इतका होता.

आज घडीला पॅनासॉनिक कंपनीत हजारो लोकं काम करतात आणि कंपनी करोडो रुपयांची उलाढाल करते. इलेक्टरीकल कुठलीही वस्तू घ्या पॅनासॉनिक हा ब्रँड आपल्याला दिसतो म्हणजे दिसतोच. घराच्या बेसमेंटमध्ये सुरू झालेली कंपनी आज जगभरातल्या उद्योजकांसाठी प्रेरणास्थान आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.