गुरुंनी फेकून मारलेल्या अडकित्त्याचे व्रण पंडित भीमसेन जोशींनी आयुष्यभर जपले..

२० वर्षानंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणारा द डिसायपल हा चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाविषयी अनेक लोकांनी कौतुक केलं. अगदी जागतिक पातळीवर सुद्धा शास्त्रीय संगीतावर इतका भव्य दिव्य आणि व्यापक पद्धतीने चित्रपट आला नव्हता. या चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी हा भीमपराक्रम केला. या चित्रपटाची निर्मिती केली अल्फासो क्युअरन या तीन वेळच्या ऑस्कर विजेत्याने.

या चित्रपटात शास्त्रीय शिक्षण घेण्यापर्यंतचा खडतर प्रवास दाखवला आहे. भारतातील गुरु शिष्य परंपरा, शास्त्रीय संगीत आत्मसात करून त्याची केलेली सेवा इथपर्यंतचा सगळा प्रवास मांडला आहे. यात सुमित्रा भावेंनी म्हटलेलं संवाद खूप महत्वाचा आहे

रागाच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहचण्याची वाट दाखवली आहे आणि तो मार्ग स्विकारण्यासाठी त्याग हा करावाच लागणार, या वाटेवर चालायचं असेल तर एकटं आणि उपाशी राहायला शिका.

असाच खडतर प्रवास होता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा. गुरुच्या शोधात त्यांनी घरदार सोडलं होतं. गुरु कडून शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. त्यांच्या संगीत कारकिर्दीचा सुरवातीचा संघर्ष आपण जाणून घेऊया.

पंडित भीमसेन जोशी याना अगदी लहानपणापासून संगीताची आवड होती, संगीताशिवाय आपण राहूच शकणार नाही अशी त्यांची भावना होती. एकदा त्यांच्या लहानपणी घरावरून एक वाजंत्री लोकांचा ग्रुप गाणी गात गात पुढे गेला त्यावेळी भीमसेन जोशी त्या लोकांच्या मागे जात राहिले. गाण्याच्या वेडापायी दूरपर्यंत ते त्या वाजंत्री लोकांचा पाठलाग करत राहिले. इकडे त्यांच्या घरी खळबळ उडाली.

त्यांच्या वडिलांनी मुलगा हरवल्याची पोलिसात तक्रार दिली. तक्रार देत असताना एक गृहस्थ खांद्यावर भीमसेन जोशींना घेऊन पोलीस स्टेशनात आले त्यावेळी त्या गृहस्थाने सांगितले कि वाजंत्री लोकांच्या गाण्यामुळे हा मुलगा त्यांच्या मागे मागे चालत आला आणि थकून पायरीवर झोपला. म्हणून त्याला इथं घेऊन आलो. ओळख पटल्यावर भीमसेन जोशींचे वडील त्यांना घरी घेऊन आले आणि त्यांच्या शर्टवर सूचनावजा चिठ्ठी लिहिली. ज्यामुळे ओळख पटून त्यांना घरी येता येईल या आशयाची.

गाण्याबद्दलचं वेड त्यांच्यातून काय जात नव्हतं, वयाच्या अवघ्या ११ वर्षी त्यांनी घर सोडलं आणि गुरूच्या शोधात ते निघाले. वाटेत मिळेल ते खात आणि विनातिकीट प्रवास करत करत ते भारतभर गुरूच्या शोधात फिरत राहिले. त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर अशा शहरांमध्ये ते फिरत राहिले. उत्तर भारतात ते प्रचंड फिरले तेही खिशात पैसे आणि अन्न नसताना केवळ गाण्याच्या प्रेमापायी.

उस्ताद अब्दुल करीम खान, वझेबुआ, केसरबाई केरकर , उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या रेकॉर्डिग ऐकत ऐकत ते गायनाचा सराव करत राहीले. त्यांच्या वडिलांचा त्यांना शोधायचा प्रयत्न चालूच होता शेवटी जालंधर मध्ये पंडित मंगतराम यांच्या घरी ते सापडले. तिथून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी आणले.

ज्या गुरूच्या शोधात भीमसेन जोशी इतके फिरत होते ते गुरु त्यांच्या वडिलांना माहिती होते, आपल्या मुलाचं गाण्याचं विलक्षण वेड त्यांना ठाऊक होतं. त्यांनी भीमसेन जोशींना त्यांच्या गावाजवळच्या कुंदगोळ गावी घेऊन गेले. तेथील रामभाऊ कुंदगोळकर यांनी भीमसेन जोशींना शिष्यत्व दिलं.

गुरु शिष्य परंपरेत भीमसेन जोशींनी गुरूच्या घरच्या कामांना स्वतःला जुंपून घेतलं. त्यावेळी गुरूंकडे गंगुबाई हनगल या शिकवणीसाठी यायच्या तेव्हा भीमसेन जोशी त्यांच्या तालमी अगदी मन लावून ऐकायचे. पुढे गंगुबाई हनगल  यांच्या रूपाने  त्यांना प्रेमळ बहीण आणि संगीत सहाध्यायी म्हणून लाभली.

पण भीमसेन जोशींना हे शिष्यत्व मिळवण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. रामभाऊ हे सवाई गंधर्व म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या गुरुत्वाखाली भीमसेन जोशी संगीत शिकू लागले. सवाई गंधर्व हे किराणा या गायकी घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. गुरु शिष्य परंपरेनुसार गुरुगृही राहून त्यांना शिक्षण घ्यावं लागलं. सुरवातीचे काही दिवस गुरूंच्या  घरची काम त्यांना करावी लागली.

मैलभर लांब असलेल्या ठिकाणाहून ते पाणी आणत असत आणि तेव्हा गुरु त्यांना संगीत शिकवत असत.  एके दिवशी सराव करत असताना भीमसेन जोशींचा चुकीचा स्वर लागला यावर त्यांच्या गुरूने हातात असलेला अडकित्ता त्यांना फेकून मारलेला आणि त्याची खूण त्यांच्या डाव्या डोळ्यावर आयुष्यभर राहिली.

सवाई गंधर्व हे अतिशय कडक शिस्तीचे गुरु होते. सवाई गंधर्व त्यांच्याकडून दररोज तोडी, पुरिया, मुलतानी  रागांवर रोज आठ तास मेहनत करवून घ्यायचे. पुढे जसजसं त्यांचं शिक्षण वाढत गेलं त्यावेळी सोळा तासांच्या बैठकीत त्यांचा सर्व चाले. शिक्षण पूर्ण झाल्यावरही भीमसेन जोशी रियाजाचा १६ तासांचा दंडक पळत असे. १९३६ ते १९४१ पर्यंतच्या काळात त्यांनी शास्त्रीय संगीत पूर्ण तर्हेने आत्मसात केलं. गुरूंनी त्यांना परतण्याचा आदेश दिला तेव्हा ते पुण्याला आले.

पुढे भीमसेन जोशींनी गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरु केला.

इतक्या कठोर परिश्रमातून पंडित भीमसेन जोशींनी शास्त्रीय संगीत सर्वदूर पसरवले. भारताचा मानाचा भारतरत्न पुरस्कार त्यांना त्यांच्या शास्त्रीय गायनातील योगदानासाठी देण्यात आला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.