महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि पंढरपूर-मंगळवेढा दुसरा न्याय असं कसं चालेल….

अवघ्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतं आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसाची जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असा काहीसा कार्यक्रम सुरु आहे. पुण्यात तर संध्याकाळी ६ नंतर बाहेर पडायला पण मनाई आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी पण काहीसे असेच निर्बंध आहेत.

एका बाजूला राज्याच्या सगळ्या भागात अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला पंढरपुर-मंगळवेढ्यात मात्र कोरोना नावाचा काही प्रकारचं नाही अशी परिस्थिती आहे. खुद्द राज्याचे मंत्रीच असं म्हणताना दिसत आहेत.

त्याला कारण ठरलं आहे इथली विधानसभेची पोट निवडणूक.

या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी राज्यातले प्रमुख पक्षातील नेते पंढरपुरात दाखल होतायत. शेकडो कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा होतं आहेत. पण प्रशासनाकडून मात्र त्यावर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत.

पंढरपूरमध्ये सध्या किती रुग्ण आहेत?

राज्याच्या इतर भागाप्रमाणेच पंढरपूरमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. सध्या शहर व तालुक्‍यात सुमारे ५०० हून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत सुमारे पाच हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

लसीकरण कार्यक्रम युद्धपातळीवर सुरु असला तरी रुग्ण वाढ थांबलेली नाही.

कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये कोणते नियम आहेत?

सोलापूर जिल्ह्यात सध्या दिवसभर जमावबंदी आणि रात्री ७ नंतर संचारबंदी आहे. मात्र यातील दिवसभर जमावबंदी या नियमांमधून पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यांना तिथं निवडणूक असल्यामुळे वगळण्यात आलं आहे. त्यामुळे इथं सभा, संमेलन, मेळावे या गोष्टी घेता येत आहेत. त्यावेळी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

मात्र ७ नंतरची संचारबंदी संपूर्ण जिल्ह्यासह या दोन तालुक्यांना देखील लागू आहे.

इतर कोणत्या गोष्टी बंद किंवा निर्बंध आहेत?

प्रशासनाकडून सध्या विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. सोबतच शहरातील हॉटेल आणि हातगाडीवर छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्यांना देखील त्यांचे व्यवसाय बंद ठेवायला सांगितलं आहेत, ऑनलाइन काही प्रमाणात सुरु आहे.

तसचं शहरातील इतर ३ हजार ५०० छोट्या- मोठ्या दुकानदारांची कोरोना चाचणी केली जातं आहे. चाचणी केल्यानंतर दुकानदारांनी कोरोना चाचणीचं सर्टिफिकेट दुकानात दर्शनी भागावर लावणं बंधनकारक केलं आहे.

ज्या दुकानदाराकडे हे कोरोना चाचणी केलेले सर्टिफिकेट नसेल अशी दुकानं सील करून त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

एका बाजूला छोट्या हॉटेल व्यवसायिकांना व्यवसाय बंद ठेवायला लावला असताना दुसऱ्या बाजूला राजकीय नेते आणि मंत्री शेकडो कार्यकर्त्यांच्या सभा घेत आहेत.  

पहिल्यांदा २१ मार्च रोजी पंढरपूरमधल्या श्रीयश पॅलेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. यात पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

0951d5a83721ca3a2dafe05b4d44bbee original

विरोधी पक्षातून टीका सुरु झाल्यानंतर आणि माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा होऊ लागल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली होती. त्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक आणि पक्षाचे पदाधिकारी संदीप मांडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जयंत पाटील यांनी मास्क काढून घेतली सभा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले होते. त्यावेळी पहिली तर गोष्ट म्हणजे सभेला मोठी गर्दी जमली होती. त्यात कुठेही सोशल डिस्टंन्सींगचं पालन करण्यात आलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे जयंत पाटील यांच्या मागे उभ्या असलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याने मास्क घातला नव्हता.

एवढचं काय तर स्वतः जयंत पाटील यांनी देखील मास्क घातला नव्हता. त्यावर ते कार्यकर्त्यांना म्हणाले,

तुमचे चेहरे पाहून कोरोना या जगातून गेला, असे मला वाटत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले होते

त्यानंतर त्यांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. त्यावर आज लगेच खुलासा करत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचा दावा केला. ते म्हणाले, माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहे. पंढरपूरमधल्या सभेत समोरच्या गर्दीतील अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. त्यावर मी इतकेच म्हणालो की, तुमच्याकडे बघून जगात कोरोना नाही असचं वाटतं.

मात्र असे करू नका. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत राज्य सरकार पण गंभीर आहे. दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये लॉकडाऊन करायचे, कडक निर्बंध घालायचे याबाबत निर्णय होणार आहे, असे मी म्हटल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

img 20210404 wa0022 202104592606

मात्र यानंतर कालच्या गर्दीची दखल घेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अजित पवार मीडियाला म्हणाले पंढरपूरमधले शॉट्स दाखवू नका. 

यापुढची गोष्ट म्हणजे जयंत पाटील यांच्या या गर्दीच्या विषयावर रविवार दि. ४ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना पंढरपूरमधले शॉट्स न दाखवण्याची विनंती केली. ते म्हणाले, तिथं निवडणूक जाहीर झाली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून नियम पाळणे गरजेचे आहेत.

मात्र आता लोक म्हणतात, पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडू निवडणुका आहेत, तिकडे गर्दी होते ती चालते, मग इकडे का नाही?

त्यामुळे तिथलं मतदान होईपर्यंत तिथं गर्दी होणार हे साहजिक आहे, पण निवडणूक झाली कि लगेच नियमावली कडक करण्यात येईल. पण तो पर्यंत मीडियावाल्यांनी तिथले शॉट्स घेऊन महाराष्ट्रभर दाखवू नका, असा सल्ला पण पवारांनी माध्यमांनाच दिला.

निवडणूक रद्द होऊ शकते का? 

अजित पवार यांनी माहिती दिली की, ३१ मार्च पर्यंत राज्यातील काही सहकारी संस्थांच्या मुदती संपत होत्या. त्यामुळे त्या २ ते ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. पण पंढरपूरची निवडणूक ही केंद्राने लावली आहे, त्यामुळे त्यात राज्य सरकारने या निवडणुकीला सूट दिली आहे.

पंढरपूरची निवडणूक रद्द करण्याचे अधिकार कोणाकडे?

पंढरपूरमध्ये जाहीर झालेली पोट-निवडणूक ही विधानसभेची आहे. कोणत्याही राज्याच्या विधानसभा, विधानपरिषद तसचं देशाच्या लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे ती रद्द करणे किंवा पुढे ढकलणे यासंबंधीचे सर्व अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राखीव आहेत.

पण आयोग कोणतीही पोटनिवडणूक घेताना राज्य सरकारचा सल्ला अवश्य घेतं असतं. कारण सरकार जर निवडणुकीसाठी तयार असले तर ती निवडणूक घोषित होत असते.

एकूणच अशी सगळी विरुद्ध परिस्थिती आहे फक्त निवडणुकीसाठी. मात्र राज्यातच विरुद्ध टोकाचे नियम असं कसं चालेल?

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.