पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न कोल्हापूरवासीयांच्या पाचवीलाच पूजलाय !

नदी प्रदूषणाचा प्रश्न कोल्हापूरवासीय नागरिकांच्या आणि त्यातल्या त्यात पंचगंगा काठच्या नागरिकांच्या पाचवीलाच पूजला आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचगंगा प्रदूषणाने डोकं वर काढलंय. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीमध्ये माशाची फौज तरंगताना दिसतीय. माशांनी जणू संचलन सुरू केलंय असा भास व्हायरल झालेला व्हिडिओ बघून होतोय. नदीतील प्रदूषणामुळे ऑक्सिजनची कमतरता झाली असल्याने मासे पाण्यावर तरंगत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पंचगंगा नदीतील माळी पाणंद भागातील माशांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये हजारो मासे एकामागोमाग एक पाण्यावर तरंगताना दिसतायत. तरंगणाऱ्या माश्यांना भक्ष्य करण्यासाठी पक्ष्यांचे थवे आभाळात घोंगावताना दिसतायत. तर दुसरीकडे काहींनी ही संधी साधत मासेमारी सुरू केलीय.

त्यामुळे पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा आम्हालाच का, असा प्रश्न गेली अनेक वर्षे नदीकाठच्या नागरिकांतून विचारला जातोय. 

ठोस उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. जलपर्णीबरोबरच अनेक मासे मृत्युमुखी पडतात. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होतोय. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जुजबी कारवाई करण्यापलीकडे काही होत नाही, ही कोल्हापुरातली वस्तुस्थिती आहे.

फक्त आत्ताच मासे मेलेत असं नाही तर याआधी बऱ्याचदा असे प्रकार घडलेत. किंबहुना दरवर्षी मासे मृतावस्थेत तरंगताना दिसतात. त्यामुळे दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात मासे तरंगायला कसे लागले याचा शोध घ्यायचं ठरवलं असता हाती आलेल्या माहितीनुसार,

८ फेब्रुवारी २०२१ ला असाच प्रकार शिरोळ बंधाऱ्यात घडला होता. दूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे चित्र तेव्हा पाहायला मिळाले होते. तर अनेक मासे ऑक्सिजन घेण्याकरिता पाण्यावर तरंगताना दिसून आले. दूषित पाणी प्रवाहित होण्यासाठी धरणातून पाणी सोडणे हा पर्याय नाही. याला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होताना दिसली पण काही घडलंच नाही.

फक्त शिरोळच नाही तर त्याआधी म्हणजे १८ जानेवारी २०२० ला तेरवाड बंधाऱ्यात मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषणामुळे मृत झालेल्या माशांचा हार घालण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. मृत मासेही भेट देण्यात आले होते.

वारंवार मासे मृत सापडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बैठक घेऊन प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करा, असे आदेश दिले होते. या आदेशाच पुढं काय झालं आणि आत्ता मासे कशामुळे मृत झालेत यासंदर्भात बोल भिडूने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. अर्जुन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गाडी चालवत असून वेळ नसल्याचे कारण पुढे केले.

मुख्यमंत्र्यांनी प्रदूषणासंदर्भात जी बैठकीला आज एक वर्ष पूर्ण झालंय. बैठकीत काय ठरलं होतं ?

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ५ जानेवारी २०२१ रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळ यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन करा, समितीने दर महिन्याला बैठक घ्यावी, त्याचा अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेला मुख्यमंत्री कार्यालयात सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या.

समन्वय समिती स्थापन झाली का, झाली असेल तर त्यांच्या दर महिन्याला बैठका झाल्या का, किती अहवाल पाठवले, याची माहिती नाही. यामुळे ही समिती कुठे आहे, असा सवाल आता उपस्थित होतोय.

याच बैठकीत पंचगंगा प्रदूषणाचे थर्ड पार्टी ऑडिट करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्या ऑडिटचे काय झालं कोणालाच माहीत नाही. थर्ड पार्टी ऑडिट (त्रयस्थ यंत्रणेकडून परीक्षण) झाले का, झाले असल्यास त्यात काय निष्कर्ष आले, त्यावर काय कार्यवाही झाली, याबाबत कोल्हापूरकरांच्या मनात आजही सवाल आहे.

या बैठकीत प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यावर तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी २२० कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा बैठकीत सादर केला. एका वर्षाच्या कालावधीनंतरही पंचगंगा आराखडा अद्याप सादर झालेला नाही. तो कधी होणार? त्याला निधी कधी मिळणार? हे स्पष्ट नाही.

आता काल मासे मृत झालेल्या प्रकारात जलाशयात काही वेगळी हालचाल घडले आहे का, की विशिष्ट भागात काही कुजले आहे, पाण्याचा रंग माशांची पोहण्याची स्थिती पाहून काही समजते आहे का ? यासंदर्भात बोल भिडूने पर्यावरण अभ्यासक सुहास वायगंनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

भारतात चंबळ नदी सोडली तर बऱ्यापैकी सगळ्याच नद्या प्रदूषित आहेत. याला सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडणे. पंचगंगेच म्हणायला गेलं तर सांडपाणी, बंधाऱ्यात साठवून ठेवलेलं पाणी आणि जलचरांना आवश्यक असलेली ऑक्सिजनची डिमांड या तीन गोष्टी कारणीभूत आहेत.

त्यात आणखीन वातावरणातील बदल सुद्धा माशांच्या या स्थितीला कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं की वातावरणात सध्या थंडीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे नदी पात्रावर धुक्याच आच्छादन येत आणि ही धुक्याची चादर जास्त वेळ राहिल्याने ऑक्सिजन कमतरता भासते आणि मासे नदी पृष्ठावर येताना दिसतात. हेच कारण असेल तर नदी वाहती असती तर अशी परिस्थिती ओढवली नसती.

नदी पात्रात सांडपाणी, कारखान्याची मळी, नदी काठावरच्या गावांच सांडपाणी यांमुळे नदी प्रदूषित होताना दिसते आहे. यावर लॉंग टर्म उपाययोजनांची आवश्यकता आहे. जसं की नदीकाठच्या गावांमध्ये जनजागृती करणं. आणि मुळात प्रदूषण नियंत्रण मंडळाची यात महत्वाची भूमिका आहे, ती दुर्लक्षित करून चालणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.