मुघल काळापासून चालत आलेला पंढरपूरचा यात्राकर वसंतदादांनी बंद केला

भूलोकीचे वैकुंठ समजले जाणारे पंढरपूर. दरवर्षी आषाडी एकादशीला इथल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीने शेकडो मैलांचं अंतर पायी तुडवत येतात.

या दिंडीच्या परंपरेला आठशे वर्षांचा इतिहास आहे.

जाईन ग माये तया पंढरपूरा
भेटेन माहेरा आपुलिया।।

या अभंगातून संतांनी पंढरीत दाखल होणे म्हणजे माहेरी येणे असे संबोधले आहे. मात्र याच माहेरला येण्यासाठी एकेकाळी भाविकांना यात्राकर द्यावा लागायचा.

या यात्राकराला देखील शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

साधारण चौदाव्या शतकाच्या दरम्यान दिल्लीच्या सुलतानांनी दक्षिण भारतात आक्रमण सुरू केलं. महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचा देखील याच काळात पराभव झाला. पुढे साधारण पंधराव्या शतकात बहामनी साम्राज्य स्थापन झाले.

उत्तरेतून आलेले हे मुस्लिम राज्यकर्ते स्वभावाने आक्रमक होते. स्वतःच्या धर्माचा प्रभाव वाढवा यासाठी प्रयत्नशील असायचे. अनेक मंदिरांची नासधूस त्यांनी केली.

मध्ययुगात पंढरपूरचा भाग बहुतांशी मुस्लिम शासकांच्या ताब्यात राहिला.

अगदी शिवशाहीच्या काळातही इथे आदिलशाही, निजाम शाही याचंच आलटून पालटून राज्य होतं.

पण इथल्या लोकांवर राज्य करायचे झाले तर आक्रमकता मागे ठेवून त्यांना प्रेमाने जिंकावे लागेल हे त्यांच्या लक्षात आले.

दौलताबादच्या सुलतानाच्या पदरी असलेले दलपतीराय, जनार्दन स्वामी या विठ्ठलभक्त मंत्र्यांनी सुलतानाच्या आक्रमणाला बोथट करायला सुरुवात केली.

तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली भागवत परंपरेचा पताका एकनाथ,नामदेव, तुकोबा, चोखोबा यांच्या प्रयत्नातून गगनास जाऊन भिडला होता.

पंढरपूरला त्याही काळात लाखो वारकरी भेट देतच होते.

या तिर्थक्षेत्रांना नष्ट करण्या ऐवजी तिथून कर रुपी कमाई करता येईल हा साधा हिशोब तत्कालीन राज्यकर्त्यांच्या लक्षात आला.

पंढरपूरच्या वारीवर बंदी आणण्या ऐवजी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यातील यात्राकरावर सरकारी तिजोरी भरण्याच धोरण सुलतानांनी पाळलं.

पंढरपूरच्या आसपास आदिलशाही निजामशाहीच्या बऱ्याच लढाया झाल्या. मात्र त्याची मोठी झळ विठोबाच्या मंदिराला बसली नाही

तरीही काहीवेळा अफझलखाना सारख्या काही धर्मांध सरदारांनी पंढरपूरवर हल्ले केले

मात्र प्रत्येक वेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी विठुरायाच्या मूर्तीला लपवून त्याचे संरक्षण केले.

पुढे आदिलशाही खिळखिळी झाल्यावर त्यांनी मुघल बादशहा औरंगजेबाशी तह केला व त्या तहात सोलापूरचा भुईकोट किल्ला व आसपासचा भाग मुघल सत्तेला जपडून दिला. यात पंढरपूरसुद्धा होते.

औरंगजेब बादशाह तर कट्टरतेचा कळस होता. त्याने काशीचे विश्वेश्वराच मंदिर फोडलं होतं आणि याचा त्याला अभिमान होता. अखंड हिंदुस्थानातील हिंदूंवर त्याने जिझिया कर बसवला होता.

महाराष्ट्रातून मराठ्यांच नामोनिशाण मिटवण्यासाठी तो दक्षिणेत आला.

अगदी पंढरपूर जवळ त्याची छावणी बरेच वर्ष होती. मात्र वारंवार मराठ्यांशी युद्ध करून वैतागलेल्या औरंगजेबालाही पंढरपूरच्या मंदिराकडे वक्रदृष्टी टाकायला वेळ मिळाला नव्हता. आणि तसही त्यापूर्वीच विठोबाची मूर्ती देगावच्या पाटलांच्या विहिरीत लपवण्यात आली होती.

पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शंभूपुत्र शाहूरायांची सुटका झाली व ते छत्रपती बनले.

पंढरपूर देखील खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या राजकीय अधिपत्याखाली आले. शाहू महाराजांनी विठोबाच्या मूर्तीची पुनरप्रतिष्ठापणा करवली. तिथल्या पूजा अर्चेची सोया केली.

त्यानंतर मराठा रियासतीत पंढरपूरचा विकास सुरू झाला.

पेशवाईत इथल्या प्रशासनाची घडी नीट बसवली गेली. त्यांच्या अनेक सरदारांनी इथे वाडे उभारले. या काळात वारीची परंपरा वाढीस लागली.

पुढे पेशवाई गेली व टोपीवाल्या इंग्रजांचे राज्य सुरू झाले. मुंबई इलाख्याखाली असलेल्या प्रशासनाने पंढरपूर भागात अनेक सुधारणा केल्या. इथे पक्के रस्ते बांधले, रेल्वे सुरू केली. लाखो लोक एकावेळी शहरात दाखल होत असल्यामुळे दुष्काळ, वारंवार येणारे साथीचे रोग यावर उपाय योजना सुरू केली.

सर्वात महत्वाचं म्हणजे नगरपालिकेची स्थापना केली.

१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. वेगळ्या महाराष्ट्र राज्याची स्थापणा झाली. राजाराम बापूंपासून राज्याच्या मंत्र्यांच्या हस्ते एकादशीच्या पूजेला सुरवात झाली.

मात्र याही काळात नगरपालिकेने यात्राकर लावायचं बंद केलं नव्हतं. प्रत्येक यात्रेकरूला विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरात दाखल व्हायला १ रुपया यात्राकर द्यावा लागे. बस स्टँड, रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी हे कर गोळा केले जाई.

आपले पोटापाण्याचे उद्योग सोडून फक्त माऊलीच्या दर्शना साठी शेकडो मैल अंतर तुडवून आलेल्या गोरगरीब वारकऱ्यांना हा कर भरणे जुलुम होता.

पण वारीच्या काळात या सर्व वारकऱ्यांची सोय करणे, त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, लसीकरण करणे, स्वच्छता राखने, पोलीस बंदोबस्त यासाठी निधी उभारायला नगरपालिकेला हा यात्राकर चालू ठेवणे भाग होते.

हभप रामदासबाबा मनसुख यांच्यासोबत अनेक वारकऱ्यांनी यासाठी बरीच वर्षे आंदोलन केले.

१९७७ साली जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळच्या वारीवेळी ते शासकीय महापूजेच्या निमित्ताने पंढरपूरला आले होते.

वारकऱ्यांनी यात्रा कराचा विषय त्यांच्या पर्यंत पोहचवला.

लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न समजून घेण्याची ताकद असणाऱ्या वसंतदादानी आपल्या स्टाईलने धडाकेबाज निर्णय घेऊन टाकला.

३० जून १९७७ पासून फक्त पंढरपूर नाही तर देहू, आळंदी, तुळजापूर, रामटेक, जेजुरी या सहा नगरपालिकांमधील यात्राकर रद्द करून त्याऐवजी त्यांना राज्य शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले.

गरीब वारकऱ्यांना शेकडो वर्षांपासून द्यावा लागत असलेला सक्तीचा यात्राकर बंद झाला

आणि हा जिझिया बंद केल्या बद्दल त्यांच्या दुवा कायमसाठी वसंतदादा पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.